भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना 6 डिसेंबर रोजी ॲडलेडच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्यात नियमित कर्णधार रोहित शर्माचे पुनरागमन होणार असून जसप्रीत बुमराह एक खेळाडू म्हणून खेळताना दिसणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यात बुमराहने भारतीय संघासाठी अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने या सामन्यात एकूण 8 विकेट्स घेतल्या होत्या आणि त्याच्यामुळेच टीम इंडियाला सामना जिंकण्यात यश आले. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला सामनावीराचा पुरस्कारही मिळाला. आता दुसऱ्या कसोटीतही संघ व्यवस्थापनाला त्याच्याकडून दमदार खेळाची अपेक्षा असेल.
भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ॲडलेडमध्ये होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 10 विकेट्स घेतल्यास तो 2023-25 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनेल. त्याने डब्ल्यूटीसी 2023-25 मध्ये आतापर्यंत एकूण 53 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या पुढे रविचंद्रन अश्विन (62 विकेट्स) आणि जोश हेझलवूड (56 विकेट्स) आहेत. बुमराहने पहिल्या कसोटी सामन्यातील कामगिरीची पुनरावृत्ती केल्यास तो या दोन्ही गोलंदाजांना सहज मागे टाकेल.
डब्ल्यूटीसी 2023-25 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज:
रविचंद्रन अश्विन- 62 विकेट्स
जोश हेझलवूड- 56 विकेट्स
जसप्रीत बुमराह- 53 विकेट्स
रवींद्र जडेजा- 51 विकेट्स
पॅट कमिन्स- 51 विकेट्स
मिचेल स्टार्क- 51 विकेट्स
जसप्रीत बुमराहने 2018 मध्ये भारतीय संघाकडून कसोटी पदार्पण केले. तेव्हापासून तो टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजीतील महत्त्वाचा दुवा राहिला आहे. त्याने भारतीय संघासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकवले आहेत. तो परिस्थिती लवकर ओळखतो आणि त्यानुसार गोलंदाजी करतो. आतापर्यंत त्याने 41 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 181 विकेट्स घेतल्या आहेत.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेबद्दल बोल्याचे झाल्यास, पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने 1-0 ने आघाडी घेतली आहे. पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने कांगारुंना बॅकफूटवर ढकलले आहे. अश्या स्थितीत दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलिया कमबॅक करणार का? की भारत आपले विजयी रथ सुरु ठेवेल हे पाहणे रंजक ठरेल.
हेही वाचा-
भारताने आतापर्यंत किती डे-नाईट कसोटी सामने जिंकले? ऑस्ट्रेलियाविरुद्ध असा विक्रम
‘बुमराह लिलावात आला तर किती बोली लागली असती’? अशिष नेहरा म्हणाला, ‘त्याच्यासाठी पूर्ण पर्स….’
हा खेळाडू होणार दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार! संघ मालकाचा मोठा इशारा?