भारतीय संघाने लॉर्ड्स च्या मैदानावर ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताची अवस्था दयनीय झाली होती. परंतु मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांनी अभेद्य भागीदारी करत इंग्लडवर दबाव वाढवला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्यानंतर इंग्लिश संघाने गुढगे टेकले. इंग्लंडचा डाव १२०धावांवर गडगडला आणि भारतीय संघाने १५१ धावांनी विजय मिळवला.
आता पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने १-० अशी आघाडी घेतली आहे. सामना जिंकल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने या विजयाचे श्रेय संपूर्ण संघाला दिले आहे. त्याने विशेषतः जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीचे कौतुक करताना म्हणाला दोघांनी गोलंदाजी सोबत फलंदाजीतही अभूतपूर्व कामगिरी केली.
याशिवाय मैदानात झालेल्या ताण-तणावाचाही त्याने उल्लेख केला. मैदानात झालेल्या ताण तणावामुळे खेळाडूंनी उर्मीने खेळ खेळला, त्यामुळे आम्हाला या सर्व गोष्टींचा फायदाच झाला. हा सामना जिंकण्यासाठी आम्ही खूप उत्साही आणि आतुर झालो होतो.
भारतीय कर्णधार म्हणाला, ‘संपूर्ण संघाचा खूप अभिमान आहे. खेळपट्टीवर सामन्याच्या पाचव्या दिवशी गोलंदाजांना कोणतीही मदत मिळत नव्हती. पण आमच्या गोलंदाजांनी ज्या प्रकारे गोलंदाजी केली आणि त्यांच्या योजना आंमलात आणल्या ते कौतुकास्पद आहे. भारतीय फलंदाजी ठीक ठाक राहिली विशेषतः जसप्रीत आणि शमीने जी खेळी केली ती अभूतपूर्व अशी होती. आम्हाला विश्वास होता की, आम्ही त्यांना ६० षटकांत सर्वबाद करू आणि आम्ही ते करूनही दाखवले.’
विराट पुढे म्हणाला, मैदानावर जो भारतीय खेळाडूंना डिवचण्याचा प्रयत्न झाला, त्याने आम्हाला जिंकण्यासाठी प्रवृत्तच केले. आम्ही या विजयामुळे भारावून घेलो आहोत. तसेच पुढील सामन्यासाठी हाच सकारत्मक दृष्टीकोण ठेऊन खेळणार आहोत.
भारताने जिंकला सामना
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना केएल राहुलच्या १२९ धावांच्या शतकी खेळीच्या आणि रोहित शर्माच्या ८३ धावांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पहिल्या डावात सर्वबाद ३६४ धावा केल्या होत्या. तर, इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात कर्णधार जो रुटने केलेल्या नाबाद १८० धावांच्या खेळीच्या जोरावर ३९१ धावा करत २७ धावांची आघाडी घेतली होती. भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या होत्या.
दुसऱ्या डावात भारतीय संघाची वरची आणि मधली फळी फारशी मोठी कामगिरी करु शकली नाही, केवळ अजिंक्य रहाणेने ६१ आणि चेतेश्वर पुजाराने ४५ धावांची खेळी करत झुंज दिली. पण, तळात फलंदाजीला आलेल्या जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीने नाबाद ८९ धावांची भागीदारी करत भारताला २९८ धावांपर्यंत पोहचवले. भारताने हा डाव घोषित करत इंग्लंडसमोर २७२ धावांचे आव्हान ठेवले. या डावात शमीने नाबाद ५६ आणि बुमराहने नाबाद ३४ धावा केल्या. तर, इंग्लंडकडून मार्क वूडने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
भारताने दिलेल्या २७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला दुसऱ्या डावात ५१.५ षटकात सर्वबाद १२० धावाच करता आल्या. इंग्लंडकडून कर्णधार जो रुटने सर्वाधिक ३३ धावांचे योगदान दिले. याव्यतिरिक्त जोस बटलर २५ आणि मोईन अली १३ यांनाच दोन आकडी धावसंख्या पार करता आली. भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
सिराजचा कहर! सलग २ चेंडू मोईन अली, सॅम करनला दाखवला पॅव्हेलियनचा रस्ता, पाहा व्हिडिओ
‘देर आए दुरुस्त आए’, लॉर्ड्सच्या विजयानंतर रोहितच्या ‘त्या’ ट्विटची जोरदार चर्चा
दिल्ली कॅपिटल्सकडून खेळलेला ‘हा’ खेळाडू म्हणतोय, ‘मला मुंबई इंडियन्सकडून खेळायचंय’