आयसीसी विश्वचषक 2023 मधील 15 वा सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेदरलँड्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात नेदरलँड्सने आफ्रिकेला पराभूत करुन सर्वांनाच मोठा आश्चर्याचा धक्का दिला आहे. आयसीसी विश्वचषक 2023 मध्ये दमदार सुरुवात करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला नेदरलँड्सने 38 धावांनी पराभूत केले. पावसामुळे हा सामना 43-43 षटकांचा खेळवण्यात आला हेता.
नाणेफेक जिंकुन आफ्रिका संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या नदरलँड्स संघाने निर्धारीत षटकात 8 बाद 245 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संघ 42.5 षटकात सर्वबाद 207 धावा करु शकला. याचबरोबर नेदरलँड्सने गुणतालिकेत ऑस्ट्रेलियालाही धोबीपछाड दिला आहे. या विजयामुळे नेदरलँड्सवर सर्व स्तरातुन कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशातच भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यानेही या संघाचं कौतुक केलं आहे.
तेंडुलकर म्हणाला की, “या विश्वचषकात बरेच आश्चर्यकारक निकाल येत आहेत. नेदरलँडचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्स (Scott Edwards) याने चांगले नेतृत्व केले आणि त्याला असे करताना पाहून बरे वाटले. एकेकाळी संघ 140 धावांत सात विकेट्स गमावून संकटात सापडला होता, तेव्हा कर्णधाराने चांगली फलंदाजी केली. मला सर्वाधिक आनंद झाला तो म्हणजे, क्षेत्ररक्षण करताना या खेळाडूंनी दडपणाखालीही दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना सहज धावा चोरू दिल्या नाहीत. हा विजय आणि ही रात्र जी नेदरलँड्सच्या दीर्घकाळ लक्षात राहील.”
काही दिवसांपूर्वीच अफगाणिस्तानने आयसीसी विश्वचषक 2023 मध्ये इंग्लंडविरुद्ध विजय मिळवला होता. आता नेदरलँड्सने ज्या प्रकारे दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आहे, त्यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, कोणताही संघ कोणत्याही संघाला हलक्यात घेऊ शकत नाही. आयसीसी विश्वचषक 2023 गुणतालिकेबद्दल बोलायचे झाल्यास, भारत 6 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. न्यूझीलंड 6 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. या पराभवानंतरही दक्षिण आफ्रिका गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे तर पाकिस्तान चौथ्या स्थानावर आहे. या विजयासह नेदरलँड्सने गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेला मागे टाकले आहे.
हेही वाचा-
नाद केला पण पुरा केला! न्यूझीलंडच्या पठ्ठ्यानं गाजवलं 2023 वर्ष, वनडेत ठोकल्या ‘एवढ्या’ धावा
शाब्बास रे पठ्ठ्या! ICC ODI Rankingमध्ये रोहितचा धमाका, ‘या’ क्रमांकावर झेप घेत सर्वांनाच केले हैराण