अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या ५ सामन्यांची टी२० मालिका सुरु आहे. ही मालिका नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु असून या मालिकेसाठी भारतीय संघात काही युवा खेळाडूंना पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे. यात झारखंडचा युवा क्रिकेटपटू इशान किशनचाही समावेश आहे. त्यामुळे आता त्याला भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी आहे. याबद्दल त्याने प्रतिक्रिया दिली आहे.
या मालिकेतील पहिला सामना झाला असून आता दुसरा सामना रविवारी(१४ मार्च) होणार आहे. दुसऱ्या टी२० सामन्याआधी विस्डेनला दिलेल्या मुलाखतीत इशान किशन म्हणाला, ‘भारताच्या संघात स्थान मिळवणे कधीही अवघडच आहे, पण हे आहे असेच आहे. त्यामुळे मी कोणत्याही क्रमांकावर फलंदाजीसाठी तयार आहे. मी माझ्या कारकिर्दीत वरच्या आणि मधल्या फळीत खेळलो आहे.’
२२ वर्षीय इशान पुढे म्हणाला, ‘मला दबावाखाली खेळताना अधिक आत्मविश्वास येतो. मला वाटते की देशांतर्गत क्रिकेटच्या वेगवेगळ्या प्रकारात आणि भारत अ संघाकडून खेळल्याने कठीण परिस्थितीत चांगली कामगिरी करण्यास मदत होते. आयपीएलमध्ये हे महत्त्वाचे असते की तुम्हाला मिळालेल्या संधीचा फायदा घेता आला पाहिजे. तुम्हाला चांगली कामगिरी करण्यासाठी तुमच्यात त्यासाठी भूक आणि जिद्द असली पाहिजे.’
तसेच त्याने म्हटले की मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि संघात असलेल्या अनेक दिग्गजांकडून अनेक गोष्टी शिकता येतात. मुंबई इंडियन्सच्या संघाचे त्याच्या कारकिर्दीत योगदान असल्याचेही त्याने सांगितले.
इशान किशन इंडियन प्रीमीयर लीगमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. त्याने युएईमध्ये मागीलवर्षी पार पडलेल्या आयपीएलच्या १३ व्या हंगामात १४ सामन्यात ५७.३३ च्या सरासरीने ५१६ धावा केल्या होत्या. तसेच सध्या सुरु असलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये मध्यप्रदेशविरुद्ध ११ षटकार आणि १९ चौकारांसह ९४ चेंडूत १७३ धावांची खेळी केली होती.
याबरोबरच त्याची भारतीय संघात निवड झाल्याबद्दल त्याने निवडकर्त्यांचे आभार मानले आहेत. तसेच भारतीय संघात निवड होणे, ही भावना शब्दात व्यक्त करणे कठीण असल्याचेही त्याने सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या –
शोएब अख्तरचा झाला सन्मान, ‘या’ प्रसिद्ध मैदानाला दिले गेले नाव
आता तरी द्या तो चेंडू! पहिल्या टी२० सामन्यादरम्यान हार्दिक पंड्या वैतागला प्रेक्षकांवर, पाहा व्हिडिओ