ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकाची पहिली फेरी शुक्रवारी (21 ऑक्टोबर) समाप्त झाली. अखेरच्या दिवशी ब गटात आयर्लंड व झिम्बाब्वे विजय मिळवत मुख्य फेरीत प्रवेश केला. पात्रता फेरीच्या अखेरच्या दिवशी ब गटातील दुसरा सामना झिम्बाब्वे आणि स्कॉटलंड यांच्या दरम्यान खेळला गेला. झिम्बाब्वे संघाने आपला अनुभव या निर्णायक सामन्यात दाखवत 5 गड्यांनी विजय आपल्या नावे केला. अनुभवी अष्टपैलू सिकंदर रझा हा या सामन्याचा मानकरी ठरला. या सामन्यात सामनावीर पुरस्कार जिंकत त्याने खऱ्या अर्थाने हे संपूर्ण वर्ष आपले असल्याचे सिद्ध केले.
अखेरच्या साखळी सामन्यात केवळ विजयाचीच आवश्यकता असताना झिम्बाब्वेने शानदार सांघिक खेळ करत सुपर 12 फेरीमध्ये धडक दिली. संघाची धावसंख्या कासवगतीने पुढे सरकत असताना पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रझाने 23 चेंडूवर 40 धावा ठोकल्या. त्यात 3 चौकार व 2 षटकारांचा समावेश होता. त्यामुळे झिम्बाब्वे विजयाच्या नजीक पोहोचला. त्या आधी देखील त्याने गोलंदाजीत 20 धावा देत एक बळी मिळवला होता. याच कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार दिला गेला. चालू वर्षातील हा त्याचा सहावा सामनावीर पुरस्कार आहे. त्याने यासोबतच 2016 मधील विराट कोहलीच्या सर्वाधिक सामनावीर पुरस्कार पटकावण्याच्या विक्रमाची बरोबरी केली.
विश्वचषकातील पहिल्या दोन सामन्यात देखील त्याने अशीच उत्कृष्ट कामगिरी केली होती. आयर्लंडविरूद्ध 48 चेंडूवर 82 धावांची सामना जिंकवणारी खेळी त्याने केलेली. तसेच एक बळीही मिळवलेला. वेस्ट इंडीजविरूद्धच्या सामन्यातही त्याने तीन बळी आणि 14 धावा केल्या होत्या. सध्या तो या विश्वचषकात सर्वाधिक धावा बनवणारा फलंदाज आहे.
या संपूर्ण वर्षात रझा अफलातून कामगिरी करतोय. बांगलादेशविरुद्ध त्याने वनडेत सलग दोन शतके झळकावली होती. तर, टी20 मालिकेतही संघाला विजय मिळवून देण्यात त्याचा सिंहाचा वाटा होता. तर, भारताविरुद्धच्या मालिकेतही त्याने मन जिंकणारी कामगिरी केलेली. याच कारणाने त्याला ऑगस्ट महिन्याचा आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार दिला गेलेला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
साधा सुधा नाय विश्वचषकातील दुसरा लांब षटकार हाय, ओडियन स्मिथच्या जबरदस्त शॉटने वेधले सर्वांचे लक्ष
गोळीच्या वेगाने चाललेला चेंडू पठ्ठ्याने झेलून दाखवला, पाहा टी20 विश्वचषकातील अफलातून कॅच