भारतीय क्रिकेट आणि दिल्ली कॅपिटल्ससाठी शनिवारचा दिवस भावनिक होता, कारण त्या दिवशी ऋषभ पंत तब्बल 454 दिवसांनंतर क्रिकेटच्या मैदानावर परतला. पंतचा डिसेंबर 2022 मध्ये भीषण कार अपघात झाला होता. तेव्हापासून तो मैदानाबाहेर होता. त्यामुळे पंत नव्या आयुष्यासह परतला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
ऋषभ पंतच्या बाबतीत, त्याच्या कामगिरीपेक्षा त्याचं मैदानात पुनरागमन महत्त्वाचं होतं. पंतनं मैदानावर आपलं 100 टक्के देण्याचा प्रयत्न केला आणि संघात नवी ऊर्जा आणली. पंतच्या पुनरागमनामुळे सूर्यकुमार यादव खूप खूश झाला आहे. त्यानं सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली, जी वेगानं व्हायरल होत आहे.
सूर्यकुमार यादवनं एक व्हिडिओ पोस्ट केला. याच्या कॅप्शन मध्ये त्यानं लिहिलं की, “आम्ही सर्वजण या क्षणाची वाट पाहत होतो. अनेक प्रेरणादायी चित्रपट पाहिले आहेत. परंतु या वास्तविक जीवनाच्या कथेची तुलना नाही.” इथे नमूद करण्यासारखी बाबा म्हणजे, जेव्हा ऋषभ पंत फलंदाजीसाठी क्रीजवर आला तेव्हा मैदानातील प्रेक्षकांनी उभं राहून टाळ्या वाजवून त्याचं स्वागत केलं.
Moment we all have been waiting for. Inspirational movies bahut dekhi hain par iss real life story ka koi tod nai 🙏🏻✊🏼🤗❤️ @RishabhPant17 pic.twitter.com/glmbtBBKOw
— Surya Kumar Yadav (@surya_14kumar) March 23, 2024
दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला मात्र पंतच्या पुनरागमनाचा आनंद साजरा करता आला नाही. मुल्लानपूर येथे झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जनं त्यांचा 4 गडी राखून पराभव केला. दिल्ली कॅपिटल्सनं प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 9 गडी गमावून 174 धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाब किंग्जनं 19.2 षटकांत 6 गडी गमावून लक्ष्य गाठलं.
पंतच्या वैयक्तिक कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्यानं 13 चेंडूत दोन चौकारांच्या मदतीनं 18 धावा केल्या. याशिवाय पंतनं एक स्टंपिंग केलं आणि एक झेल घेतला. सध्या सुरू असलेल्या आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करून ऋषभ पंतला यंदाच्या टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान पक्के करण्याची संधी आहे.
ऋषभ पंतनं आयपीएलमध्ये आतापर्यंत 98 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यानं 2838 धावा केल्या आहेत. याशिवाय पंतनं भारतासाठी 33 कसोटीत 2271 धावा केल्या आहेत. त्याच्या नावे 30 एकदिवसीय सामन्यांमध्ये 865 धावा आहेत. ऋषभ पंतनं टीम इंडियासाठी 66 टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 987 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
विराट कोहलीची खिल्ली उडवल्यानं Carryminati अडचणीत, द्यावं लागलं स्पष्टीकरण
लिलावात विकल्या न गेलेल्या खेळाडूनं पदार्पणातच ठोकलं अर्धशतक! हैदराबादच्या गोलंदाजांची नाचक्की