शुक्रवारी इंडियन प्रीमीयर लीगने १४ व्या हंगामाच्या लिलावासाठी नोंदणी केलेल्या क्रिकेटपटूंची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार १०९७ खेळाडूंनी लिलावासाठी आपल्या नावाची नोंदणी केली आहे. ज्यात २८३ परदेशी तर ८१४ भारतीय क्रिकेटपटूंनी नाव नोंदणी केली आहे. आता या खेळाडूंचा लिलाव १८ फेब्रुवारीला चेन्नई येथे होणार आहे.
या लिलावासाठी खेळाडूंनी त्यांची आधारभूत किंमत २० लाख ते २ कोटींपर्यंत ठेवली आहे. आयपीएल लिलावासाठी नोंदणी केलेल्या खेळाडूंपैकी ११ असे खेळाडू आहेत, ज्यांनी त्यांची मूळ किंमत २ कोटी ठेवली आहे. या खेळाडूंबद्द थोडक्यात या लेखातून जाणून घेऊ.
स्टिव्ह स्मिथ –
राजस्थान रॉयल्सने मागीलवर्षी त्यांचा कर्णधार राहिलेल्या स्टिव्ह स्मिथला १४ व्या हंगामाच्या लिलावाआधी संघातून मुक्त केले. त्यामुळे तो आता लिलावासाठी उपलब्ध झाला आहे. त्याने त्याची आधारभूत किंमतही २ कोटी ठेवली आहे. स्मिथसाठी मागील हंगाम फारसा बरा गेला नव्हता. त्याने १४ सामन्यात ३११ धावा केल्या होत्या. तसेच त्याच्या नेतृत्वाखाली राजस्थान संघ गुणलिकेत अखेरच्या क्रमांकावर राहिले होते.
स्मिथने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत ९५ सामने खेळले असून ३५.३४ च्या सरासरीने २३३३ धावा केल्या आहेत. यात त्याच्या १ शतकाचा आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे.
ग्लेन मॅक्सवेल
ऑस्ट्रेलियाचा दुसरा स्टार खेळाडू ज्याने आपली आधारभूत किंमत २ कोटी ठेवली आहे, तो म्हणजे ग्लेन मॅक्सवेल. मॅक्सवेल नेहमीच त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ओळखला जातो. मात्र, मागील काही आयपीएल हंगामात त्याची फलंदाजी अपेक्षेप्रमाणे बहरली नाही. त्याने मागील हंगामात १५.४२ च्या सरासरीने केवळ १०८ धावा केल्या आणि ३ विकेट्स घेतल्या. त्यामुळे १४ व्या हंगामाच्या लिलावापूर्वी किंग्स इलेव्हन पंजाबने त्याला मुक्त केले आहे.
भारताच्या २ खेळाडूंनी ठेवली २ कोटी अधारभूत किंमत –
भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग आणि अष्टपैलू क्रिकेटपटू केदार जाधव या दोन भारतीय खेळाडूंनी १४ हंगामाच्या लिलावासाठी त्यांची मूळ किंमत २ कोटी रुपये ठेवली आहे. या दोघांनाही लिलावाआधी चेन्नई सुपर किंग्स संघाने मुक्त केले आहे. केदार १३ व्या हंगामात पुर्णपणे अपयशी ठरला होता. त्याने ८ सामन्यात ६२ धावा केल्या होत्या. तसेच हरभजन मागील हंगाम खेळलाच नव्हता.
इंग्लंडच्या ५ खेळाडूंची मूळ किंमत २ कोटी
इंग्लंडकडून खेळणाऱ्या ५ खेळाडूंनी त्यांची लिलावासाठी मूळ किंमत २ कोटी ठेवली आहे. यात मोईन अली, सॅम बिलिंग्स, लियाम प्लंकेट, जेसन रॉय आणि मार्क वूड यांचा समावेश आहे. मोईन अलीला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने लिलावाआधी मुक्त केले आहे. त्याने १३ व्या हंगामात ३ सामन्यात १२ धावा केल्या होत्या आणि १ विकेट घेतली होती. तर बिलिंग्स २०२० चा आयपीएल हंगाम खेळला नव्हता. त्याने आयपीएलमध्ये २२ सामने खेळले असून ३३४ धावा केल्या आहेत. तसेच जेसन रॉयने ८ सामने आयपीएलमध्ये खेळले असून १७९ धावा केल्या आहेत. तर मार्क वूडने केवळ १ सामना २०१८ ला चेन्नई सुपर किंग्सकडून खेळला आहे.
शाकिब अल हसन आणि कॉलिन इंग्रामचीही मूळ किंमत २ कोटी –
बांगलादेशचा अष्टपैलू क्रिकेटपटू शाकिब अल हसनला सनरायझर्स हैदराबादने आयपीएल लिलावाआधी मुक्त केले असून त्याने आत्तापर्यंत ६३ सामन्यात ७४६ धावा केल्या असून ५९ विकेट्स घेतल्या आहेत. तर कॉलिन इंग्रामने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये १५ सामने खेळले असून २०५ धावा केल्या आहे. या दोघांनीही त्यांची १४ व्या आयपीएलच्या लिलावासाठी २ कोटी मुळ किंमत ठेवली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
गुगल गंडल! ६० वर्षीय रवी शास्त्रीचं गुगलवरील वय चक्क दुप्पट, खोट वाटतंय तर सर्च करुन पाहा
सलामीचा फलंदाज असणारा श्रीसंत ‘असा’ झाला वेगवान गोलंदाज
भारतीय संघाच्या व्यस्त वेळापत्रकाबाबत रवी शास्त्री यांनी केले भाष्य; ‘या’ गोष्टीची केली मागणी