प्रताप मंडळाने आयोजित केलेल्या ” स्व. सौ. गीताश्री गणेश चव्हाण” चषकाच्या द्वितीय श्रेणी कबड्डी स्पर्धेत सिद्धीप्रभा, भवानीमाता, शिवप्रेरणा यांनी उपांत्य फेरी गाठली. विकासचा मंगेश पवार आजच्या दिवसाचा मानकरी ठरला. त्याला आकर्षक पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. सिद्धीप्रभा विरुद्ध भवानीमाता, तर शिवप्रेरणा विरुद्ध जय ब्राम्हणदेव- हिंदमाता यांच्यातील विजेता संघ अशा उपांत्य लढती होतील.
प्रभादेवी येथील राजाराम साळवी उद्यानातील क्रीडांगणावर सुरू असलेल्या सामन्यात सिद्धीप्रभाने शेजारच्या विकासाला अत्यंत चुरशीच्या लढतीत ३४-२६असे नमवित झोकात उपांत्य फेरी गाठली. विवेक मोरे, प्रमोद यादव यांच्या चतुरस्त्र खेळाच्या जोरावर सिद्दीप्रभाने विकासवर पहिला लोण चढवित विश्रांतीला २२-१०अशी भक्कम आघाडी घेतली.
मध्यांतरानंतर मात्र विकासाच्या मंगेश पवार, सुशांत सावंत यांना सूर सापडला. त्यांनी संघला गुण मिळवून देत लोणची परतफेड करीत गुणांतील अंतर कमी केले. त्यावेळी २२-२५असे विकास अवघ्या ३गुणांनी पीछाडीवर होते. पण सिद्धिप्रभाच्या विवेक मोरेच्या एका फसव्या चढाईला विकासाचे ३गडी बळी पडले. येथेच सामना विकासाच्या हातून निसटला.
भवानीमाताने आदर्शचा अडथला ३६-२५ असा दूर करीत उपांत्य फेरीत धडक दिली. विश्रांतीला त्यांच्याकडे १६-११ अशी आघाडी होती. कल्पेश पवार, सुशांत धावडे भवानीमाताकडून, तर नेहाल दळवी, प्रमोद यादव आदर्शकडून उत्कृष्ठ खेळले. शेवटच्या सामन्यात शिवप्रेरणाने श्री संस्कृतीवर ३४-२५ अशी मात केली. मध्यांतराला १४-१३ अशी नाममात्र आघाडी घेणाऱ्या शिवप्रेरणाने दुसऱ्या डावात आपला खेळ उंचावत ९गुणांच्या मोठ्या फरकाने विजय साकारला.
सागर कापरे, शैलेश भुरवणे यांच्या धारधार चढाया व अजय टक्केच्या भक्कम बचावाला या विजयाचे श्रेय जाते. संस्कृतीकडून गणेश पिलाने, राहुल पाटील यांनी पूर्वार्धात कडवी लढत दिली, पण उत्तरार्धात मात्र ते ढेपाळले.
या अगोदर झालेल्या पहिल्या फेरीच्या लढतीत हिंदमाताने अमर सुभाषला ३०-१८असे पराभूत करीत आगेकूच केली. मध्यांतराला १५-०८अशी हिंदमाताकडे आघाडी होती. सागर पांचाळ हिंदमाताकडून, तर ओमकार दांडेकर अमर सुभाषकडून उत्तम खेळले.