आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे काही फलंदाज आहेत, जे फलंदाजीला आले की गोलंदाजांवरील दबाव वाढतो. हे फलंदाज कुठल्याही चेंडूला स्टेडियमच्या बाहेर पाठवण्यास सक्षम असतात. तसेच जेव्हापासून क्रिकेटचे सर्वात छोटे स्वरूप टी-२० क्रिकेटचा आविष्कार झाला आहे, तेव्हापासून अनेक असे स्टार फलंदाज समोर आले आहेत, ज्यांनी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडून अनेक मोठ मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे.
दरम्यान, आम्ही तुम्हाला टी -२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांबद्दल अधिक माहिती देणार आहोत. चला तर पाहूया कोण आहेत ते फलंदाज.
१) ख्रिस गेल :
वेस्ट इंडिज संघाचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेलच्या नावे अनेक मोठमोठ्या विक्रमांची नोंद आहे. युनिव्हर्सल बॉस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ख्रिस गेलने ३५ वेगवेगळ्या संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने या ३५ संघांसाठी एकूण ४४८ टी-२० सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने २२ शतक आणि ८७ अर्धशतकांच्या साहाय्याने १४२७६ धावा केल्या आहेत. तसेच षटकार मारण्याच्या बाबतीत हा फलंदाज सर्वात पुढे आहे. ख्रिस गेलने आता पर्यंत एकूण १०४२ षटकार मारले आहेत.
२) कायरन पोलार्ड :
वेस्ट इंडिजचा दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू कायरन पोलार्डने टी२० क्रिकेटमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याने फलंदाजीबरोबरच गोलंदाजीतही महत्त्वाचे योगदान दिले आहे. वेस्ट इंडिजबरोबरच जगभरातील इतरही अनेक टी२० लीग स्पर्धेत तो सहभागी होत असतो. त्याने आत्तापर्यंत ५६८ टी२० सामने खेळताना ११२३६ धावा केल्या असून यात ७५८ षटकारांचा समावेश आहे.
३) आंद्रे रसल :
टी२० क्रिकेटमध्ये सर्वात धोकादायक फलंदाजांपैकी एक असलेला आंद्रे रसल अनेकदा प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या मनात धडकी भरवतो. त्यानेही आजपर्यंत अनेक टी२० सामन्यात तुफानी खेळ केला आहे. रसल कारकिर्दीत आत्तापर्यंत ३८२ टी२० क्रिकेट प्रकारातील सामने खेळला असून त्याने ६४०५ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ५१० षटकारांचा समावेश आहे.
४) ब्रेंडन मॅक्युलम :
न्यूझीलंड संघाचा विस्फोटक फलंदाज ब्रेंडन मॅक्क्युलमने आपल्या टी२० कारकिर्दीत एकूण १६ संघांचे प्रतिनिधित्व केले. यादरम्यान त्याने ३७० टी२० सामने खेळले. या सामन्यांमध्ये २९.९७ च्या सरासरीने ९९२२ धावा केल्या होत्या. या दरम्यान त्याने एकूण ४८५ षटकार मारले होते.
५)शेन वॉटसन :
ऑस्ट्रेलिया संघाचा विस्फोटक फलंदाज शेन वॉटसनने अनेकदा विस्फोटक फलंदाजी करून आपल्या संघाला सामना जिंकून दिला. तसेच टी२० क्रिकेटमध्ये देखील त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्याने ३४३ टी२० सामन्यात २९.३० च्या सरासरीने ८८२१ धावा केल्या आहेत. या सामन्यांमध्ये त्याने ७८५ चौकार आणि ४६७ षटकार मारले आहेत.
६)एबी डिविलियर्स :
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा विस्फोटक फलंदाज एबी डिविलियर्सने जगभरातील अनेक मोठ मोठ्या क्रिकेट लीगमध्ये सहभाग घेतला आहे.त्याने ३० फ्रँचायजीसाठी क्रिकेट खेळले आहे. मिस्टर ३६० म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या फलंदाजाने ३३७ टी-२० सामन्यात ३७.३२ च्या सरासरीने ९३६८ धावा केल्या आहे. यादरम्यान त्याने ७४९ चौकार आणि ४३६ षटकार मारले आहेत.
७) रोहित शर्मा :
भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज रोहित शर्माच्या नावे अनेक मोठ मोठ्या विक्रमांची नोंद आहे. नुकताच राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात दोन षटकार मारताच त्याने टी -२० क्रिकेटमध्ये ४०० षटकार मारण्याचा पराक्रम केला होता. रोहित शर्माने आतापर्यंत एकूण ३५६ टी-२० सामने खेळले आहेत. आयपीएल स्पर्धेतील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने या सामन्यांमध्ये ३१.९१ च्या सरासरीने एकूण ९४४६ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ४०० षटकार आणि ८२७ चौकार मारले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
दिल्लीविरुद्ध ‘अशी’ असेल केकेआरची रणनिती, सलामीवीर शुबमन गिलचा खुलासा
आयपीएल खेळणे उपयुक्त ठरले; टी२० विश्वचषकात फायदा होईल, पंजाब किंग्सच्या क्रिकेटरचा विश्वास