ब्रेंडन मॅक्यूलम…
हे नाव जरी उच्चारले तरी डोळ्यासमोर येतो एक विस्फोटक फलंदाज, चपळ क्षेत्ररक्षक, मितभाषी खेळाडू. क्रिकेट माहीत असणाऱ्या प्रत्येकाला हे नाव माहीतच पाहिजे. जी आयपीएल जगातील क्रिकेटची सर्वात मोठी स्पर्धा म्हणून प्रसिद्ध आहे, त्या आयपीएलची धमाक्यात सुरुवात करणारा खेळाडू म्हणजे ब्रेंडन मॅक्यूलम. मर्यादित षटकांच्या क्रिकेटचा आदर्श खेळाडू.
मॅक्यूलम वनडे व टी२० ज्या पद्धतीत खेळत त्याच पद्धतीत कसोटीत देखील खेळत. क्रिकेटच्या सर्व प्रकारात त्याने एकापेक्षा एक सरस खेळ्या खेळल्या आहेत. त्याच्या अशाच एका यादगार खेळीविषयी आज जाणून घेऊया.
२०१४ ला भारतीय संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर गेला होता. दोन कसोटी सामन्यांची छोटी मालिका होती. पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडने भारताला मात देत, मालिकेत आघाडी घेतली. न्युझीलंडकडून कर्णधार मॅक्यूलमने तडाखेबंद द्विशतक झळकावले होते.
दुसरा सामना वेलिंग्टन येथील बेसिन रिझर्व या मैदानावर होता. भारत मालिका बरोबरीत सोडविण्याच्या उद्देशाने मैदानात दाखल झाला. धोनीने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्यापासूनच भारतीय वेगवान गोलंदाजांनी न्युझीलंडच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. पहिल्या दिवशीच्या तिसऱ्या सत्राच्या सुरुवातीला भारताने यजमानांना अवघ्या १९२ धावांवर सर्वबाद केले. न्युझीलंडकडून केन विल्यमसनने सर्वाधिक ४७ धावा केल्या. ईशांत शर्माने ६ तर मोहम्मद शमीने ४ बळी आपल्या नावे केले.
भारताने आपला पहिला डाव सुरू केला. सलामीवीर मुरली विजय अवघ्या दोन धावा करू शकला. पाठोपाठ भारताची नवीन भिंत म्हणून तयार होत असलेला चेतेश्वर पुजारा १९ धावांची भर घालून परतला. पहिल्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा, शिखर धवन ७१ तर नाईट वॉचमन ईशांत शर्मा ३ धावांवर नाबाद होते.
दुसऱ्या दिवशी दोघांनी संयमाने डाव सुरू केला. ईशांत शर्मा आत्मविश्वासाने खेळत होता. पण, वैयक्तिक २६ धावा काढून तो बाद झाला. शिखर धवनचे शतक अवघ्या २ धावांनी हुकले. कसोटीत संधी मिळालेला रोहित शर्मा खाते उघडू शकला नाही. अचानक भारताचा डाव गडगडायला लागला. मैदानावर भारताचे दोन खंदे फलंदाज आले होते.
विराट कोहली व अजिंक्य रहाणे यांची जोडी जमली. एकेरी दुहेरी धावांसह खराब चेंडूवर त्यांनी चौकार देखील वसूल केले. दोघेही न्यूझीलंडच्या गोलंदाजांना वरचढ होऊ देत नव्हते. लंचपर्यंत दोघांनी भारताचा धावफलक दोनशे पलीकडे नेला. भारत आघाडीवर आला होता.
लंचनंतर, कोहली लवकर बाद झाला. रहाणेच्या सोबतीला कर्णधार धोनी आला. रहाणे तोपर्यंत चांगला जमला होता. त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. चहापानाला खेळ थांबला तेव्हा, दोघेही नाबाद राहिले. शेवटच्या सत्रात मात्र खेळ रोमांचक झाला. धोनीने अर्धशतक झळकावले आणि ६८ धावांवर बाद झाला. रहाणेसुद्धा वेगवान धावा काढू लागला. जडेजा व जहीर खानने आपले बॅट फिरवत २०-२० चेंडूत प्रत्येकी २६ व २२ धावा काढल्या. त्याच दरम्यान, अजिंक्य रहाणेने आपले पहिले कसोटी शतक पूर्ण केले. शेवटी भारताचा डाव ४३८ धावांवर संपुष्टात आला. भारताला २४६ धावांची भक्कम आघाडी मिळाली.
दुसऱ्या दिवसातील ९ षटके शिल्लक होती. त्या नऊ षटकात पीटर फुल्टनची विकेट गमावून न्यूझीलंडने २४ धावा बनविल्या.
सामन्याच्या तिसऱ्या दिवशीच, भारताला विजयाची संधी होती. झहीर खानने दिवसातील दुसऱ्या षटकात केन विल्यमसनला बाद करत भारताला ड्रायव्हिंग सीटवर आणले. हामिष रुदरफोर्ड वैयक्तिक ३५ धावा करून बाद झाला. न्यूझीलंडच्या नुकत्याच ५० धावा पूर्ण झाल्या होत्या. यानंतर मैदानात उतरला कर्णधार ब्रेंडन मॅक्यूलम.
टॉम लॅथमसोबत ३५ धावांची भागीदारी त्याने केली. अष्टपैलू कोरी अँडरसन आल्या पावली माघारी गेला. न्यूझीलंडचा निम्मा संघ तंबूत परतला होता आणि धाव फलकावर अवघ्या ९४ धावा लागलेल्या. न्युझीलंडला भारताला पुन्हा फलंदाजी करायला लावण्यासाठी अजून १५२ धावांची गरज होती.
मॅक्यूलमने डावाची सूत्रे आपल्या हाती घेतली. यष्टीरक्षक बीजे वाॅटलिंगसोबत संपूर्ण दिवस त्याने खेळून काढला. आपले शतक यादरम्यान त्याने पूर्ण केले होते. वॉटलिंग अर्धशतक काढून त्याला साथ देत होता. तिसऱ्या दिवसाअखेर, न्यूझीलंडची धावसंख्या होती २५२. न्यूझीलंडला नाममात्र आघाडी मिळाली. पण, अजून धोका टळला नव्हता.
चौथ्या दिवशी तसाच डाव दोघांनी सुरू ठेवला. भारतीय गोलंदाजांना पूर्णपणे हतबल करत ते न्यूझीलंडची आघाडी वाढवत राहिले. मॅकलमने आपले सलग दुसरे द्विशतक साजरे केले होते तर वॉटलिंगने सुद्धा त्याला तोलामोलाची साथ देत आपले शतक पूर्ण केले. अखेरच्या सत्रात वॉटलिंग वैयक्तिक १२४ धावा बनवून बाद झाला. दोघांनी सहाव्या विकेटसाठी विश्वविक्रमी ३५२ धावांची भागीदारी रचली होती.
आता मॅक्यूलमच्या साथीला आला होता आपला पहिलाच सामना खेळणारा अष्टपैलू जिमि नीशाम. नीशामने अगदी पहिल्या चेंडूपासून आक्रमण सुरू केले. मॅक्यूलमने एक बाजू लावून धरली असताना नीशाम जोरदार फलंदाजी करत होता. लवकरच त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. चौथ्या दिवसाच्या शेवटी न्यूझीलंडची धावसंख्या ५७१ इतकी झाली होती. मॅक्यूलम २८१ तर निशाम ६७ धावांवर नाबाद होते.
पाचव्या दिवशी सर्वजण मॅक्यूलमच्या त्रिशतकाची वाट पाहत होते. मॅक्यूलमने जास्त वाट पाहायला न लावता जहीर खानच्या चेंडूवर चौकार मारत न्युझीलंडसाठीचे पहिलेवहिले त्रिशतक पूर्ण केले. बाद होण्यापूर्वी त्याने ५५९ चेंडूंचा सामना करत ३०२ धावांची झकास खेळी केली. यात ३२ चौकार व ४ षटकारांचा समावेश होता.
मॅक्यूलम बाद झाल्यावर नीशामने टॉप गीअरमध्ये फलंदाजी सुरू केली. चौकारांची बरसात करत आपल्या पहिल्याच सामन्यात आक्रमक शतक झळकावले. त्याने फक्त १५४ चेंडूत १३७ धावा फटकावल्या होत्या. अखेर न्यूझीलंडने ६८० धावांचा एवरेस्ट गाठल्यानंतर आपला डाव घोषित केला. भारतासाठी ४३५ धावांचे अशक्यप्राय आव्हान होते.
विराट कोहलीने १०५ करून एकप्रकारे फलंदाजीचा सराव केला. भारताने राहिलेल्या वेळात १६६ धावा जमविल्या. दुसरी कसोटी अनिर्णित राहिली.
मॅक्यूलमने कप्तानी खेळी करत सामना अनिर्णित राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. २००२ नंतर प्रथमच भारताविरुद्ध न्यूझीलंडने मायदेशात कसोटी मालिका जिंकली होती.
ट्रेंडिंग लेख –
आयपीएल इतिहासातील ५ सर्वोच्च वैयक्तिक खेळी; २ खेळाडूंनी तर दोनदा केलाय हा पराक्रम
गेल्या १० वर्षात वनडे क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारे ५ अष्टपैलू खेळाडू….
४०० पेक्षा जास्त टी२० सामने खेळणारे ३ खेळाडू; तिघेही आहेत एकाच संघातील
महत्त्वाच्या बातम्या –
ज्या युवराजने ब्रॉडला ६ षटकार ठोकले, तोच युवराज आज ब्रॉडला म्हणतोय…
आयसीसी वनडे क्रमवारीत विराट कोहली अव्वल स्थानावर, तर रोहित आहे ‘या’ क्रमांकावर
आयपीएल २०२०चे वेळापत्रक बीसीसीआयने केले तयार; आता प्रतिक्षा फक्त संघांच्या मंजूरीची…