क्रिकेटमध्ये विक्रम रचणे आणि मोडणे सुरूच असते. काही विक्रम अजूनही मोडले गेले नाहीत परंतु एक आशा आहे कि भविष्यात हे विक्रम तुटतील. जसे कि, सचिनची १०० शतके, ब्रायन लाराची कसोटीमधली ४०० धावांची खेळी इत्यादी. भारतीय क्रिकेट संघानेही असेच काही विक्रम रचत जगावर आपली छाप सोडली आहे.
भारतीय संघातील केवळ फलंदाजच नव्हे तर गोलंदाजांनीही अनेक मोठे विक्रम केले आहेत. पण या चांगल्या विक्रमांसोबत काही लाजिरवाणे विक्रमही भारतीय खेळाडूंच्या वाट्याला आले आहेत. हे विक्रम ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.
जाणून घेऊयात काही नावडते विक्रम…
३) सुनील गावसकर
केवळ भारतच नाही तर जगातल्या सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये सुनील गावस्कर यांची गणना होते. लिटल मास्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गावसकर यांनी अनेक विक्रम केले पण त्यांच्या नावावर एक विचित्रच म्हणजे वनडे क्रिकेट मधली सर्वात संथ खेळी करण्याचा विक्रम आहे. १९७५ च्या वर्ल्ड कपमध्ये सुनील गावस्कर यांनी एक अत्यंत संथ खेळी केली होती ज्याची चर्चा आजही होते. इंग्लंडविरुद्ध सुनील गावसकरांनी तब्बल १७४ चेंडूंचा सामना करत फक्त ३६ धावा केल्या आणि नाबाद राहिले. अश्या खेळीमुळे त्यांना प्रचंड टीकेला सामोरे जावे लागले. त्यांच्या या खेळीबद्दल आजही जाणकार आणि चाहते आश्चर्य व्यक्त करतात आणि हसतात.
२) अजित आगरकर
अजित आगरकर एक जलदगती गोलंदाज म्हणून भारतीय संघात आला होता. याशिवाय त्याला फलंदाजीही चांगली जमायची. त्याच्या नावावर एक कसोटी शतक(ना. १०९) सुद्धा जमा आहे. पण त्याचा कसोटी मधला एक विक्रम फारच हास्यास्पद आहे. अजित आगरकरच्या नावावर कसोटी डावांमध्ये सलग ७ वेळा शून्यावर बाद होण्याचा विक्रम जमा आहे. हा असा विक्रम अत्यंत कोड्यात टाकणारा आहे. व्यवस्थित फलंदाजी करू शकत असतानाही स्वतःच्या नावावर असा विक्रम येणे म्हणजे चेष्टेचे धनी होणे.
१) युवराज सिंग
युवराज सिंग म्हटलं कि सर्वांनाच त्याने आंड्र्यू फ्लिन्टॉफला एकाच षटकामध्ये मारलेले सलग ६ षटकार आठवतात. मात्र यावेळी त्याच्याच गोलंदाजीच्या चिंधड्या उडाल्या आहेत. सप्टेंबर २००७मध्ये ओव्हल मैदानावर इंग्लंडविरुद्ध खेळताना दिमित्री मस्कारेन्हासने इनिंगच्या ५०व्या षटकात युवराजला ५ षटकार मारून ओव्हर मध्ये तब्बल ३० धावा कुटल्या होत्या. भारतातर्फे वनडे क्रिकेटमध्ये एकाच षटाकामध्ये सर्वाधिक धावा देण्याचा लाजीरवाणा विक्रम युवराजच्याच नावावर आहे.