fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

कसोटी क्रिकेटमध्ये वेगवान अर्धशतक करणारे ४ फलंदाज

Top 4 batsmen with Fastest half-centuries in Test cricket (By Balls Faced)

कसोटी क्रिकेट हा सर्वात धीम्या गतीने खेळला जाणारा प्रकार समजला जातो. तसेच या क्रिकेट प्रकारात फलंदाजांच्या धैर्याची आणि संयमाची खऱ्या अर्थाने कसोटी लागते. पण असे असले तरी काही क्रिकेटपटू असे आहेत, ज्यांनी कसोटीतही आक्रमक फलंदाजी केली आहे. कसोटीमध्ये आत्तापर्यंत असे ४ क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी केवळ २५ किंवा त्यापेक्षा कमी चेंडूंचा सामना करत अर्धशतक केले आहे. या ४ क्रिकेटपटूंचा या लेखात आढावा घेण्यात आला आहे.

कसोटीत सर्वात जलद अर्धशतक करणारे क्रिकेटपटू (चेंडूंच्या तुलनेत) –

४. शेन शिलिंगफोर्ड – २५ चेंडू

वेस्ट इंडिजचा गोलंदाज शेन शिलिंगफोर्डने कारकिर्दीत १६ कसोटी सामने खेळताना ७० विकेट्स घेतल्या आहेत. पण याबरोबरच त्याने त्याच्या कारकिर्दीत फलंदाजी करताना एक अर्धशतकही केले आहे. विशेष म्हणजे हे अर्धशतक त्याच्यासाठी खास ठरले. कारण त्याने हे अर्धशतक केवळ २५ चेंडूत पूर्ण केले असल्याने कसोटीत सर्वात जलद अर्धशतक करणाऱ्या पहिल्या ५ जणांमध्ये त्याला स्थान मिळाले.

हे अर्धशतक शिलिंगफोर्डने जून २०१४ ला न्यूझीलंड विरुद्ध दुसऱ्या डावात केले होते. त्यावेळी वेस्ट इंडिजचा संघ न्यूझीलंडने दिलेल्या ४०३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत होता. त्यावेळी १३४ धावांवर ९ बाद अशा स्थितीत असताना ११ व्या क्रमांकावर येत शिलिंगफोर्डने २९ चेंडूत नाबाद ५३ धावा केल्या होत्या. यावेळी त्याने २५ चेंडूत ५० धावा पूर्ण केल्या होत्या.

मात्र त्याचा साथीदार जेरोमी टेलर बाद झाल्याने वेस्ट इंडिजचा डाव २१६ धावांवर आटोपला आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

३. जॅक कॅलिस – २४ चेंडू

दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू जॅक कॅलिसला दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटूंमध्ये गणले जाते. त्याने अनेकदा अविस्मरणीय खेळी केल्या आहेत. त्यातीलच एक म्हणजे २००५ ला त्याने झिम्बाब्वे विरुद्ध केपटाऊन कसोटीत केलेले वेगवान अर्धशतक.

त्या सामन्यात झिम्बाब्वेचा संघ पहिल्या डावात केवळ ५४ धावांवर सर्वबाद झाला होता. त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेकडून ग्रॅमी स्मिथने १२१ धावांची शतकी खेळी तर एबी डिविलियर्सने ९८ धावांची खेळी करुन दक्षिण आफ्रिकेला चांगली सुरुवात करुन दिली होती.

पण हे दोघे बाद झाल्यावर फलंदाजीला आलेल्या कॅलिसने तुफानी फटकेबाजी केली. त्याने २५ चेंडूत ३ चौकार आणि ५ षटकारांसह ५४ धावा केल्या होत्या. यावेळी त्याने २४ चेंडूत षटकार खेचत अर्धशतक पूर्ण केले होते. त्यावेळी तो कसोटीत सर्वात जलद अर्धशतक करणारा फलंदाज ठरला होता. त्याचा हा विश्वविक्रम पुढे ९ वर्षे कायम होता.

तो बाद झाल्यानंतर काही वेळाने दक्षिण आफ्रिकेने त्यांचा पहिला डाव ३४० धावांवर घोषित केला. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेकडे २८६ धावांची आघाडी होती. झिम्बाब्वेला दुसऱ्या डावात २६५ धावा करता आल्याने दक्षिण आफ्रिकेने त्या सामन्यात एक डाव आणि २१ धावांनी विजय मिळवला.

२. डेव्हिड वॉर्नर – २३ चेंडू

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर नेहमीच त्याच्या आक्रमक खेळीसाठी ओळखला जातो. अशीच आक्रमक खेळी त्याने जानेवारी २०१७ ला सिडनी येथे पाकिस्तानविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात केली होती.

या सामन्यात त्याने दुसऱ्या डावात केवळ २३ चेंडूत अर्धशतक केले होते. त्यावेळी तो कसोटीत सर्वात जलद अर्धशतक करणारा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ठरला होता. त्याने त्या डावात ८ व्या षटकात यासिर शहाच्या गोलंदाजीवर षटकार खेचत हा विक्रम केला होता. तो त्या डावात २७ चेंडूत ८ चौकार आणि ३ षटकारांसह ५५ धावा करुन बाद झाला होता.

एवढेच नाही तर त्याच सामन्यात पहिल्या डावात वॉर्नरने ९५ चेंडूत ११३ धावांची खेळी केली होती. त्यावेळी त्याने त्याचे शतक पहिल्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात पूर्ण केले होते. त्यामुळे तो ४० वर्षात दिवसाच्या पहिल्या सत्रात शतक पूर्ण करणारा पहिला खेळाडू ठरला होता.

त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिला डाव ५३८ धावांवर घोषित केला होता. त्यानंतर पाकिस्तानने पहिल्या डावात ३१५ धावा केल्या होत्या. तर दुसरा डाव ऑस्ट्रेलियाने २४१ धावांवर घोषित करत पहिल्या डावात घेतलेल्या २२३ धावांच्या आघाडीसह ४६५ धावांचे आव्हान पाकिस्तानला दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाला २४४ धावाच करता आल्या.

१. मिस्बाह-उल-हक – २१ चेंडू

पाकिस्तानचा माजी दिग्गज क्रिकेटपटू मिस्बाह उल हक कसोटीत चेंडूच्या तुलनेत आणि वेळेच्या तुलनेतही कसोटीमध्ये सर्वात जलद अर्धशतक करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत अव्वल क्रमांकावर आहे.

त्याने नोव्हेंबर २०१४ ला ऑस्ट्रेलियाविरुद्ध अबुधाबीमध्ये खेळताना दुसऱ्या डावात ५ व्या क्रमांकावर फलंदाजी करताना ५७ चेंडूत ११ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद १०१ धावा केल्या होत्या. त्यावेळी त्याने केवळ २१ चेंडूंचा सामना करताना आणि २४ मिनिटात पहिल्या ५० धावा पूर्ण केल्या होत्या. त्यामुळे त्याने ९ वर्षांपूर्वी जॅक कॅलिसला कसोटीतील सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम मोडत नवीन विश्वविक्रम रचला होता.

विशेष म्हणजे मिस्बाहने या सामन्यातील पहिल्या डावातही शतकी खेळी केली होती. त्याने पहिल्या डावात १६८ चेंडूत १०१ धावा केल्या होत्या.

या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना पहिला डाव ५७० धावांवर घोषित केला होता. तर ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात २६१ धावाच करता आल्या होत्या. त्यामुळे पाकिस्तानने ३०९ धावांची आघाडी घेतली.

पाकिस्तानने दुसरा डाव २९३ धावांवर घोषित करत ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावातील ३०९ धावांच्या आघाडीसह ६०३ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघ २४६ धावांवरच संपुष्टात आल्याने पाकिस्तानने या सामन्यात सहज विजय मिळवला होता.

ट्रेंडिंग लेख – 

पाकिस्तान संघाला वनडेत धु- धु धुणारे ३ भारतीय क्रिकेटर्स

७ का दम! कॅप्टन कूल धोनीच्या ७ नंबरच्या जर्सीची रोमांचक कहानी

ही दोस्ती तुटायची नाय! टीम इंडियातील जय- विरुच्या ५ जोड्या

You might also like