टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी (१४ नोव्हेंबर) न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांना प्रथमच हे विजेतेपद पटकावण्याची संधी आहे. २०१० मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ इंग्लंडविरुद्ध अंतिम सामन्यात हरला होता. त्याचबरोबर न्यूझीलंडचा संघ यंदा प्रथमच अंतिम फेरीत खेळणार आहे. या सामन्याच्या आधी न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने एक विधान केले आहे. टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात आमच्या संघाने ऑस्ट्रेलियावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी स्वतःच्या खेळावर लक्ष केंद्रित करावे, असे केन विल्यम्सनने म्हटले आहे.
विल्यमसन म्हणाला की, “एक संघ म्हणून ऑस्ट्रेलियाकडे बरेच मॅच विनर्स खेळाडू आहेत आणि मला वाटते की हा त्यांच्या संघाच्या ताकदीचा मोठा भाग आहे. मात्र, आम्ही आमचे सारे लक्ष, आम्ही खेळू इच्छित असलेल्या क्रिकेटवर आणू इच्छितो आणि हीच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आम्ही मैदानावर जाऊ आणि आमच्या शैलीत खेळाचा आनंद घेऊ.”
न्यूझीलंड संघाचा कर्णधार पुढे म्हणाला, “आयसीसीच्या इतर कोणत्याही स्पर्धेत विजेता बनणे ही संघासाठी एक उपलब्धी असेल, पण यामुळे विचलित होणे मला आवडणार नाही. आपल्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करून योजनांची अंमलबजावणी करणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. अंतिम फेरीत पोहोचणे ही एक चांगली बाब आहे. अंतिम सामन्यात गोष्टी साध्य करण्यासाठी छोटछोट्या योजनांसाठी पुन्हा लक्ष केंद्रित करावे लागेल.”
उपांत्य फेरीत इंग्लंड संघाचा पराभव करून न्यूझीलंड संघाने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. १६७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाने इंग्लंडचा धुव्वा उडवत अंतिम फेरीत धडक मारली. जेम्स नीशम आणि डॅरिल मिशेलचा खेळ पाहण्यासारखा होता. आता पुन्हा एकदा अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाकडून रोमांचक कामगिरीची अपेक्षा केली जाऊ शकते.
दुसरीकडे, ऑस्ट्रेलियानेही उपांत्य फेरीत पाकिस्तानचा दणदणीत पराभव करत अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास केला आहे. अशा परिस्थितीत दोन्ही संघांमध्ये चुरशीच्या सामन्याची अपेक्षा केली जाऊ शकते. दोन्ही संघांवर विजय मिळवण्यासाठी निश्चितच दडपण असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
“आपण टी२० क्रिकेटमध्ये इतरांच्या तुलनेत खूप मागे”; भारतीय खेळाडूचा टीम इंडियाला घरचा आहेर
आपल्या प्रशिक्षणाविषयी भरत अरुण यांचे ‘ते’ विधान चर्चेत
न्यूझीलंडविरुद्ध एवढ्या सलामीवीरांचे करणार काय ? भारतीय दिग्गजाने विचारला प्रश्न