आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापूर्वी दिल्ली कॅपिटल्सच्या कोचिंग स्टाफबाबत एक मोठं अपडेट समोर आलं आहे. मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगनं साथ सोडल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स दोन माजी भारतीय खेळाडूंना नवे प्रशिक्षक बनवू शकते. रिपोर्ट्सनुसार, माजी क्रिकेटपटू हेमांग बदानी दिल्ली कॅपिटल्सचे नवे मुख्य प्रशिक्षक बनू शकतात. ते पुढील दोन हंगामांसाठी संघाचे मुख्य प्रशिक्षक असतील. याशिवाय त्यांचे सहकारी खेळाडू वेणुगोपाल राव यांची संघाच्या क्रिकेट संचालकपदी नियुक्ती केली जाऊ शकते.
हेमांग बदानी आणि वेणुगोपाल राव हे चेन्नई लीगमध्ये एमआरएफसाठी एकत्र खेळले आहेत. याशिवाय दोघांमधील परस्पर समन्वय खूपच उत्कृष्ट आहे. दिल्ली कॅपिटल्सनं या दोघांना उर्वरित सपोर्ट स्टाफ नियुक्त करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिलंय. अनेक वर्ष दिल्ली कॅपिटल्सचे प्रशिक्षक राहिलेल्या रिकी पाँटिंगसारख्या दिग्गजाची जागा घेणं सोपं नाही. मात्र ‘क्रिकबझ’च्या मते, फ्रेंचायझीनं मोठ्या नावांऐवजी बदानी आणि वेणुगोपाल राय यांना सपोर्ट स्टाफमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. वेणुगोपाल राव हे दिल्लीकडून खेळाडू म्हणूनही खेळले आहेत.
यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सच्या रिटेन्शनबाबत मोठी बातमी आली होती. वृत्तानुसार, दिल्ली कॅपिटल्सचा संघ केवळ तीन खेळाडूंना रिटेन करू शकतो. पीटीआयच्या वृत्तानुसार, दिल्ली कॅपिटल्स रिषभ पंतला 18 कोटी रुपयांमध्ये रिटेन करेल. तर अक्षर पटेल हा संघाचा दुसरा रिटेन्शन असेल, ज्याला 14 कोटी रुपये मिळतील. कुलदीप यादव हा संघाचा तिसरा रिटेन्शन असेल. त्याला 11 कोटी रुपयांमध्ये रिटेन करण्यात येणार आहे.
दिल्ली कॅपिटल्सनं या तीन खेळाडूंना रिटेन केल्यास डेव्हिड वॉर्नर, इशांत शर्मा, खलील अहमद, पृथ्वी शॉ, मिचेल मार्श आणि जेक फ्रेझर मॅकगर्क यांसारखे खेळाडू लिलावात दिसू शकतात. मात्र दिल्ली कॅपिटल्सकडे राईट टू मॅच (RTM) चा पर्याय असेल. लिलावात एखाद्या खेळाडूला कमी बोली लागल्यास त्याच्यासाठी राईट टू मॅच कार्ड वापरता येईल.
हेही वाचा –
केदार जाधवचा संघ LLC चॅम्पियन! इरफान पठाणच्या संघाचा सुपर ओव्हरमध्ये पराभव
आता कसेही पैसे खर्च करा! आयपीएल रिटेन्शन नियमांमध्ये मोठे बदल
IND vs NZ; दुसऱ्या दिवशीही पाऊस घालणार खोळंबा? कसे असणार बेंगळुरूचे हवामान?