टास्मानियामध्ये जन्मलेला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज माजी कर्णधार रिकी पाँटिंगने क्रिकेट जगतात एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. पाँटिंगने आपल्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला २ (२००३, २००७) विश्वचषक जिंकून दिले आहेत.
इतकेच नव्हे तर २००६ची चॅम्पियन्स ट्रॉफीही पाँटिंगच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया संघाने आपल्या नावावर केली होती. पाँटिंगने ७७ कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले आहे. यातील ४८ सामने त्याने जिंकले आहेत.
वनडे क्रिकेटबद्दल बोलायचं झालं तर पाँटिंगने (Ricky Ponting) आतापर्यंत २२८ वनडे सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करताना १६२ सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून दिला आहे.
असे असताना पाँटिंगने कर्णधारपद (Captainship) सोडण्याचा निर्णय का घेतला? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. पाँटिंगने २०११ मध्ये कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. हा राजीनामा का दिला, याचा पाँटिंगने खुलासा आता केला आहे. यावेळी बोलताना तो म्हणाला की, त्याला या निर्णयामुळे खूप दु:ख झाले होते.
पाँटिंग म्हणाला की, “मी २०११ च्या विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व सामन्यात शतक केले होते. तेव्हा मी चांगली फलंदाजी करत होतो. त्यावेळी मी खेळाडू म्हणून खेळणे पुढे असेच चालू ठेवणार आहे, असे म्हटल्यानंतर लोकांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. परंतु मी हा निर्णय यासाठी घेतला होता, जेणेकरून संघात येणाऱ्या युवा खेळाडूंची मी मदत करू शकेल.”
२०११ विश्वचषकाचा उपांत्यपूर्व सामना भारताविरुद्ध (India vs Australia) होता. ज्यामध्ये पाँटिंगच्या ऑस्ट्रेलिया संघाला पराभव मिळाला होता. त्यानंतर त्याने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता.
यानंतर पाँटिंग म्हणाला की, “त्यावेळी माझ्याकडे मिळविण्यासारखे काहीही नव्हते. मला फक्त ऑस्ट्रेलियासाठी खेळायचे होते.”
पाँटिंगने २०१३मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर त्याने आयपीएलमध्ये २०१४ ते २०१६ दरम्यान मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचे प्रशिक्षकपदही सांभाळले होते. यानंतर त्याने २०१८ आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले होते.
ट्रेंडिंग घडामोडी-
-भारतीय संघात हा खेळाडू आहे सर्वात फनी क्रिकेटर
-टाॅप ५- वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार मिळवलेले दिग्गज
-भल्या मोठ्या वनडे कारकिर्दीत एकही षटकार न मारलेले ५ खेळाडू