युवा खेळाडूंच्या मदतीने २००८ साली आयपीएलचा पहिला हंगाम जिंकणारा राजस्थान रॉयल्सचा संघ,२०२१ साली पुन्हा तरुणांवर विश्वास दाखवून चांगली कामगिरी करण्यास सज्ज झाला आहे. स्टीव्ह स्मिथ, रॉबिन उथप्पा या ज्येष्ठ खेळाडूंना संघाने बाहेर जाण्याचा मार्ग दाखविला आहे, आणि पुन्हा एकदा यशस्वी जयस्वाल आणि कार्तिक त्यागी या तरूण खेळाडूंवर विश्वास दाखविला आहे. राजस्थान रॉयल्सकडे आगामी आयपीएल मोसमातील एक मजबूत संघ आहे. संघात अनुभवाचा थोडासा अभाव असला तरी,जोस बटलर आणि बेन स्टोक्ससारख्या दिग्गजांनी ही पोकळी नक्कीच भरेल.
यंदाच्या हंगामापूर्वी संजू सॅमसनला कर्णधार बनवून संघाने सर्वात मोठा बदल केला आहे. सॅमसन हा या संघातील सर्वात आशादायक फलंदाज आहे. सॅमसनशिवाय जयस्वाल, स्टोक्स, बटलर, वोहरा आणि तेवोतियासारखे फलंदाज या संघात उपलब्ध आहेत, ज्यांनी आयपीएलमध्ये आपली उत्तम कामगिरी दाखविली आहे. गेल्या मोसमात राजस्थान रॉयल्ससाठी सर्वाधिक धावा, सध्याच्या कर्णधार संजू सॅमसनने केल्या होत्या. यावेळीसुद्धा संघासाठी असे अनेक फलंदाज आहेत, जे आगामी मोसमात संघासाठी सर्वाधिक धावा करू शकतात.
या लेखात राजस्थान रॉयल्सच्या ३ उत्तम फलंदाजांविषयी चर्चा करणार आहोत, जे आयपीएल २०२१मध्ये संघासाठी सर्वाधिक धावा करू शकतात.
१. बेन स्टोक्स –
आयपीएलमध्ये इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सने अनेकदा फलंदाजीचा पराक्रम दाखविला आहे. संघामध्ये चौथ्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज असूनही, स्टोक्सने गेल्या वर्षी राजस्थान रॉयल्ससाठी फक्त ८सामने खेळले. स्टोक्सने शतक आणि अर्धशतकाच्या मदतीने ८ सामन्यात २८५ धावा केल्या होत्या. या हंगामात स्टोक्सला खेळण्याची संधी मिळाली तर, तो नक्कीच संघासाठी सर्वाधिक धावा करू शकतो.
२. संजू सॅमसन –
भारतीय फलंदाज संजू सॅमसन हा या मोसमात आयपीएलमधील राजस्थान रॉयल्सचा कर्णधार आहे, आणि तो संघातील सर्वात प्रमुख फलंदाज देखील आहे. आयपीएलच्या प्रत्येक हंगामाच्या पहिल्या काही सामन्यांमध्ये सॅमसनने दणका दिला, परंतु स्पर्धेच्या अंतिम टप्प्यापर्यंत त्याने सुसंगतता गमावली. असे असूनही, तो गेल्या मोसमात संघासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. सॅमसनने १४ सामन्यात ३ अर्धशतकांच्या मदतीने ३७५ धावा केल्या होत्या. या हंगामात सॅमसनला आपल्या फलंदाजीसह दमदार कामगिरी करुन भारतीय संघात स्वतःचे स्थान निश्चित करायला नक्किच आवडेल.
३. जोस बटलर
इंग्लंडचा यष्टीरक्षक आणि फलंदाज जोस बटलर राजस्थान रॉयल्ससाठी खूप उपयुक्त फलंदाज आहे. गत सत्रात बटलरने १२ डावात ३२८ धावा केल्या. पहिल्या काही सामन्यांमध्ये बटलरला वरच्या फळीत खेळण्याची संधी मिळाली आणि नंतर फिनिशरची भूमिका करावी लागली. जर बटलरकडे पुरेशी संधी असती, तर तो गेल्या मोसमात संघासाठी सर्वाधिक धावा करू शकला असता. यंदाच्या हंगामात बटलरला, वरच्या फळीत खेळण्याची अपेक्षा असून, त्याचा फॉर्मही चांगला असल्याने, तो आगामी मोसमात संघासाठी सर्वाधिक धावा करण्यास सक्षम असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
रविंद्र जडेजा आयपीएलमध्ये खेळणार की नाही? सीएसकेकडून आले ‘असे’ उत्तर
INDvENG: दुसऱ्या वनडे सामन्यात रोहित, विराटला मोठे रेकॉर्ड करण्याची संधी, जाणून घ्या खास आकडेवारी
‘इंडिया का अपना मंत्रा’ आयपीएल २०२१ चे नवे अँथम साँग रिलीज; व्हिडिओ पाहून म्हणाल क्या बात!