येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात दोन्हीही संघामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. सध्या भारतीय संघ या मोठ्या सामन्यासाठी सराव करण्यात व्यस्त आहे. तर न्यूझीलंड संघ इंग्लंड संघाविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. अशातच न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियम्सन याने विराट कोहली आणि भारतीय संघाबद्दल भाष्य केले आहे.
भारतीय संघाला या सामन्यासाठी विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. कारण भारतीय संघातील फलंदाज आणि गोलंदाज चांगल्याच फॉर्ममध्ये आहेत. अशातच भारतीय संघाबद्दल भाष्य करताना केन विलियम्सन म्हणाला की, “भारतीय संघ निश्चितच एक उत्कृष्ट संघ आहे. जेव्हा हा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. तेव्हा आम्ही त्यांची मजबुती पाहिली होती. त्यांची वेगवान गोलंदाजी आणि फिरकी गोलंदाजी देखील मजबूत आहे. भारतीय संघ क्रमवारीमध्ये सर्वोच्च स्थानी आहे. हे देखील उत्तम आहे. आमच्याकडे सर्वोत्कृष्ट संघासोबत दोन हात करण्याची उत्कृष्ट संधी आहे. ”
केन विलियम्सनला जेव्हा २००८ सालच्या १९ वर्षांखालील विश्वचषकाबद्दल विचारले गेले तेव्हा तो म्हणाला ,”आम्ही वेगवेगळ्या स्तरावर आणि वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये एकमेकांविरुद्ध खेळलो आहोत. आम्ही एकमेकांना खूप चांगलं ओळखतो. त्यामुळे मैदानात सोबत जाणं, नाणेफेक करणे आणि विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीपूर्वी एकमेकांना भेटणे खूप चांगले असणार आहे.”
साल २००८ विश्वचषकात भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात सामना झाला होता. तेव्हा भारताचे नेतृत्व विराट तर न्यूझीलंडचे नेतृत्व विलियम्सन करत होता. तसेच भारतीय संघात रविंद्र जडेजाही होता. तर न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टही खेळत होता. आता हे खेळाडू कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आमने-सामने येणार आहेत.
तसेच सातव्या क्रमांकांवर फलंदाजाला स्थान द्यावे की अष्टपैलू खेळाडूला याबाबत भाष्य करताना विलियम्सन म्हणाला, “आम्हाला अशाप्रकारचे निर्णय घेण्यापूर्वी परिस्थिती जाणून घ्यावी लागेल. आम्ही जेव्हा वेगळ्या ठिकाणी खेळतो, तेव्हा आम्ही परिस्थितीनुसार संघाची निवड करतो. जे आमच्या संघाच्या हितासाठी असते.”
तसेच नील वॅगनरबद्दल बोलताना तो म्हणाला की, “त्याच्यामध्ये मोठे स्पेल टाकण्याची आणि दबाव बनवून ठेवण्याची क्षमता आहे. ज्यामुळे तो आंतरराष्ट्रीय स्तरावर इतका यशस्वी होऊ शकला. आज तो आमच्या संघातील एक मुख्य सदस्य आहे.”
महत्त्वाच्या बातम्या –
व्हिंटेज धोनी! सीएसकेने शेअर केलेल्या ‘त्या’ फोटोवर चाहत्यांनी पाडला कमेंट्सचा पाऊस
राशीद खानला करायची आहे सचिन तेंडुलकर विरुद्ध गोलंदाजी; ‘हे’ आहे कारण