सध्या जपानची राजधानी टोकियो येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमधून शनिवारी (७ ऑगस्ट) संपूर्ण भारत देशासाठी एक ऐतिहासिक बातमी समोर आली. भारताचा पुरुष भालाफेकपटू नीरज चोप्रा याने भारताच्या ऑलिम्पिक इतिहासातील ऍथलेटिक्स प्रकारातील पहिलेवहिले सुवर्णपदक मिळवून दिले. यासोबतच भारताच्या कोणत्याही खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये १३ वर्षानंतर सुवर्णपदक जिंकले. त्याच्या सुवर्णपदकानंतर ऑलिम्पिक स्टेडियममध्ये भारताचे राष्ट्रगीत वाचताना पाहून सर्व भारतीयांची छाती अभिमानाने फुलून आली होती.
१३ वर्षानंतर वाजले भारताचे राष्ट्रगीत
ऑलिम्पिक स्पर्धेच्या नियमानुसार कोणत्याही क्रीडा प्रकारात सुवर्णपदक जिंकणार्या खेळाडूंच्या देशाचे राष्ट्रगीत पदक वितरण समारंभावेळी वाजवले जाते. नीरज चोप्राने भालाफेकीमध्ये सुवर्ण पटकावत तब्बल १३ वर्षानंतर भारताला हा मान मिळवून दिला. यापूर्वी, २००८ बिजिंग ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाज अभिनव बिंद्रा याने सुवर्ण पदावर आपले नाव कोरत ही संधी भारताला दिली होती. टोकियो ऑलिम्पिक स्टेडियममध्ये भारताचे राष्ट्रगीत वाजत असताना अभिमान वाटत होता, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहेत.
#IND National Anthem at Olympic Stadium in #Tokyo2020
Thank you @Neeraj_chopra1 #NeerajChopra pic.twitter.com/68zCrAX9Ka
— Athletics Federation of India (@afiindia) August 7, 2021
नीरजने जिंकले सुवर्णपदक
ऑलिम्पिकमध्ये जाण्यापूर्वी नीरज चोप्रा याला सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार मानले जात होते. त्याने आपल्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करत हे सुवर्ण पदक भारताला मिळवून दिले. अंतिम फेरीतील सहा प्रयत्नांपैकी दुसऱ्या प्रयत्नातच ८७.५८ मीटरचा भाला फेकून त्याने आपले एक पदक निश्चित केले होते. त्याचे प्रतिस्पर्धी खेळाडू इथपर्यंत पोहोचू न शकल्याने नीरज सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला.
ऍथलेटिक्समधील पहिले पदक
नीरजने जिंकलेले हे सुवर्ण पदक भारताने ऍथलेटिक्समध्ये जिंकलेले ऑलिम्पिक इतिहासातील पहिले पदक आहे. तसेच, कोणत्याही खेळाडूने वैयक्तिक प्रकारात जिंकलेले हे केवळ दुसरे सुवर्ण ठरले. यापूर्वी भारताचे मिल्खा सिंग व पी टी उषा हे खेळाडू ऍथलेटिक्समध्ये चौथ्या क्रमांकावर राहिल्याने पदक पटकावू शकले नव्हते. नीरजने हे पदक मिल्खा सिंग यांना समर्पित करत असल्याचे म्हटले आहे. मागील महिन्यात मिल्खा सिंग यांचे कोरोनामुळे निधन झाले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
उर्वरित आयपीएल २०२१ ची तयारी सुरू; कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या सदस्यांनाच जाता येणार युएईला
भारतीय गोल्फर अदितीच्या पदरी अपयश; म्हणाली, ‘चौथ्या स्थानावर समाधान मानू तरी कसे’
नीरजला ‘आदर्श’ म्हणणारे ट्वीट पाकिस्तानी भालाफेकपटूने केले डिलीट; उमटतायत प्रतिक्रिया