इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) चौदावा हंगाम पुन्हा रविवारपासून (१९ सप्टेंबर) संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) येथे सुरू होणार आहे. यापूर्वी या हंगामातील पहिला टप्पा भारतात ९ एप्रिल ते २ मे दरम्यान खेळवण्यात आला होता. परंतु कोरोना व्हायरसच्या कारणास्तव हंगामातील उर्वरित सामने होऊ शकले नाहीत. आता हेच राहिलेले सामने अर्थातच हंगामाचा दुसरा टप्पा भारताबाहेर युएईत आयोजण्यात आला आहे. या टप्प्याची सुरुवात दुबई येथे गतवर्षीचा विजेता मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्याने होणार आहे.
आयपीएल २०२१ मध्येच हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात मुंबईने ४ विकेट्सने चेन्नईला पराभूत केले होते. युएईतही मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा हाच संघ कायम ठेवेल. परंतु दुबईच्या मैदानाची परिस्थिती पाहता तो थोडेफार बदल करण्यावर भर देईल.
रोहितसोबत विस्फोटक यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक सलामीला येऊ शकतो. तसेच डी कॉकवर यष्टीरक्षणाचीही जबाबदारी असू शकते. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर धुव्वादार फटकेबाजी करणारा सूर्यकुमार यादव फलंदाजीसाठी उतरू शकतो. सूर्यकुमारच्या जोडीला इशान किशनला पाठवले जाऊ शकते. इशानला यापूर्वी भारतात मुंबई विरुद्ध चेन्नई यांच्यात झालेल्या सामन्यामध्ये संधी मिळाली नव्हती. परंतु त्याचा सध्याचा फॉर्म पाहता दुबईतील सामन्यात त्याला संधी मिळणे जवळजवळ निश्चित असेल. त्यानंतर कायरन पोलार्ड, हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या हे तिघे मधल्या फळीला आणखी मजबूत बनवतील.
गोलंदाजी विभागात कर्णधार रोहित फिरकीपटू राहुल चाहर आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांच्यासोबत जाण्याचा विचार करेल. तर परदेशी वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट यालाही संधी देईल. या ३ अनुभवी गोलंदाजांना साथ देण्यासाठी नाथन कूल्टर नाइल किंवा जयंत यादव यांच्यापैकी एकाला अंतिम ११ मध्ये सहभागी केले जाऊ शकते. दुबईच्या खेळपट्टीवरुन कर्णधार रोहित या दोघांपैकी एकाची निवड करेल. जर खेळपट्टी वेगवान गोलंदाजीस पोषक असल्यास कूल्टर नाइलचा समावेश केला जाईल, किंवा जर फिरकी गोलंदाजीस पोषक असल्यास जयंतला प्राधान्य दिले जाईल.