भारताचे शेजारी राष्ट्र असलेल्या अफगाणिस्तानची एकूणच परिस्थिती सध्या अत्यंत गंभीर झाली आहे. अफगाणिस्तान सरकारचा पाडाव करून तालिबानने २० वर्षांनंतर पुन्हा एकदा देशावर कब्जा केला असून, देशातील नागरिक इतरत्र स्थलांतर करण्याचा प्रयत्न करत आहेत. तालिबानकडून निरपराध लोकांची हत्या होत असताना जगभरातून याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. याचा फटका आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटला बसण्याची शक्यता आहे.
न्यूझीलंड पाकिस्तानचा दौरा करणार का?
सप्टेंबर महिन्यात न्यूझीलंडचा पाकिस्तान दौरा नियोजित आहे. या दौऱ्यावर उभय संघांमध्ये तीन वनडे व पाच टी२० सामने खेळले जातील. ११ सप्टेंबर रोजी पाकिस्तानमध्ये पोहोचल्यानंतर ३ ऑक्टोबर दरम्यान लाहोर व रावळपिंडी येथे या मालिका होणार आहेत. मात्र, हा दौरा तालिबान संकटामुळे अडचणीत आला आहे.
न्यूझीलंडच्या काही खेळाडूंनी अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या परिस्थितीविषयी चिंता व्यक्त केली असून, याकाळात अफगाणिस्तानचे शेजारी राष्ट्र असलेल्या पाकिस्तान दौऱ्यावर जाण्याबाबत ते साशंक आहेत. यासाठी न्यूझीलंड क्रिकेट बोर्ड आंतरराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रेग डिकासन यांची मदत घेणार आहे. डिकासन हे ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस पाकिस्तान येथे जाऊन तालिबान व कोविड परिस्थितीचा अंदाज घेत न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाला अहवाल सादर करतील. त्यानंतरच या दौर्याविषयी अंतिम निर्णय घेतला जाईल.
न्यूझीलंडचा दुय्यम संघ जाणार पाकिस्तानात
न्यूझीलंडचा पाकिस्तान दौरा निश्चित झाला तरी, काही वरिष्ठ खेळाडू या दौऱ्यावर जाणार नाहीत. या दौऱ्याच्या काळातच न्यूझीलंडचे प्रमुख खेळाडू इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) उर्वरित हंगामात खेळताना दिसतील. आयपीएलमध्ये न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन, लॉकी फर्ग्युसन, जिमी निशाम, फिन ऍलन, कायले जेमिसन, टिम सिफर्ट, ट्रेंट बोल्ट, मिचेल सॅन्टनर, ऍडम मिल्ने व स्कॉट कुगलीन हे खेळाडू खेळताना दिसतात.
महत्त्वाच्या बातम्या-
विश्वचषकासाठी संघ निवडताना निवडसमितीला करावी लागणार तारेवरची कसरत, आहेत ‘इतके’ पर्याय
धक्कादायक! भारताच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूवर चोरीचा आरोप, होऊ शकते पोलिस कारवाई