त्याने सन २०१२-२०१३ मध्ये अनेक वर्णद्वेषी आणि लैंगिकतावादी ट्वीट केले होते, त्याप्रकरणाची चौकशी इंग्लंड क्रिकेट बोर्ड करत असल्याने ही चौकशी पूर्ण होईपर्यंत रॉबिन्सनला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळता येणार नाही. त्यामुळे आता तो एजबस्टनला न्यूझीलंडविरुद्ध १० जूनपासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यालाही मुकणार आहे.
विशेष म्हणजे रॉबिन्सनने लॉर्ड्स कसोटीतून पदार्पण केले होते. या पदार्पणाच्या सामन्यात त्याने पहिल्या डावात ४ विकेट्स आणि दुसऱ्या डावात ३ विकेट्स अशा मिळून ७ विकेट्स घेतल्या होत्या. यामध्ये त्याने केन विलियम्सन, रॉस टेलर, टॉम लॅथम अशा दिग्गज खेळाडूंच्या विकेट मिळवल्या होत्या.
केले होते असे ट्विट्स
रॉबिन्सन याने २०१२-२०१३ सालामध्ये केलेल्या आपल्या जुन्या ट्विटमध्ये काही शब्दांचा वापर करून विशिष्ट धर्मातील लोकांचा दहशतवादाशी संबंधित असल्याचे म्हटले होते. इतकेच नाही तर महिला आणि आशियाई वंशाच्या लोकांवरही अपमानास्पद भाष्य केले गेले होते. त्याचे हे जुने ट्विट्स त्याने लॉर्ड्स कसोटीत पदार्पण केल्याच्या पहिल्याच दिवशी व्हायरल झाले होते.
त्याचे झाले असे की लॉर्ड्स कसोटी सामन्यापूर्वी इंग्लंड संघाने काळी जर्सी परिधानकरुन क्रिकेटमध्ये कोणत्याही भेदभावाला स्थान नसून हा खेळ सर्वांसाठी समान आहे, असा संदेश देण्याचा प्रयत्न केला होता. इंग्लंडच्या या कृत्याचे सर्व स्तरातून कौतुक झाले होते. मात्र, त्याचवेळी यानंतर रॉबिन्सनचे ९ वर्षांपूर्वीचे काही ट्विट्स व्हायरल झाले. त्यामुळे तो वादाच्या भोवऱ्यात अडकला.
काऊंटी संघाकडून खेळण्याची परवानगी
रॉबिन्सनला चौकशी सुरु असे पर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची परवानगी नसली तरी त्याला त्याचा काऊंटी संघ ससेक्सकडून खेळण्याची परवानगी असणार आहे. तसेच त्याला आता लगेचच इंग्लंड संघाच्या कॅम्पमधून बाहेर पडावे लागणार आहे. आता हे पाहाणे औत्सुक्याचे ठरेल की इंग्लंड क्रिकेट बोर्ड चौकशीनंतर रॉबिन्सनवर कोणती कारवाई करणार. त्याला दंड केला जाऊ शकतो किंवा काही सामन्यांसाठी त्याला निलंबित केले जाऊ शकते.
रॉबिन्सनने मागितली माफी
या प्रकरणाबद्दल रॉबिन्सनने लगेचच माफी मागितली होती. त्याने ड्रेसिंग रूममध्ये सहकारी खेळाडूंसमोर माफी मागितली.
तसेच न्यूझीलंड विरुद्ध लॉर्ड्स कसोटीचा पहिला दिवस संपल्यानंतर थोड्याच वेळात रॉबिन्सन याने एक निवेदन प्रसिद्ध करत म्हटले होते की, ‘माझ्या कारकीर्दीतील सर्वात मोठ्या दिवशी मी ९ वर्षांपूर्वी पोस्ट केलेल्या वर्णद्वेषी आणि लैंगिकतावादी ट्विटसची लाज वाटते. मला हे स्पष्ट करायचं आहे की, मी वर्णद्वेषी किंवा लिंगवादी नाही. मला माझ्या कृत्याचा पश्चात्ताप आहे. जर माझ्या कृतीमुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर, मी बिनशर्त माफी मागतो. मी विचार न करता बेजबाबदारपणे वागलो. माझी कृती क्षमा करण्यासारखी नाही. त्यावेळी मी तितकासा समजूतदार नव्हतो. मी दिलगिरी व्यक्त करतो.’
रॉबिन्सनने आत्तापर्यंत ६४ प्रथमश्रेणी सामने खेळताना २८६ बळी मिळवले आहे. सोबतच १ शतक व ७ अर्धशतके देखील आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
ENG vs NZ : न्यूझीलंडच्या अथक प्रयत्नांनंतरही इंग्लंडला पहिला कसोटी अनिर्णिक राखण्यात यश
महत्त्वाची बातमी! दिग्गज रॉजर फेडररची फ्रेंच ओपनमधून माघार; दिले ‘हे’ कारण
कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी युवीने वाचला भारतीय संघासमोरील अडचणींचा पाढा; म्हणाला…