भारतीय संघाचा महान क्रिकेटपटू एमएस धोनी याने त्याची आयपीएल फ्रेंचायझी चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद सोडले आहे. सध्या धोनीच्या जगभरातील चाहत्यांमध्ये निराशेची लाट उसळल्याचे दिसत आहे. रवींद्र जडेजा सीएसकेचा नवीन कर्णधार बनला आहे. या सर्व घडामोडींमध्ये जागतिक क्रिकेटमधील दुसऱ्या एका दिग्गजाने कर्णदारपद सोडण्याचे संकेत दिले आहेत. इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रुटने एकप्रकारे इशाराच देऊन टाकला आहे की, वेस्ट इंडीजविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर तो संघाचे कर्णधारपद सोडू शकतो.
मागच्या मोठ्या काळापासून इंग्लंड संघाचे कसोटी क्रिकेटमधील प्रदर्शन खूपच निराशाजनक राहिले आहे. यावर्षाच्या सुरुवातीला इंग्लंड संघाला ऑस्ट्रेलियाकडून ऍशेस मालिकेत मोठा पराभव मिळाला. ऑस्ट्रेलियाने ऍशेसचा हा हंगाम ४-० ने जिंकला आणि इंग्लंडचा कर्णधार जो रुट (Joe Root) याच्यावर होणाऱ्या टीकांचे प्रमाण अधिकच वाढले.
ऍशेसमधील पराभवानंतर इंग्लंडचे प्रशिक्षक क्रिस सिल्वरवुड (Chris Silverwood) यांनी पदाचा राजीनामा दिला. सिल्वरवुड गेल्यानंतर रुटच्या कर्णधारपदाविषयी देखील प्रश्न उपस्थित झाला होता. आता रुटने संकेत दिले आहेत की, वेस्ट इंडीजविरुद्धचा तिसरा कसोटी सामना, कर्णधाराच्या रूपातील त्याचा शेवटचा सामना असू शकतो.
नवीन प्रशिक्षक आल्यानंतर जाऊ शकते रुटचे कर्णधारपद
वेस्ट इंडीजविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी रुट म्हणाला की, ‘नवीन प्रशिक्षक आल्यानंतर परिस्थिती बदलू शकते. मला वाटते इंग्लंड संघाला पुढे घेऊन जाण्यासाठी मी योग्य व्यक्ती आहे. जर मुख्य प्रशिक्षक आले आणि त्यांनी वेगळा विचार केला, तर ठीक आहे, तो त्यांचा निर्णय असेल. मी इंग्लंड संघाचा खूप मोठा चाहता आहे. मला फक्त संघाला चांगले प्रदर्शन करताना पाहायचे आहे.’
रुट पुढे म्हणाला की, ‘मी आजूनही या संघाला जगातील सर्वश्रेष्ठ संघ बनवण्यासाठी प्रयत्न करेल. ध्येय कधीच बदलणार नाही.’ रुटने आतापर्यंतच्या कारकिर्दीत ११६ कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ५० च्या सरासरीने ९ हजार ८८४ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ५३ अर्धशतके आणि २५ शतके निघाले आहेत. त्याच्या नावावर ५ द्विशतक देखील आहेत.
त्याव्यतिरिक्त १५२ एकदिवसीय आणि ३२ टी-२० सामन्यांमध्ये रुटने इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले आहे. सध्या इंग्लंडचे माजी दिग्गज पॉल कॉलिंगवुड यांना वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी संघासोबत मुख्य प्रशिक्षकाच्या रूपात नियुक्त केले गेले आहे.