fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

विश्वचषकात खेळलेल्या ११ महान खेळाडूंचा संघ, दोन नावे आहेत भारतीय

क्रिकेट या खेळात सर्वात मानाची, महत्त्वाची व चाहते आतुरतेने वाट पाहतात अशी स्पर्धा कोणती असेल तर ती अर्थातच आयसीसी क्रिकेट विश्वचषक. दर ४ वर्षांनी ५० षटकांच्या वनडे सामन्यांची ही स्पर्धा घेतली जाते. वेगवेगळे देश या स्पर्धेचे यजमानपद भुषवितात.

विश्वचषकात खेळाडू कशी कामगिरी करतात हे चाहते कधीही विसरत नाही. अगदी पहिल्या विश्वचषकाच्या गप्पाही तेव्हा तो विश्वचषक पाहिलेले चाहते आजही मारतात. आपल्या आवडत्या खेळाडुच्या कामगिरीवर चाहत्यांचे या स्पर्धेदरम्यान बारीक लक्ष असते. या लेखात आपण अशाच ११ खेळाडूंची ओळख करुन घेणार आहोत ज्यांनी विश्वचषकात जबरदस्त कामगिरी करत आपल्या देशाचे नाव मोठे केले. (All-time greatest Cricket World Cup XI)

१. सचिन तेंडूलकर (फलंदाज)

भारतीय संघाचा माजी कर्णधार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर हा सर्वाधिक विश्वचषक खेळणारा खेळाडू आहे. १९९२, १९९६, १९९९, २००३, २००७ व २०११ असे ६ विश्वचषक सचिन खेळला आहे. यात त्याने ४५ सामन्यात ५६.९५च्या सरासरीने २२७८ धावा केल्या आहेत. यात ६ शतके व १५ अर्धशतकांचा समावेश आहे. सचिन विश्वचषकाच्या दोन फायनल खेळला आहे. २००३साली ४ धावा तर २०११ साली १८ धावा त्याने या फायनलमध्ये केल्या आहेत.

२. सनथ जयसुर्या (अष्टपैलू)

श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसुर्या हा वनडेतील फटकेबाजीसाठी जगात ओळखला जातो. सलामीला फलंदाजीला येत पहिल्या १० षटकांतच समोरच्या संघाला नको नको करणारा फलंदाज म्हणून त्याला ओळखले जात होते. १९९६ विश्वचषकात त्याने सलामीला येत केलेली कामगिरी क्रिकेटप्रेमी कधीही विसरणार नाहीत.  विश्वचषकात ३८ सामने खेळलेल्या जयसुर्याने ३४.२६च्या सरासरीने ११६५ धावा केल्या. तसेच २७ विकेट्सही घेतल्या. १९९२ ते २००७ या दरम्यान त्याने विश्वचषकात भाग घेतला.

३. रिकी पाॅटींग (कर्णधार- फलंदाज)

रिकी पाॅटींग हा विश्वचषकात सर्वाधिक धावा कऱणारा दुसरा खेळाडू आहे. १९९६, १९९९,२००३,  २००७ व २०११ असे ५ विश्वचषक रिकी पाॅटींग खेळला. यात १९९९, २००३ व २००७ असे तीन विश्वचषक ऑस्ट्रेलिया टीम जिंकली. २००३ विश्वचषक फायनलमध्ये याच पाॅटींगने १२१ चेंडूत १४० धावांची तुफानी खेळी केली होती. त्याने विश्वचषकात एकूण ४६ सामन्यात ४५.८६च्या सरासरीने १७४३ धावा केल्या आहेत. यात ५ शतके व ६ अर्धशतकांचा समावेश आहे.

४. व्हिव रिचर्ड्स (फलंदाज)

वेस्ट इंडिजचे महान क्रिकेटपटू व्हिव रिचर्ड्स यांनी १९७५, १९७९, १९८३ व १९८७ असे चार विश्वचषक खेळले. यात वेस्ट इंडिजने १९७५ व १९७९साली विजय मिळवला तर १९८३साली ते भारताविरुद्ध खेळताना उपविजेते ठरले. त्यांची विश्वचषकातील सरासरी ही ६३.३१ अशी व स्ट्राईक रेट ८५.०५ असा राहिला. रिचर्ड्स सोडून जगात कोणत्याही फलंजादाला विश्वचषकात ६०च्या सरासरीने १ हजार धावा करता आल्या नाहीत. रिचर्ड्स यांनी  २३ सामन्यात ३ शतके व ५ अर्धशतकांच्या मदतीने १०१३ धावा केल्या.

५. स्टिव वाॅ (फलंदाज)

ऑस्ट्रेलियाचा महान कर्णधार स्टिव वाॅने विश्वचषकात ३३ सामन्यात ४८.९०च्या सरासरीने ९७८ धावा केल्या. १९८७, १९९२, १९९६ व १९९९ असे चार विश्वचषक तो खेळला. यातील दोन विश्वचषक विजयात तो संघाचा भाग होता. १९९९ला त्याच्याच नेतृत्त्वाखाली ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा विश्वचषक जिंकला.

६. एडम गिलख्रिस्ट (यष्टीरक्षक )

विकेटकीपर फलंदाज एडम गिलख्रिस्टची २००७ विश्वचषकातील अंतिम सामन्यातील खेळी आजही कुणी विसरले नाही. १०४ चेंडूत १४९ धावांची तुफानी खेळी त्याने श्रीलंकेविरुद्ध करत विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. विश्वचषकाच्या ३१ सामन्यांत खेळताना त्याने ३६.१६च्या सरासरीने १०८५ धावा केल्या. यात त्याच्या १ शतकी व ८ अर्धशतकी खेळीचा समावेश आहे. १९९९, २००३ व २००७ असे तीन विश्वचषक तो खेळला. यात तीनही वेळा ऑस्ट्रेलियाने विजेतेपद मिळवले.

७. इम्रान खान (अष्टपैलू)

पाकिस्तानचा माजी कर्णधार व सध्याचा पंतप्रधान इम्रान खानने १९९२ साली विश्वविजेत्या पाकिस्तानचे नेतृत्त्व केले. पाकिस्तानने जिंकलेला हा एकमेव विश्वचषक आहे. इम्रान खानने पाकिस्तानकडून विश्वचषकात २८ सामन्यात ३५.०५च्या सरासरीने १ शतक व ४ अर्धशतकांच्या मदतीने ६६६ धावा केल्या. तसेच गोलंदाजीत १९.२६च्या सरासरीने ३४ विकेट्सही घेतल्या. इम्रान खान यांनी १९७५ ते १९९२ या काळात विश्वचषकात भाग घेतला.

८. वसिम अक्रम (वेगवान गोलंदाज)

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वसिम अक्रम १९८७, १९९२, १९९९ व २००३ असे चार विश्वचषक खेळला. यातील १९९२च्या विश्वचषकाच्या फायनलमध्ये १० षटकांत ४२ धावा देत ३ इंग्लंडच्या फलंदाजांना अक्रमने तंबूचा रस्ता दाखवला होता. विश्वचषकात अक्रमने ३८ सामन्यात २३.८३च्या सरासरीने ५५ विकेट्स घेतल्या. तसेच ४२६ धावाही केल्या. विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो आजही चौथ्या स्थानावर आहे.

९. मुथय्या मुरलीधरन (फिरकीपटू)

कसोटी व वनडे क्रिकेटमध्ये जगात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज अर्थातच श्रीलंकेचा महान फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन. १९९६, १९९९, २००३, २००७ व २०११ या ५ विश्वचषकात मुरलीधरनने श्रीलंका संघाची गोलंदाजीची धुरा सांभाळली. यात १९९६ साली विजेतेपद तर २००७ व २०११ साली उपविजेतेपद अशी श्रीलंका संघाची कामगिरी राहिली. मुरलीने ४० सामन्यात १९.६३च्या सरासरीने एकूण ६८ विकेट्स घेतल्या. विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर आहे.

१०. झहीर खान (वेगवान गोलंदाज)

भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज झहिर खान हा भारतीय वेगवान ताफ्याचा कायमच प्रमुख राहिला. २००३, २००७ व २०११ असे तीन विश्वचषक झहिर खेळला. यात २०११मध्ये विजेतेपद तर २००३मध्ये उपविजेतेपदावर भारताला समाधान मानावे लागले. २००३ विश्वचषकात खूप धावा देणाऱ्या झहीरने २०११ विश्वचषकात ३ निर्धाव षटके टाकून याची भरपाई केली. झहिरने विश्वचषकात भारताकडून २३ सामन्यात २०.२२च्या सरासरीने ४४ विकेट्स घेतल्या.

११. ग्लेन मॅकॅग्रा (वेगवान गोलंदाज)

१९९६, १९९९, २००३, २००७ व २०११ असे ५ विश्वचषक ऑस्ट्रेलियाचा महान गोलंदाज ग्लेन मॅकॅग्रा खेळला. यातील १९९९, २००३ व २००७ अशा तीन विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने विजेतेपदावर नाव कोरले. या तीनही विजयांत ऑस्ट्रेलियाकडून सर्वात महत्त्वाची भुमिका बजावणारा क्रिकेटर अर्थातच मॅकॅग्रा होता. त्याने एकूण ३९ सामन्यात खेळताना १८.१९च्या भेदक सरासरीने ७१ विकेट्स घेतल्या. तो विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे.

आकडेवारीवर आधारीत काही मनोरंजक लेख-

टाॅप ५- वनडे क्रिकेटमध्ये विजयांचा डोंगर उभे करणारे ५ कर्णधार

२५०पेक्षा जास्त वनडे सामने खेळूनही या ५ खेळाडूंवर कर्णधारपद कायम रुसलेच

टाॅप ५- वयाची २३ वर्ष पुर्ण करण्यापुर्वीच कसोटी कर्णधार झालेले खेळाडू

सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे ५ कर्णधार

टाॅप ५- वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार मिळवलेले दिग्गज

टाॅप ५- कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार मिळवलेले महारथी

सध्या खेळत असलेले ५ खेळाडू ज्यांनी मिळविल्या आहेत सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच

टॉप ५- असे खेळाडू ज्यांनी लावला होता मॅन ऑफ द सिरीजचा रतीब

टाॅप १०: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे १० खेळाडू

You might also like