विकेटकीपर फलंदाज इशान किशननं देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार पुनरागमन केलंय. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, सुरुवातीला त्याचं नाव संघात नव्हतं, मात्र तो अचानक प्लेइंग इलेव्हनमध्ये आला आणि त्यानं दमदार शतक ठोकलं!
इशान किशन दुलीप ट्रॉफी 2024 चा पहिला सामना दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. मात्र दुसऱ्या सामन्यात तो संघात आला आणि त्यानं दमदार शतक झळकावलं. इशान या सामन्यात फक्त फलंदाज म्हणून खेळणार आहे. संघात अभिषेक पोरेल यष्टिरक्षक म्हणून खेळतोय.
इशान किशननं चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत शतक ठोकलं. त्यानं 120 चेंडूत 14 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं प्रथम श्रेणी कारकिर्दीतील आपलं सातवं शतक पूर्ण केले. तो अशा वेळी फलंदाजीला आला, जेव्हा संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतग्रस्त होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला होता. दोन विकेट पडल्यानंतर त्यानं बाबा इंद्रजीतसह डाव पुढे नेला आणि संघासाठी महत्त्वाच्या क्षणी शतक झळकावलं.
इशान किशननं भारतासाठी दोन कसोटी सामने खेळले आहेत. याशिवाय त्यानं 27 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि 32 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये देशाचं प्रतिनिधित्व केलंय. भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावे द्विशतक आहे. याशिवाय त्यानं कसोटीत एक अर्धशतक, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 7 आणि टी20 क्रिकेटमध्ये 6 अर्धशतकं झळकावली आहेत. इशाननं याआधी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 50 सामन्यांमध्ये 6 शतकं झळकावली होती.
गेल्या वर्षी देशांतर्गत क्रिकेट न खेळल्यामुळे बीसीसीआयनं इशानला बोर्डाच्या केंद्रीय करारातून वगळलं होतं. तेव्हापासून तो भारतीय संघाबाहेर आहे. इशानचा आयपीएल 2024 चा हंगामही काही खास राहिला नव्हता. आता त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल.
हेही वाचा –
मोहम्मद शमी पत्नीला पोटगी म्हणून महिन्याला किती रुपये देतो? आकडा धक्कादायक!
कसोटीमध्ये टी20 स्टाईल फलंदाजी, आयपीएल गाजवणारा खेळाडू दुलीप ट्रॉफीत पुन्हा एकदा फ्लॉप
भारत-बांगलादेश कसोटी मालिकेपूर्वी चेंडूवरून गोंधळ…एसजी आणि कुकाबुरा बॉलमध्ये फरक काय?