भारतीय संघाचा (Team India) कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या विजयरथावर आरूढ आहे. विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर जेव्हा रोहित शर्माकडे ही जबाबदारी सोपवली गेली, तेव्हापासून भारतीय संघ एकापाठोपाठ एक मालिका जिंकत आहे. रविवारी (२७ फेब्रुवारी) भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धचा तिसरा आणि शेवटचा टी-२० सामना जिंकला. या विजयासह भारताने श्रीलंकेला व्हाईटवॉश (३-०) दिला आहे. रोहितने कर्णधारपद स्वीकारल्यानंतर ही सलग तिसरी टी-२० मालिका आहे, ज्यामध्ये विरोधी संघाला व्हाईटवॉश मिळाला आहे.
भारतीय संघाच्या टी-२० क्रिकेटमधील इतिहासाचा विचार केला, तर संघाची कामगिरी चांगली राहिली आहे. भारताने आतापर्यंत आठ वेळा विरोधी संघाला टी-२० मालिकेत व्हाईटवॉश दिला आहे. हे सत्र २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेतून सुरू झाले, जेव्हा ऑस्ट्रेलियन संघ तीन पैकी तीन सामन्यात पराभूत झाला होता. त्यानंतर २०१७ मध्ये श्रीलंका, २०१८ मध्ये वेस्ट इंडीज, २०१९ मध्ये पुन्हा वेस्ट इंडीज, २०२० मध्ये न्यूझीलंड, २०२१ मध्ये पुन्हा एकदा न्यूझीलंड, त्यानंतर यावर्षीच्या सुरुवातीला झालेल्या वेस्ट इंडीजविरुद्धच्या आणि या श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेतही भारताने विरोधी संघाला व्हाईटवॉश दिला आहे.
दरम्यान, रोहित शर्माने ही मालिका जिंकल्यानंतर अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. त्यापैकीच एक महत्वाचा विक्रम म्हणजे, रोहित आता टी-२० क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार बनल्याचे दिसते. त्याच्या नेतृत्वात भारताने आतापर्यंत एकूण ५ टी-२० मालिकांमध्ये विरोधी संघाला व्हाईट वॉश दिला आहे.
या यादीत विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराटच्या नेतृत्वात खेळल्या गेलेल्या दोन टी-२० मालिकांमध्ये भारताने विरोधी संघाला व्हाईट वॉश दिला आहे. दिग्गज एमएस धोनी या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे, त्याने ही कामगिरी संपूर्ण कारकिर्दीत एकदा केली आहे.
भारत आणि श्रीलंका संघामध्ये खेळल्या गेलेल्या या टी-२० मालिकेचा विचार केला, तर भारताने अप्रतिम प्रदर्शन केले आणि सर्वच्या सर्व सामने जिंकले. पहिल्या सामन्यात संघ ६२ धावांनी जिंकला होता, त्यानंतर दुसऱ्या सामन्यात श्रीलंका संघ ७ विकेट्सने पराभूत झाला होता, तसेच तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेला ६ विकेट्सने पराभव पत्करावा लागला. उभय संघातील कसोटी मालिका ४ मार्च पासून सुरू होईल. पहिला कसोटी सामना मोहालीमध्ये खेळला जाईल, तर दुसरा सामना १२ मार्चपासून बंगळुरूमध्ये खेळला जाईल.
महत्वाच्या बातम्या –
आयएसएल: मोहन बागान विजयी ट्रॅकवर; प्ले-ऑफच्या रेसमध्ये कायम
श्रीलंकेचा ‘हा’ गोलंदाज रोहित शर्माचा पिच्छा काही सोडेना; तब्बल ६ वेळा दाखवलाय तंबूचा रस्ता