इंडियन प्रीमीयर लीग २०२१ चा दुसरा टप्पा रविवारपासून (१९ सप्टेंबर) युएईमध्ये सुरु होणार आहे. त्यामुळे आता सर्व संघांचे जवळपास सर्व खेळाडू युएईला पोहचले असून अनेकांनी सरावाला सुरुवात केली आहे, तर काही खेळाडू क्वारंटाईन कालावधी पूर्ण करत आहेत. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा दिग्गज खेळाडू एबी डिव्हिलियर्सने नुकतेच क्वारंटाईन कालावधी संपवून मैदानात सरावाला सुरुवात केली आहे. त्याच्या सरावाचा एक व्हिडिओ आरसीबीने शेअर केला आहे.
आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा ३७ वर्षीय डिव्हिलियर्स आरसीबी संघाचा महत्त्वाचा भाग आहे. संघाकडून मोठ्या धावा करण्याची जबाबदारी त्याच्यावर असते. तसेच तो संघातील प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे. सध्या डिव्हिलियर्सने आयपीएलच्या १४ व्या हंगामातील दुसऱ्या टप्प्यासाठी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे.
आरसीबीने ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की डिव्हिलियर्स आक्रमक शॉट मारुन चेंडूला सीमापार करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच तो धावण्याचाही सराव करत असून, व्यायाम करतानाही दिसत आहे.
या व्हिडिओमध्ये डिव्हिलियर्सने प्रतिक्रिया देखील दिली आहे. तो म्हणतो की ‘हे शानदार होते. खेळपट्टी थोडी ओलसर होती. त्यामुळे फटके मारणे वास्तविक कठीण होते. गोलंदाज चांगली गोलंदाजी करत होते. येथे जेवढी आर्द्रता आहे, ते पाहून आपल्याला खूप घाम गाळावा लागतो आणि वजन कमी करण्यासाठी हे चांगले आहे. पण, माझ्यासारख्या वयस्कर व्यक्तीला जेवढे शक्य आहे, तेवढे ताजेतवाने राहाणे गरजेचे आहे.’
Bold Diaries: AB starts net sessions
The cameras were on Mr.360 as he resumed practice ahead of #IPL2021. AB spoke to us about his first hit, reuniting with RCB, & how he visualizes the match situations in his mind, on @myntra presents Bold Diaries.#PlayBold #WeAreChallengers pic.twitter.com/jhd23zv99q
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) September 13, 2021
डिव्हिलियर्स हा आयपीएलमध्ये दिग्गज फलंदाजांपैकी एक आहे. त्याने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये १७६ सामने खेळले आहेत. यात त्याने ४०.७७ च्या सरासरीने ५०५६ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या ३ शतकांचा आणि ४० अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने आत्तापर्यंत ४०६ चौकार आणि २४५ षटकार मारले आहेत.
तसेच आयपीएल २०२१ स्थगित होण्यापूर्वी डिव्हिलियर्सने या हंगामात ७ सामन्यात ५१.७५ च्या सरासरीने २०७ धावा केल्या होत्या. हा हंगाम २९ सामन्यांनंतर कोरोनाच्या संक्रमणामुळे स्थगित करण्यात आला होता. पण आता उर्वरित हंगाम १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरु होत असून आरसीबीचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध २० सप्टेंबरला अबुधाबीमध्ये होणार आहे. सध्या आरसीबी गुणतालिकेत ७ सामन्यांपैकी ५ सामने जिंकून १० गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
विराटशी कोणतीही गोष्ट बोलताना डिव्हिलियर्सला वाटते भीती, कारण जाणून व्हाल चकीत
आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्याचे हिरो! सर्वाधिक धावा करणारे ५ फलंदाज
‘ज्यादाचा वनडे किंवा टी२० सामना खेळण्यास तयार, पण मुद्दा हा नाही, तर…’, गांगुलीचे मोठे भाष्य