भारतीय संघाचा माजी विश्वविजेता कर्णधार एमएस धोनीने यावर्षी १५ ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर तो संयुक्त अरब आमिरतीत आयोजित करण्यात आलेल्या आयपीएलच्या तेराव्या हंगामात देखील खेळताना दिसून आला होता. त्यामुळे धोनी निवृत्ती मागे घेऊन १० जानेवारीपासून सुरु होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतून पुनरागमन करेल, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र धोनीने या अफवा असल्याचे सांगत पुनरागमन करणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला.
मुश्ताक अली स्पर्धेद्वारे देशांतर्गत क्रिकेटची सुरुवात
कोरोना महामारीमुळे देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वच स्पर्धा काही काळासाठी स्थगित करण्यात आल्या होत्या. मात्र येत्या १० जानेवारीपासून सुरु होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेने पुन्हा एकदा देशांतर्गत क्रिकेटची सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा १० ते ३१ जानेवारी दरम्यान सहा राज्यांमध्ये जैव सुरक्षित वातावरणात खेळविण्यात येईल.
कोरोना काळातच एमएस धोनीने अचानक निवृत्ती जाहीर करत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. परंतु तरीही सय्यद मुश्ताक अली स्पर्धेसाठी झारखंडच्या संघात त्याचा समावेश करण्यात येईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र आता धोनीने स्वत:च या शक्यतेचा इन्कार केला आहे. अर्थात आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठी तो उपलब्ध असेल, असेही त्याने स्पष्ट केले आहे.
उत्तर प्रदेश संघाकडून खेळणार सुरेश रैना
धोनीच्या निवृत्तीसोबतच त्याचा खास मित्र सुरेश रैनाने देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत उत्तर प्रदेशच्या संघाकडून रैना खेळणार आहे. या डावखुऱ्या फलंदाजाने उत्तर प्रदेशच्या संघसहकाऱ्यांसह स्पर्धेच्या सरावाला देखील प्रारंभ केला आहे. रैना जवळपास वर्षभरानंतर स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन करीत आहे. नुकत्याच झालेल्या आयपीएलच्या तेराव्या हंगामात वैयक्तिक कारणांमुळे रैना सहभागी होऊ शकला नव्हता.
महत्वाच्या बातम्या:
– IND vs AUS : पहिल्या दिवसाखेर भारताच्या १ बाद ३६ धावा, पदार्पण करणाऱ्या शुबमन गिलची शानदार सुरुवात
– बॉक्सिंग डे कसोटी : पहिल्या दिवसाअखेर न्यूझीलंडच्या ३ बाद २२२ धावा, केन विलियम्सन शतकाच्या जवळ
– सय्यद मुश्ताक अली स्पर्धेसाठी दिल्लीच्या संघाची धुरा गब्बरवर; भारताचा हा प्रमुख वेगवान गोलंदाजही करणार पुनरागमन