क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे. दोन संघांमध्ये अटीतटीची लढत होऊन, अखेरीस विजयाचा हकदार संघ बाजी मारतो. मात्र, अनेकदा असे होते की, एकच खेळाडू संपूर्ण विरोधी संघावर भारी पडतो. एक फलंदाज त्या विशिष्ट संघाविरुद्ध अगदी सातत्यपूर्ण कामगिरी करत असलेला आपण पाहतो, तर एखादा गोलंदाज समोरच्या संघातील फलंदाजांना वारंवार गारद करत असलेला दिसतो.
सर डॉन ब्रॅडमन हे इंग्लंडच्या संघाविरुद्ध कायमच यशस्वी ठरले. भारताच्या सुनील गावसकर यांनी संपूर्ण क्रिकेटविश्वातील फलंदाज ज्यांची धास्ती घेत, त्या वेस्ट इंडिजच्या वेगवान गोलंदाजांविरुद्ध धावांचे डोंगर रचले. झिम्बाब्वेचा ऍंण्डी फ्लॉवर श्रीलंकेविरुद्ध कायमच आपली चुणूक दाखवत. सध्याच्या क्रिकेटमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली हा सर्वच संघांविरुद्ध वर्चस्व गाजवत असला, तरी श्रीलंका व ऑस्ट्रेलिया या संघांविरुद्ध त्वेषाने खेळतो.
या सर्व खेळाडूंव्यतिरिक्त भारताचा एक असा फलंदाज होऊन गेला, ज्याने २१ व्या शतकाच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर राज्य करत असलेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाला आपल्या बॅटने पाणी पाजले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कायमच सरस कामगिरी करणारा हा फलंदाज होता व्हीव्हीएस लक्ष्मण. ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅकग्रा, जेसन गिलेस्पी, ब्रेट ली, शेन वॉर्न या दिग्गज गोलंदाजांचा सामना करत, लक्ष्मणने अनेक ऐतिहासिक खेळ्या साकारल्या.
लक्ष्मणने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नेहमीच चांगला खेळ दाखवला. मात्र, भारतीय खेळपट्ट्यांवर तो जरा अधिकच यशस्वी ठरला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतात खेळताना त्याने ५७.०४ च्या लाजवाब सरासरीने १,१९८ धावा फटकावल्या. आज लक्ष्मणच्या अशाच पाच ‘व्हेरी व्हेरी स्पेशल’ खेळ्यांविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्या भारतभूमीवर लक्ष्मणने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या.
५) २००८ दिल्ली कसोटीच्या पहिला डावातील द्विशतक
दिल्लीच्या फिरोझशाह कोटला मैदानावर झालेल्या या सामन्यात भारताची सुरुवात निराशाजनक झाली होती. वीरेंद्र सेहवाग व राहुल द्रविड हे भरवशाचे फलंदाज झटपट माघारी परतलेले. सचिन तेंडुलकर गौतम गंभीर यांनी डाव सावरत, धावफलक १५७ पर्यंत नेला. १५७ या धावसंख्येवर तिसरा गडी बाद झाल्यानंतर, लक्ष्मण मैदानात उतरला.
भारत मालिकेत आघाडीवर होता. मात्र, ऑस्ट्रेलियन संघ पलटवार करण्याची जोरदार शक्यता होती. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भारताचा डाव ३०० धावांच्या आतमध्ये रोखण्यासाठी प्रयत्न सुरू केले. ऑस्ट्रेलियाचे प्रमुख वेगवान गोलंदाज ब्रेट ली व मिचेल जॉन्सन यांनी भारताचा डाव झटपट गुंडाळण्याची जबाबदारी उचलली.
ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी त्वेषाने गोलंदाजी सुरू केली. मात्र, लक्ष्मणने त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना त्याने क्लब पातळीवरील गोलंदाजांसाठी खेळत, शानदार द्विशतक पूर्ण केले. या सामन्यात सलामीवीर गौतम गंभीरने देखील द्विशतक झळकावले होते. गंभीर व लक्ष्मण यांच्या खेळ्यांमुळे भारताने पहिल्या डावात ६१३ धावांचा डोंगर रचला.
४) कोलकाता कसोटीच्या पहिल्या डावातील झुंजार अर्धशतकी खेळी
मालिकेतील पहिल्या कसोटीत पराभव स्वीकारल्यानंतर, भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा डाव ८ बाद २९१ पर्यंत रोखला होता. मात्र, दुसऱ्या दिवशी कर्णधार स्टीव्ह वॉ व जेसन गिलेस्पी यांनी अफलातून फलंदाजी करत, ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ४४५ पर्यंत पोहोचवली.
दुसऱ्या दिवशी चहा- पानापर्यंत भारताची अवस्था १ बाद ३१ होती. त्यानंतर मात्र, भारताचा डावाला थोडीशी गळती लागली. सचिन तेंडुलकर व राहुल द्रविड हे प्रमुख फलंदाज बाद झाल्याने भारताची धावसंख्या ४ बाद ८८ अशी दिसत होती. या नाजूक परिस्थितीत लक्ष्मण मैदानात उतरला.
दुसऱ्या बाजूने भारतीय फलंदाज बाद होत राहिले. लवकरच भारताची अवस्था ७ बाद ९७ अशी दयनीय झाली. त्यावेळी, लक्ष्मणने संघाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेत, ५९ धावांची लाजवाब खेळी साकारली. लक्ष्मणच्या या खेळीनंतरही भारतीय संघ फॉलोऑन वाचवू शकला नव्हता. मात्र, या खेळीचे समीक्षकांकडून कौतुक झाले होते.
३) २००४ मुंबई कसोटीच्या दुसऱ्या डावातील ६९ धावा
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील आतापर्यंतच्या झालेल्या काही ऐतिहासिक सामन्यांपैकी हा एक सामना होता. ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या तीनपैकी दोन सामने जिंकून मालिका विजय साजरा केलेला. भारतीय संघाला आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी हा अखेरचा सामना जिंकणे गरजेचे होते.
नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारलेल्या भारतीय संघाची ग्लेन मॅकग्रा, जेसन गिलेस्पी व मायकल कॅस्प्रोविच यांनी दाणादाण उडवली. भारतीय संघ पहिल्या डावात अवघ्या १०४ धावा बनवू शकला. ऑस्ट्रेलियन संघाने आक्रमक सुरुवात केली. मात्र, भारतीय फिरकीपटूंनी नियंत्रित मारा करत, ऑस्ट्रेलियाचा डाव २०९ पर्यंत मर्यादित ठेवला. ऑस्ट्रेलियाला त्यामुळे ९९ धावांची महत्वपूर्ण आघाडी मिळाली.
दुसऱ्या डावातही भारताची सुरुवात निराशाजनक राहिली. १४ धावांवर भारताचे दोन गडी तंबूत परतले होते. त्यावेळी लक्ष्मण मैदानात आला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा निकराने सामना करत लक्ष्मणने ६९ धावांची खेळी साकारली. ऑस्ट्रेलियाच्या युवा मायकल क्लार्कने ६ बळी मिळवत भारतीय संघाचा डाव २०६ धावांवर संपुष्टात आणला.
भारताने ठेवलेले १०७ धावांचे मामुली आव्हान ऑस्ट्रेलिया संघ पूर्ण करू शकला नाही आणि ९३ धावांवर सर्वबाद झाला.
२) २०१० मोहाली कसोटीतील ‘ती’ ७३ धावांची यादगार खेळी
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या इतिहासातील रोमांचक सामन्यांमध्ये मोहालीतील या सामन्याची नोंद केली जाते. अत्यंत कठीण परिस्थितीत भारतीय संघाने या सामन्यात विजय खेचून आणला होता. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात शेन वॉटसनच्या शतकाच्या मदतीने ४२८ धावा रचल्या. अनुभवी सचिन तेंडुलकरने ९८ धावांची खेळी करत, भारतीय संघाला ४०५ धावांपर्यंत पोहोचवले. पाठीच्या दुखण्यामुळे या डावात लक्ष्मण दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला. मात्र, तो अवघ्या दोन धावा बनवण्यात यशस्वी ठरला.
दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांनी नियंत्रित मारा करत, ऑस्ट्रेलियाचा डाव १९२ धावांवर रोखला. भारतीय संघाला विजयासाठी २१६ धावांचे आव्हान मिळाले होते. पहिल्याच षटकात सलामीवीर गौतम गंभीर परतला आणि भारताच्या डावाला गळती लागली. ७६ धावा धावफलकावर लागेपर्यंत भारताचे ५ गडी बाद झाले होते. या नाजूक परिस्थितीत लक्ष्मण मैदानात उतरला.
लक्ष्मण खेळण्यासाठी आल्यानंतर पुन्हा भारताचे तीन फलंदाज नियमित अंतराने बाद झाले. अखेरचे दोन गडी शिल्लक असताना, भारताला विजयासाठी ९२ धावा आवश्यक होत्या. सामन्यात भारताचा पराभव निश्चित दिसत होता. मात्र, लक्ष्मणने दुखापतग्रस्त असतानाही आपला दर्जा दाखवून दिला. ऑस्ट्रेलियाच्या अनुभवी गोलंदाजांचा सामना करत त्याने भारताला विजयाकडे नेण्यास सुरुवात केली. दहाव्या क्रमांकावरील ईशांत शर्माने त्याला योग्य साथ दिली.
विजयासाठी ११ धावा शिल्लक असताना ईशांत बाद झाला. अखेरचा फलंदाज म्हणून मैदानात आलेल्या, प्रज्ञान ओझाने काहीसा आततायीपणा दाखवला, तेव्हा लक्ष्मणने त्याला चांगलेच फटकारले. अखेरीस लक्ष्मण-ओझा जोडीने भारताला विजय मिळवून दिला. शरीर साथ देत नसतानाही, देशासाठी लक्ष्मणने केलेली ही खेळी, क्रिकेट चाहत्यांच्या नेहमी स्मरणात राहील.
१) २००१ कोलकाता कसोटीच्या दुसऱ्या डावातील ‘ती’ अजरामर खेळी
लक्ष्मणने २००१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोलकाता कसोटीत खेळलेली २८१ धावांची खेळी कोणीही विसरु शकणार नाही. फॉलोऑननंतर राहुल द्रविडसोबत केलेल्या त्या भागीदारीला शतकातील सर्वोत्कृष्ट भागीदारीचा मान मिळाला आहे.
फॉलोऑन मिळाल्यानंतर भारताने दुसर्या डावात नेटाने फलंदाजी सुरू केली होती. संघाच्या ५२ धावा झाल्या असताना, सदगोपण रमेश बाद झाला आणि नेहमी सहाव्या क्रमांकावर खेळणारा लक्ष्मण तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला. पहिल्या डावात झुंजार अर्धशतक झळकावलेल्या लक्ष्मणने दुसऱ्या डावातही तशीच फलंदाजी सुरू ठेवली.
राहुल द्रविडसोबत लक्ष्मणने भारताचा डाव सावरला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा भारताची धावसंख्या ४ बाद २५४ अशी होती. भारतीय संघ २३२ धावांनी पिछाडीवर होता. भारताला या सामन्यातही पराभव पत्करावा लागेल, अशी चिन्हे होती. त्यानंतर, चौथ्या दिवशी द्रविड आणि लक्ष्मणने जे काही केले, ते केवळ अविश्वसनीय होते.
ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची पिसे काढताना, द्रविड-लक्ष्मण जोडीने इतिहास रचला. लक्ष्मणने शतक, द्विशतक असे टप्पे गाठत २८१ धावांची अजरामर खेळी केली. द्रविडनेदेखील त्याला सुयोग्य साथ देत १८० धावांची खेळी साकारली.
चौथ्या डावात ऑस्ट्रेलियन संघ हरभजनच्या फिरकीपुढे तग धरू शकला नाही आणि त्यांना १७१ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. फॉलोऑन नंतरदेखील विजय मिळवण्याची कामगिरी भारतीय संघाने पार पाडली होती. त्या सामन्यातील लक्ष्मणच्या २८१ धावांच्या खेळीला आजवरची सर्वोत्कृष्ट खेळी खेळाडू म्हणून गौरविण्यात आले होते.
वाचा-
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक अर्धशतके ठोकणारे टीम इंडियाचे ३ खेळाडू; अव्वलस्थानी ‘हा’ दिग्गज
किती हे दुर्देव! उत्कृष्ट कामगिरी करूनही टीम इंडियात स्थान टिकवू न शकलेले ३ भारतीय खेळाडू
सातत्याला सलाम! ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक सरासरीने धावा करणारे ३ भारतीय धडाकेबाज फलंदाज