भारतीय क्रिकेट संघ 2019 विश्वचषक उपांत्य सामन्यात न्यूझीलंड संघाविरुद्ध पराभूत झाला होता. त्या पराभवाने कोट्यवधी भारतीय क्रिकेटप्रेमींची मने तुटली होती. मात्र, आता पुन्हा एकदा भारत विरुद्ध न्यूझीलंड संघ विश्वचषक 2023 स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात आमने-सामने आले आहेत. हा उपांत्य सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडिअम येथे बुधवारी (दि. 15 नोव्हेंबर) खेळला जाणार आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करून भारत मागील पराभवाची परतफेड करण्याचा प्रयत्न करेल. अशात भारताचा माजी अष्टपैलू सुरेश रैना याने न्यूझीलंडचा स्टार खेळाडू रचिन रवींद्र याच्याविषयी मोठे विधान केले आहे. रैनाने चक्क रोहित शर्मा याच्याशी त्याची तुलना केली आहे.
काय म्हणाला रैना?
भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) सामन्यापूर्वी माध्यमांशी बोलताना सुरैश रैना (Suresh Raina) याने रचिन रवींद्र (Rachin Ravindra) याच्या शानदार प्रदर्शनविषयी भाष्य केले. तो म्हणाला, “रवींद्र बंगळुरूचा एक लोकल मुलगा आहे. तो रोहित शर्माप्रमाणे चेंडूवर शॉट मारत आहे. तसेच, सामन्याची दिशा बदलत आहे.”
न्यूझीलंडच्या संघाचा कर्णधार केन विलियम्सन याने दुखापतीनंतर पुनरागमन केल्यानंतर रचिनला सलामीची जबाबदारी दिली आहे. रचिनसोबत न्यूझीलंडसाठी डेवॉन कॉनवे डावाची सुरुवात करतो. विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात कॉनवेने नाबाद 152 धावांची नाबाद खेळी केली होती. मात्र, त्या खेळीनंतर त्याची बॅट तळपलीच नाही.
मात्र, रैना त्याच्याविषयी बोलताना म्हणाला, “तो एक मोठा मॅचविनर आहे आणि आपण आयपीएलमध्ये त्याला पाहिले आहे. आपण पाहिले आहे की, त्याने इंग्लंडविरुद्ध एक शतक ठोकले होते. तो शानदार दिसला होता आणि मैदानाच्या चारही बाजूंना शॉट मारत होता. तो फिरकीविरुद्ध चांगला खेळतो, परिस्थिती ओळखून खेळतो. तो स्कोर करू शकत नाहीये, पण तो नेहमीच मोठ्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करतो”
रचिनची स्पर्धेतील कामगिरी
रचिन रवींद्र याने संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत शानदार फलंदाजी केली आहे. तो न्यूझीलंडचा 23 वर्षीय अष्टपैलू आहे, जो फिरकी गोलंदाजी टाकण्यासोबतच वरच्या फळीत फलंदाजीही करतो. रचिनने या विश्वचषकात न्यूझीलंडसाठी अधिकतर सलामीला किंवा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. त्याची स्पर्धेतील कामगिरी पाहिली, तर त्याने आतापर्यंत 565 धावा केल्या आहेत. यामध्ये 2 अर्धशतके आणि 3 शतकांचाही समावेश आहे. (world cup 2023 former india batter suresh raina heaped praise rachin ravindra saying this must know here)
हेही वाचा-
World Cup Semi Final: वानखेडेच्या खेळपट्टीबाबत स्पष्टच बोलला रोहित, म्हणाला, “इथे आम्ही भरपूर…”
सीएसके मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत! आयपीएल 2024 आधी आखली नवी रणनिती