माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा यांनी लखनऊ सुपर जायंट्सला आयपीएल 2025 च्या लिलावापूर्वी तीन खेळाडूंना रिटेन करण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, संघानं कर्णधार केएल राहुलला रिटेन करायला हवं. मेगा लिलावापूर्वी एक फ्रँचायझी जास्तीत जास्त 6 खेळाडूंना रिटेन करू शकते.
आकाश चोप्रा यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर सांगितलं की, त्यांच्या मते असे तीन खेळाडू आहेत, ज्यांना एलएसजी रिटेन करू शकते. चौथा मयंक यादवच्या रुपात अनकॅप्ड भारतीय खेळाडू असू शकतो. मात्र मयंकनं 31 ऑक्टोबरपूर्वी भारतीय संघासाठी पदार्पण केलं, तर तो अनकॅप्ड खेळाडू राहणार नाही. त्यानंतर लखनऊला मयंकसाठी राईट टू मॅच (RTM) कार्ड वापरता येईल.
आकाश चोप्रा म्हणाले की, “पहिला खेळाडू केएल राहुल आहे. तुम्हाला त्याला कर्णधारही बनवायचंय. तो फ्रँचायझीचा चेहरा आहे. तो 18 कोटी रुपयांपेक्षा कमीमध्ये मिळणार नाही. राहुल लिलावात गेला, तर तो 18 कोटी रुपये नक्कीच घेईल. तसंही तुम्ही तुमच्या कर्णधाराला सोडू शकत नाही. संघातील सातत्य कायम राखण्यासाठी कर्णधाराचं राहणं खूप महत्वाचं असतं.”
आकाश चोप्रा पुढे म्हणाले की, “दुसऱ्या क्रमांकावर वेस्ट इंडिजचा निकोलस पूरन आहे. एलएसजीनं गेल्या हंगामात पूरनला 16 कोटी रुपये दिले होते. त्याची तेवढी किंमत आहे. त्यानं टी20 क्रिकेटमध्ये ज्या प्रकारची कामगिरी केली, ती लक्षात घेता पूरनला रिटेन करायला हवं.”
आकाश चोप्रा पुढे म्हणाले, “मी तिसऱ्या क्रमांकावर रिटेन्शनसाठी कोणत्याही भारतीय खेळाडूचा विचार करत नाही. मी देवदत्त पडिक्कल, रवी बिश्नोई यांचा विचार करत नाही, कारण स्पिनर 11 कोटींवर जाणार नाही. मी क्रुणाल पांड्याबद्दलही विचार करत नाही. तो चांगला खेळाडू आहे, मात्र त्याचे कौशल मर्यादित आहे. मी तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मार्कस स्टॉइनिसचा विचार करतोय. त्याला याआधीही 10 कोटी रुपयांमध्ये रिटेन करण्यात आलं होतं. तो गेम चेंजर खेळाडू आहे. मी या तिघांचा विचार करतोय. जर मयंक अनकॅप्ड राहिला तर त्याला रिटेन करता येईल, नाहीतर त्याला लिलावात जाऊ द्या आणि ‘राईट टू मॅच’ वापरा.”
हेही वाचा –
यशस्वी जयस्वालचा बंंपर फायदा, विराट कोहलीची आगेकूच, पाहा आयसीसीची ताजी रँकिंग
जसप्रीत बुमराहचा मोठा धमाका, कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी झेप! टॉप 5 गोलंदाज जाणून घ्या
रोहित शर्माच्या या ‘मास्टरप्लॅन’मुळे बांगलादेशचा पराभव, अश्विननं उघड केलं रहस्य