भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने कोरोना व्हायरसच्या संकटादरम्यान पुन्हा सरावास सुरुवात करणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू आहे. काही रिपोर्टनुसार मुंबईतील असलेल्या शार्दुलने शनिवारी पालघर डहाणू तालुका जिल्हा क्रीडा संघटनेच्या मैदानात सराव केला. पण त्याने हा सराव परवानगी न घेता सुरु केल्याने बीसीसीआयने त्याच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
भारतात सध्या चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरु आहे. चौथ्या टप्प्यातील या लॉकडाऊनमध्ये आवश्यक परवानग्या घेतल्यानंतर आणि कठोर मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करून स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि स्टेडियममध्ये वैयक्तिक प्रशिक्षण घेण्यासाठी खेळाडूंना परवानगी देण्यात आली आहे. पण तरीही महाराष्ट्र शासनाने मुंबई-पुणे सारख्या रेड झोनमधील क्षेत्रात सरावासाठी अजून परवानगी दिलेली नाही.
शार्दुल ठाकूरच्या सरावाबद्दल आयएएनएसशी बोलताना बीसीसीआयचे अधिकारी म्हणाले, ‘तो बीसीसीआयशी करारबद्ध आहे, त्यामुळे त्याला याची परवानगी नाही. तो स्वत:च्याच मनाने सरावासाठी गेला, हे निराशाजनक आहे. त्याने असे करायला नको होते, हे योग्य पाऊल नाही.’
मुंबईत सध्या रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर असे काही खेळाडू आहेत. पण त्यांनाही अजून मैदानात जाऊन सराव करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.
बीसीसीआयच्या सूत्रांनी म्हटले आहे की, शार्दुलने पालघर जिल्ह्यात सराव केला आहे. त्या जिल्ह्यात रेड झोन नाही. पण तरीही बीसीसीआयकडून परवानगी न घेता सराव करणे योग्य नव्हते. बीसीसीआय सध्या खेळाडूंच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी पर्यंत्न करत आहे.
तसेच सरावा नंतर शार्दुल मीडियाशीही बोलला. त्याने सांगितले आहे की त्याला २ महिन्यानंतर सराव करण्याची संधी मिळाली. तसेच शार्दुलने असेही स्पष्ट केले की त्याने आयसीसीच्या समीतीने नुकतीच केलेली शिफारसनुसार त्याने चेंडूवर लाळेचा वापर केला नाही.
ट्रेंडिंग घडामोडी –
व्हिडिओ: २१ वर्षांपूर्वी सचिनने केलेल्या ‘त्या’ शतकाने सर्वांना केले होते भावनिक
…नाहीतर रोहित शर्माचे टीम इंडियात परतणे होणार ‘महाकठीण’
सौरव गांगुली आणि जय शहा यांच्यासाठी बीसीसीआयने घेतली सुप्रीम कोर्टात धाव