सन २०२० संपण्यासाठी फक्त ४ दिवस शिल्लक आहेत. यानंतर, नवीन वर्ष (२०२१) सुरू होईल. तसे पाहायला गेले, तर २०२० हे वर्ष कोणत्याही क्षेत्रासाठी खास राहिले नाही. कोरोनामुळे प्रत्येकाला समस्यांचा सामना करावा लागला. क्रीडाजगत तर पूर्णपणे बंदच होते. परंतु वर्षाच्या समाप्तीपूर्वी आपण अशा खेळाडूंबद्दल जाणून घेऊ, जे आपल्या वर्षभरातील चांगल्या कामगिरीमुळे ‘आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर’ (२०२०) पुरस्कार जिंकू शकतात.
दरवर्षीप्रमाणे आयसीसी यावर्षीदेखील क्रिकेटर ऑफ द इयरच्या नावाची घोषणा करेल. यामध्ये अशा खेळाडूंची निवड केली जाते, ज्यांनी वर्षभरात क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात (वनडे, टी२० आणि कसोटी) उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. या लेखामध्ये आपण त्याच खेळाडूंविषयी जाणून घेऊया, ज्यांनी या वर्षात लक्षणीय कामगिरी केली.
१) केएल राहुल
भारताच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचा उपकर्णधार केएल राहुल यावर्षीचा आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार मिळवण्याचा मोठा दावेदार आहे. राहुलने यावर्षी फक्त टी२० व वनडे क्रिकेट खेळले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी संघात त्याचा समावेश आहे. मात्र, पहिल्या दोन्ही कसोटी त्याला संधी न मिळाल्याने तो यावर्षी एकही कसोटी सामन्यात खेळू शकला नाही.
राहुलने यावर्षी २० आंतरराष्ट्रीय वनडे व टी२० सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले. या २० सामन्यांच्या १९ डावात त्याने ४९.८२ च्या सरासरीने ८४७ धावा काढल्या. यामध्ये एक शतक व ७ अर्धशतकांचा समावेश होता.
२) बाबर आझम
पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम यावर्षी चांगल्या फॉर्ममध्ये राहिला. मात्र, दुखापतग्रस्त झाल्याने सध्या न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटीतून तो बाहेर पडला आहे. परंतु, यावर्षी बाबरने आपल्या कामगिरीने तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये धमाकेदार कामगिरी केली.
बाबर आझमने क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात मिळून यावर्षी १५ सामने खेळले. या १५ डावात त्याने एकूण ८३५ धावा केल्या. या दरम्यान त्याची सरासरी ६९.५८ इतकी जबरदस्त राहिली. बाबरने यावर्षी २ शतके आणि ७ अर्धशतके झळकावली आहेत.
३) मार्नस लॅब्यूशाने
ऑस्ट्रेलियाचा युवा फलंदाज मार्नस लॅब्यू,शाने हा देखील या वर्षी आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार मिळवण्याचा मोठा दावेदार आहे. कसोटी खेळाडू असा शिक्का बसला असला तरी, त्याने मिळालेल्या सर्व संध्याचे सोने करत वनडे क्रिकेटमध्ये देखील छाप सोडली.
लॅब्युशेनने यावर्षी १६ आंतरराष्ट्रीय सामने खेळले. या १६ सामन्यातील १७ डावांमध्ये मिळून त्याने ४९.८८ च्या सरासरीने ८४८ धावा ठोकल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून २ शतके व ४ अर्धशतके निघाली.
४) डेविड वॉर्नर
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा अनुभवी खेळाडू डेविड वॉर्नर यावर्षीचा आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार मिळवण्याचा मोठा दावेदार आहे. वॉर्नरने यावर्षी सर्व प्रकारचे सामने खेळले. भारताविरुद्धच्या वनडे मालिकेत दुखापतग्रस्त झाल्याने तो टी२० मालिका व दोन कसोटी सामन्यांना मुकला आहे.
वॉर्नरने यावर्षी १८ आंतरराष्ट्रीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले. या १८ सामन्यांच्या १९ डावात त्याने ५०.४३ च्या सरासरीने ८०७ धावा काढल्या. यामध्ये २ शतक व ६ अर्धशतकांचा समावेश होता.
५) बेन स्टोक्स
आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार मिळवण्याचा अखेरचा दावेदार आहे इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स. स्टोक्सने यावर्षी फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही विभागात चांगली कामगिरी केली आहे.
स्टोक्सने यावर्षी १३ आंतरराष्ट्रीय सामने खेळताना ७६७ धावा काढल्या आहेत. यामध्ये दोन शतके व २ अर्धशतकांचा समावेश आहे. या दरम्यान त्याची सरासरी ५१.१३ अशी उत्कृष्ट राहिली.
महत्त्वाच्या बातम्या-
घातक वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने केला भारतीय फलंदाजी रणनितीचा खुलासा, म्हणाला…
‘तो खूप मेहनतीने इथे पोहोचला आहे’, भारताच्या प्रमुख गोलंदाजाने केली सिराजची प्रशंसा
मुश्ताक अली स्पर्धेतून ‘कॅप्टन कूल’ करणार पुनरागमन? धोनीने स्वतःच दिले स्पष्टीकरण