लंडन । कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला आहे. या व्हायरसमुळे मागील काही महिन्यांपासून क्रिकेटदेखील पूर्णपणे ठप्प पडले आहे. परंतु आता पुढील महिन्यापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन होणार आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज संघात कसोटी मालिका खेळण्यात येणार आहे.
याव्यतिरिक्त क्रिकेट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती अशी, की वेस्ट इंडिज संघाने इंग्लंडमध्ये आपले १४ दिवसांच्या आयसोलेशन कार्यकाळ पूर्ण केला आहे. आता ते जुलैमध्ये सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेची तयारी सुरु करणार आहेत.
वेस्ट इंडिज संघ मॅनचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर बनविण्यात आलेल्या हॉटेलमध्ये क्वारंटाईन झाला होता. तसेच इंग्लंड संघ गुरुवारपासून (२५ जून) सराव करण्यास सुरुवा करणार आहे. दोन्ही संघांमध्ये ८ जुलैला पहिला कसोटी सामना खेळण्यात येणार आहे.
कोरोना योद्धांचे लिहिले असणार नाव
इंग्लंडचे खेळाडू विंडीजविरुद्ध कसोटी मालिकेदरम्यान आपल्या सराव जर्सीवर कोविड-१९ विरुद्ध लढा देणाऱ्या त्या लोकांचे नाव लिहीणार आहेत, ज्यांची पार्श्वभूमी क्रिकेटशी जोडलेली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांच्या नि:स्वार्थ कामगिरीच्या सन्मानार्थ असे करण्यात येणार आहे.
व्हायरसमुळे द रोझ बाऊल आणि ओल्ड ट्रॅफर्डच्या मोकळ्या मैदानात खेळण्यात येणाऱ्या ३ सामन्यांंच्या कसोटी मालिकेला कोविड-१९ शी लढणाऱ्या लोकांच्या सन्मानार्थ ‘रेज द बॅट’ हे नाव देण्यात आली असल्याची घोषणा इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने केली आहे.
८ जुलै पासून द रोझ बाऊलमध्ये सुरु होणाऱ्या मालिकेपूर्वी इंग्लंड संंघाच्या खेळाडूंच्या जर्सीवर निवडक आरोग्य कर्मचाऱ्यांचे नाव लिहिले जाणार आहे.
ज्या लोकांचे जर्सीवर नाव असेल, त्यामध्ये डार्लिंग्टन मेमोरियल रुग्णालयाचे एनेस्थेसिया आणि आपत्कालीन औषध तज्ञ डॉ. विकास कुमार आणि पूर्ण-काळ परिचारिका (नर्स) एमिली ब्लॅकमोर यांचा देखील समावेश आहे. विकास मोकळ्या वेळेत न्यूकासलमध्ये काऊगेट क्रिकेट क्लबकडून क्रिकेट खेळतात. तर एमिली एस्टवुड बँक क्रिकेट क्लबमध्ये पूर्णकाळ नर्स आणि स्वयंसेवक आहे. या यादीत शिक्षक, डॉक्टर, परिचारिका आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या नावाचा समावेश आहे, स्थानिक क्रिकेट क्लबने त्यांच्या नावाची शिफारस केली आहे.
इंग्लंड संघाचा कर्णधार जो रूटने दिलेल्या माहितीवरून ईसीबीने म्हटले, “या क्षणासाठी आम्ही खूप काळ वाट पाहिली आहे. तसेच, वेस्ट इंडिजशिवाय आम्ही येथे नसतो. या दौऱ्यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहेत.”
“‘रेज द बॅट’ यांच्या सन्मानार्थ ही मालिका संधी म्हणून आम्ही खेळत आहोत. आम्ही अभिमानाने त्यांच्या नावाची जर्सी घालू,” असेही त्यांनी पुढे म्हटले.
ट्रेंडिंग घडामोडी-
-…म्हणून अश्विनला बायको म्हणते; ‘गिफ्ट पाहिजे असेल, तर १५ वर्षे थांब’
-क्रिकेटचं काय घेऊन बसलाय! या ५ क्रिकेटर्सने गाजवलेत दुसरेही खेळ
-आयपीएलमधील ५ अशा टीम, ज्यांनी खेळाडूंवर खर्च केलाय पाण्यासारखा पैसा