मुंबई । आयपीएलमध्ये केवळ क्रिकेटच नाही तर त्यासोबतच सौंदर्याचा तडका देखील पहायला मिळतो. ही स्पर्धा सुरू झाल्यापासून चाहते समालोचकांपासून ते चिअर्स लीडरपर्यंत सर्वांचीच चर्चा करत असतात. दरम्यान, भारतातील सर्वात प्रसिद्ध महिला क्रीडा अँकर (निवेदिका) मयंती लँगरबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएलच्या ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्सने मयंती लँगरला आयपीएल 2020 च्या अँकरच्या यादीमध्ये स्थान दिले नाही. म्हणजे 13 व्या हंगामात, मयंती लँगर अँकरिग करताना दिसणार नाही.
स्टार स्पोर्ट्सने काही नवीन महिला अँकरला आपल्या चमूत स्थान दिले आहे. ऑस्ट्रेलियाची प्रसिद्ध टीव्ही निवेदिका नेरोली मीडोजवर आयपीएल 2020 साठी करार केला गेला आहे. याशिवाय आयपीएल अँकरिंगसाठी सुरेन सुंदरम, कियारा नारायणन, नशप्रीत कौर, तान्या पुरोहित यांना संधी देण्यात आली आहे.
कियारा आणि तान्या पुरोहित यांचे बॉलीवूडशी संबंध आहेत. तान्या पुरोहितने अनुष्का शर्माबरोबर नॅशनल हायवे -10 या चित्रपटात काम केले आहे.
मयंती लँगरचा देशात मोठी फॅन फॉलोइंग आहे आणि या हंगामात ती अँकर नसणे तिच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का आहे. मयंती लँगरने इंडियन क्रिकेट लीगमधून क्रीडा अँकरिंग सुरू केले आणि त्यानंतर तिची गणना केवळ भारतातच नाही, तर गेल्या काही वर्षांत जगातील अव्वल महिला क्रिडा अँकरमध्येही केली जाते. आई झाल्यामुळे तीनेच आयपीएलमधून माघार घेतल्याचे बोलले जात आहे.