आयर्लंड आणि भारत यांच्यातील दुसरा टी20 सामना डब्लिन येथे येथे खेळला गेला. पहिल्या सामन्यात डकवर्थ लुईस नियमानुसार विजय मिळवलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात आपले वर्चस्व गाजवले. ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन व रिंकू सिंग यांच्या शानदार फलंदाजीनंतर गोलंदाजांनी केलेल्या दमदार कामगिरीमुळे भारताने 33 धावांनी विजय साजरा केला.
या सामन्यात नाणेफेक जिंकून यजमान संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यशस्वी जयस्वाल व ऋतुराज गायकवाड 29 धावांची वेगवान सलामी देत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. मात्र, यशस्वी व तिलक वर्मा केवळ काही चेंडूंच्या अंतराने बाद झाले. त्यावेळी संकटात सापडलेला भारतीय डाव ऋतुराज व संजू सॅमसन यांनी सावरला. संजूने आक्रमक 40 धावांची खेळी केली. दुसरीकडे ऋतुराजने आपल्या कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक पूर्ण केले. ऋतुराज बाद झाल्यावर रिंकू सिंग व शिवम दुबे ही जोडी मैदानावर आलेली. सुरुवातीला त्यांना मोठे फटके खेळण्यात अडचण येत होती. मात्र, अखेरच्या तीन षटकात रिंकूने गोलंदाजांवर हल्ला चढवला. त्याने अखेरच्या षटकात तीन षटकार ठोकत भारताची धावसंख्या 185 पर्यंत नेली. त्याने 38 तर दुबेने 22 धावा केल्या.
या गावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या आयर्लंड संघाला सुरुवातीलाच धक्के बसले. प्रसिद्ध कृष्णा याने स्टर्लिंग व टकर यांना खाते खोलू दिले नाही. टेक्टर व कॅम्फर हे देखील मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. ऍण्ड्रू बालबिर्नी याने एकाकी झुंज देत 72 धावांची शानदार खेळी केली. मात्र, अखेरच्या टप्प्यात कर्णधार जसप्रीत बुमराह याने टिच्चून गोलंदाजी करताना संघाला विजय मिळवून दिला.
(India Beat Ireland In 2nd T20I Ruturaj Rinku Singh Shines)