भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान हैदराबाद येथे झालेल्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा अष्टपैलू मायकेल ब्रेसवेलने तुफानी शतक झळकावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. प्रथमच भारतात खेळत असलेल्या ब्रेसवेलचे या खेळीसाठी सर्वजण कौतुक करत आहेत. मात्र, हा तुफानी फलंदाजी करणारा तसेच उपयुक्त गोलंदाजी करणारा ब्रेसवेल नक्की कोण आहे? हे आपण जाणून घेऊया.
ब्रेसलेटचा जन्म न्यूझीलंडमधील मास्टरटन येथे 14 फेब्रुवारी 1991 रोजी झाला. ब्रेसवेलने वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. ऍडम गिलख्रिस्टला आपला आदर्श मानणारा मायकेल सुरुवातीला त्याच्याप्रमाणेच यष्टीरक्षण क्षकरायचा. मात्र नंतर त्याने उजव्या हाताने ऑफ – ब्रेक गोलंदाजी सुरू केली. हा निर्णय त्याच्या कारकिर्दीचा टर्निंग पॉइंट ठरला. ब्रेसवेलने गेल्या वर्षी मार्चमध्ये नेदरलँड्सविरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याच वर्षी त्याला जूनमध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी आणि जुलैमध्ये आयर्लंडविरुद्ध टी20 मध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. ब्रेसवेलने आतापर्यंत न्यूझीलंडसाठी 4 कसोटी, 17 वनडे सामने आणि 13 टी20 सामने खेळले आहेत.
ब्रेसवेलने गेल्या वर्षी त्याच्या टी20 कारकिर्दीतील पहिल्याच षटकात हॅट्रिक घेण्याचा पराक्रम केला होता. आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात या पराक्रमासह, ब्रेसवेल हा आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटच्या इतिहासातील पहिल्याच षटकात हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज ठरला. एवढेच नाही तर एकही षटक पूर्ण न करता तीन किंवा त्याहून अधिक बळी घेणारा ब्रेसवेल पहिला गोलंदाज आहे.
मायकेल ब्रेसवेलचे काका जॉन ब्रेसवेल, ब्रेंडन ब्रेसवेल आणि चुलत भाऊ डग ब्रेसवेल यांनीही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे. त्याचे वडील मार्क ब्रेसवेल प्रथमश्रेणी क्रिकेट खेळले आहेत. मायकेल आता जवळपास 31 वर्षांचा आहे, त्याने त्याच्या तुफानी खेळाच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. परंतु, ब्रेसवेलला न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी खूप उशीरा मिळाली. भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यानंतर ब्रेसवेल म्हणाला, “देशांतर्गत क्रिकेटच्या अनुभवाचा मला खूप फायदा झाला. हा अनुभव आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उपयोगी पडला.”
हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या वनडे सामन्यात ब्रेसवेलने अवघ्या 57 चेंडूत शतक झळकावले. त्याने बाद होण्यापूर्वी केवळ 78 चेंडूवर 12 चौकार व 10 षटकारांचा पाऊस पाडत 140 धावांची खेळी केली. यासह, न्यूझीलंडसाठी वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा तो तिसरा फलंदाज ठरला. त्याच्या आधी कोरी अँडरसनने 36 चेंडूत तर जेसी रायडरने 46 चेंडूत शतक झळकावले होते. ब्रेसवेलचे वनडे कारकिर्दीतील हे दुसरे शतक होते. विशेष म्हणजे त्याच्या दोन्ही शतकी खेळी आता इतिहासाचा भाग बनल्या आहेत.
(Story Of Newzealand All Rounder Michael Bracewell)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीय दिग्गजाने विराटला दिला रणजी खेळण्याचा सल्ला; म्हणाले, “न्यूझीलंडविरुद्ध…”
पाकिस्तानची नाचक्की सुरूच! तीन दिग्गजांनी मुख्य प्रशिक्षक होण्यास दिला नकार