ग्रेग चॅपेल यांचे नाव प्रत्येक क्रिकेट चाहत्याला माहीतच असावे. भारतीय तर या नावाचा खूप तिरस्कार करतात. एकवेळ तर अशी होती, चॅपेल या नावाला शिवीसारखे वापरले जात. वादग्रस्त असले तरी दिग्गज खेळाडू राहिलेल्या ग्रेग चॅपेल यांचा आज वाढदिवस.
इयान चॅपेल यांचे बंधू असलेल्या ग्रेग यांनी मोठ्या भावाप्रमाणे क्रिकेटमध्ये पारंगतता मिळवली. या दोघांप्रमाणे धाकटा भाऊ ट्रेव्हर यांनीदेखील ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले. मात्र, ग्रेग यांच्यासारखी प्रसिद्धी इतरांना मिळवता आली नाही.
दक्षिणा ऑस्ट्रेलियाकडून प्रथमश्रेणी सामने खेळायला सुरुवात केल्यानंतर ग्रेग यांनी अल्पावधीतच नाव कमावले. राष्ट्रीय संघाकडून खेळण्या आधीच ग्रेग यांना काउंटी क्लब सॉमरसेटकडून खेळण्यासाठी बोलावणे आले. सॉमरसेटसाठी १९६८- १९७० अशा दोन हंगामामध्ये त्यांनी ३०.३४ च्या सरासरीने २४९३ धावा काढल्या. अखेर, १९७० च्या ऍशेस मालिकेसाठी त्यांना राष्ट्रीय संघात निवडण्यात आले.
पहिल्या सामन्यात त्यांना राखीव खेळाडू म्हणून राहावे लागले. मात्र, दुसऱ्या सामन्यात त्यांना संधी मिळाली. पर्थच्या वेगवान खेळपट्टीवर त्यांनी शतक ठोकले. उरलेल्या, तीन सामन्यात मात्र त्यांना काही विशेष कामगिरी करता आली नाही. विश्व एकादश विरुद्ध होणाऱ्या पुढच्या मालिकेतून त्यांना वगळण्यात आले. त्यांच्या मानसिकतेबाबत अनेक टीका टिप्पणी करण्यात आल्या. ते काही काळ क्रिकेटपासून दूर राहिले.
१९७२ सालच्या ऍशेससाठी त्यांना निवडण्यात आले. या इंग्लंड दौऱ्यावर मात्र, चॅपेल यांनी सर्व टीकाकारांची तोंडे बंद केली. दोन शतके व दोन अर्धशतके त्यांच्या नावे होती. वेगवान गोलंदाज बॉब मेसी व ग्रेग चॅपेल यांच्या कामगिरीसाठी ती ऍशेस ओळखली जाते. मेसी, डेनिस लिली, कीथ स्टेकपेक यांच्यासोबत चॅपेल यांचा समावेश ‘ विस्डेन क्रिकेटर्स ऑफ द इयर’ मध्ये केला गेला.
ग्रेग यांची लोकप्रियता पाहून क्वींसलॅन्ड संघाने त्यांना प्रथमश्रेणी सामन्यांसाठी मोठी रक्कम देऊन आपल्या संघात सामील करून घेतले. ग्रेग यांचे बंधू इयान निवृत्त झाल्यावर संघाचे कर्णधारपद देखील त्यांनी भूषवले. १९७३ ते कारकिर्दीचा अखेरपर्यंत म्हणजे १९८४ पर्यंत ते क्वींसलॅन्ड संघाचा भाग होते.
ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान इतकेच महत्त्वाचे असलेले, ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे कर्णधारपद १९७५ मध्ये ग्रेग यांच्याकडे आले. आपल्या कर्णधारपदाच्या पहिल्याच सामन्यात वेस्ट इंडिज विरुद्ध त्यांनी दोन्ही डावांत शतके झळकावली. वरिष्ठ खेळाडूंनी निवृत्ती घेतल्यानंतर, मिळालेल्या युवा संघाला विजयाच्या मार्गावर नेण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले. १९७७ साली केरी पॅकर यांनी सुरू केलेल्या वर्ल्ड सीरिज क्रिकेटमध्ये ग्रेग चॅपेल यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला. १४ सामन्यात १,४१५ धावा फटकावताना इम्रान खान, माइक प्रॉक्टर, डेरेक अंडरवूड या दर्जेदार गोलंदाजांचा सामना केला. वर्ल्ड सिरीज क्रिकेट खेळायला गेलेल्या क्रिकेटपटूंना राष्ट्रीय संघात स्थान नव्हते. १९७९ मध्ये न्यायालयाने ही स्पर्धा अवैध ठरवल्यामुळे चॅपेल पुन्हा ऑस्ट्रेलिया संघात सामील झाले.
ऑस्ट्रेलिया संघात पुनरागमन झाल्यावर चॅपेल यांनी इंग्लंड व वेस्ट इंडीज दौरा गाजवला. त्यानंतर मात्र त्यांना आपल्या कामगिरीत सातत्य ठेवता आले नाही. अखेर, जानेवारी १९८४ मध्ये पाकिस्तान विरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळल्यानंतर त्यांनी निवृत्ती स्वीकारली.
चॅपेल यांनी ८७ कसोटी खेळताना ५३.८६ च्या शानदार सरासरीने ७,११० धावा काढल्या. वनडे क्रिकेटमध्ये ७४ सामन्यात २३३१ धावा काढताना सरासरी ४० पेक्षा खाली आली नाही. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये त्यांच्या नावे २५,००० धावा जमा आहेत.
आधी सांगितल्याप्रमाणे, चॅपेल यांच्यासोबत अनेक वाद जोडले गेले. १९८१ मध्ये ऑस्ट्रेलिया व न्युझीलंड यांच्या दरम्यानच्या, एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडला सामना बरोबरीत सोडवण्यासाठी एका चेंडूत ६ धावा हव्या होत्या. तेव्हा, ग्रेग चॅपल यांनी आपला धाकटा भाऊ ट्रेव्हर याला अंडर-आर्म गोलंदाजी करण्यास सांगितले. ट्रेव्हर यांनी कर्णधाराचा आदेश मानला व अंडर-आर्म चेंडू टाकला. मैदानातील उपस्थित ५०,००० प्रेक्षकांनी चॅपेल बंधूंची हुर्या उडवली होती. त्या घटनेला, रिची बेनो यांनी ‘ क्रिकेट इतिहासातील सर्वात लाजिरवाणी घटना ‘ असे म्हटले होते.
भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्त झाल्यावर चॅपेल यांनी भारताचा कर्णधार सौरव गांगुलीला कर्णधार पदावरून बाजूला होण्यास सांगितले होते. त्यानंतर, सौरव गांगुलीला संघातून बाहेर काढणे, बीसीसीआयला ई-मेल पाठवणे, खेळाडूंच्या क्रमांकाची आदलाबदली अशा अनेक घटना एकापाठोपाठ घडत गेल्या. गांगुली-चॅपेल वाद हे भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात चर्चा केलेले प्रकरण आहे. राहुल द्रविडवर सुद्धा काही वर्षापूर्वी त्यांनी खेळाडूंना सोबत घेत नसल्याचा आरोप लावला होता.
चॅपेल यांनी ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाच्या निवड समितीचे दोन वेळा अध्यक्षपद भूषविले आहे. प्रशिक्षक म्हणून साउथ ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान व भारत यांच्यासमवेत काम केले. सध्या ते चॅनेल ९ व एबीसी रेडिओसाठी समालोचन करतात.
महत्त्वाच्या बातम्या –
मोक्याच्या क्षणी जिम्मीने टाकला असा काही चेंडू की, राहुलने दिली स्वत:ची विकेट; बघा व्हिडिओ
नॉटिंघम स्टेडियममध्ये दिसला अगदी रिषभसारखा व्यक्ती; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘हा तर पंतचा जुळा भाऊ’
पत्रकाराच्या लांबलचक प्रश्नावर वैतागलेल्या कोहलीचे तिखट उत्तर; नेटकरी म्हणाले, ‘घनघोर अपमान’