विक्रम… या नावातच किती मोठेपणा आहे नाही का. विक्रम हा क्रिकेटच नव्हे, तर कोणत्याही खेळात होऊ शकतो. विक्रम होताना सर्वाधिक चर्चा या गोष्टीची होते, की तो विक्रम नेमका कोणता आहे आणि तो बनविण्यात कोणकोणत्या खेळाडूंनी आपले योगदान दिले आहे. खेळाडूंबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी केलेल्या सर्वात पहिल्या विक्रमांबद्दल सांगितले जाते. परंतु क्रिकेट जगतात असे काही विक्रम आहेत, जे त्या खेळाडूंना स्वत: लादेखील आठवायला आवडणार नाहीत. त्या विक्रमांची नोंद जगातील लाजिरवाण्या विक्रमांमध्ये झाली आहे. खरंतर हे विक्रम इतके लाजिरवाणे आहेत, की ते ऐकूण खेळाडूंना स्वत:लाच लाज वाटते. अशाच ७ विक्रमांचा आढावा या लेखात घेण्यात आला आहे.
७. वनडेत धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या जयसूर्याच्या नावावरच आहे सर्वाधिक शून्यांचा विक्रम
जर कोणी असा प्रश्न विचारला की वनडे क्रिकेटमध्ये धडाकेबाज सलामी फलंदाजीची खरी ओळख कोणी दिली, तर तिथे श्रीलंकेचा महान फलंदाज सनथ जयसूर्याचे (Sanath Jayasuriya) नाव सर्वप्रथम घेतले जाते. परंतु वनडे क्रिकेटमध्ये ३०० पेक्षा अधिक सामने खेळून १० हजार धावांचा टप्पा पार करणाऱ्या जयसूर्याच्या नावावरच वनडेत सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचा विक्रमदेखील आहे. केवळ १७ चेंडूत ५० धावांचा विक्रम करणारा जयसूर्या आपल्या वनडे कारकिर्दीत तब्बल ३४ वेळा शून्यावर बाद झाला होता. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर ३७ चेंडूत शतक ठोकणाऱ्या पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीचा (Shahid Afridi) क्रमांक लागतो. तो ३० वेळा शून्यावर बाद झाला, तर वसीम अक्रम (Wasim Akram) तिसऱ्या क्रमांकावर असून तो तब्बल २८ वेळा शून्यावर बाद झाला होता.
६. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा त्रिफळाचीत पद्धतीने बाद
राहुल द्रविडला आपल्या धडाकेबाज तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी भारतीय क्रिकेट संघाची ‘द वॉल’ म्हटले जात होते. असे म्हटले जाते, की द्रविडला बाद करणे कोणत्याही गोलंदाजा जमत नसायचे. परंतु हे जाणून आश्चर्य होईल, की द्रविडच्याच नावावर कसोटी क्रिकेटमध्ये जगात सर्वाधिक वेळा त्रिफळाचीत होण्याचा लाजिरवाणा विक्रम आहे. जवळपास १३ हजार कसोटी धावा बनविणारा द्रविड आपल्या कारकिर्दीत ५५ वेळा त्रिफळाचीत झाला होता. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar). तो तब्बल ५४ वेळा त्रिफळाचीत झाला होता. त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर लाजिरवाण्या विक्रमाचा मानकरी आहे ऑस्ट्रेलियाचा ऍलन बॉर्डर (Allen Border). तो आपल्या कसोटी कारकिर्दीत तब्बल ५३ वेळा त्रिफळाचीत झाला होता.
५. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शून्य धावा
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचा विक्रम तर आपण पाहिला. परंतु आता आपण कसोटीत सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचा विक्रम पाहणार आहोत. हा विक्रम वेस्ट इंडिजच्या कर्टनी वॉल्शच्या (Courtney Walsh) नावावर आहे. ज्याला कसोटीत ५०० पेक्षा अधिक विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज म्हणून ओळखले जाते. ११ व्या क्रमांकावर फलंदाजी करताना वॉल्श कसोटीतील १८५ डावांमध्ये तब्बल ४३ वेळा शून्य धावेवर बाद झाला होता. त्याच्यानंतर न्यूझीलंडच्या ख्रिस मार्टिनचा क्रमांक लागतो. तो ३६ वेळा शून्य धावेवर बाद झाला होता, तर ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅकग्रा तिसऱ्या क्रमांकावर असून तो तब्बल ३५ वेळा शून्य धावसंख्येवर बाद झाला होता.
४. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात महागडे षटक
कसोटी क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा देणाऱ्या गोलंदाजांची जेव्हाही चर्चा होते, तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या रॉबर्ट पीटरसनचे नाव येते. त्याने कसोटीत एका षटकात सर्वाधिक २८ धावा दिल्या आहेत. त्यानंतर ५०० पेक्षा अधिक विकेट्स घेणाऱ्या इंग्लंडच्या जेम्स अँडरसनचे (James Anderson) नाव समोर येते. अँडरसनच्या गोलंदाजीवर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार जॉर्ज बेलीने एका षटकात २८ धावा केल्या होत्या. त्यानंतर इंग्लंडच्या जो रूटनेदेखील एका षटकात सर्वाधिक २८ धावा देण्याचा लाजिरवाणा विक्रम आपल्या नावावर केला आहे. अशाप्रकारे अँडरसन आणि रूटने एका षटकात २८ धावा देत पीटरसनची बरोबरी केली आहे.
३. वनडे आणि आंतरराष्ट्रीय टी२०त एका षटकात सर्वाधिक धावा
आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्येम एका षटकात सर्वाधिक ३६ धावा देण्याचा विक्रम तर सर्वांनाच माहित आहे. तो विक्रम इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या (Stuart Broad) नावावर आहे. २००७च्या टी२० विश्वचषकात भारतीय संघाचा अष्टपैलू युवराज सिंगने (Yuvraj Singh) ब्रॉडच्या गोलंदाजीवर एका षटकात ६ षटकार ठोकले होते.
वनडे क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा देण्याचा विक्रम हॉलंडच्या व्हॅन बंगच्या नावावर आहे. २००७ च्या विश्वचषकात सेंट किट्स येथे दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज हर्शल गिब्जने बंगच्या गोलंदाजीवर एका षटकात ६ षटकार ठोकले होते.
२. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक नो बॉल फेकणारे गोलंदाज
क्रिकेटचा कोणताही प्रकार असो अतिरिक्त धावा देणाऱ्या गोलंदाजाला फार कोणी पसंत करत नाही. मग त्या धाना जर नो बॉलद्वारे येत असतील तर ते सर्वात वाईट समजले जाते. कारण त्या चेंडूवर फलंदाज बाद होऊनही त्याला नाबाद देण्याची शक्यता अधिक असते. परंतु कसोटी क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वाधिक वेळा नो बॉल फेकण्याचा विक्रम आहे वेस्ट इंडिजच्या कर्टली अँब्रॉसच्या (Curtly Ambrose) नावावर. कसोटी क्रिकेटमध्ये ४०० पेक्षा अधिक विकेट्स घेणाऱ्या घातक गोलंदाज अँब्रॉसने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १९९३मध्ये पर्थ कसोटीत एका षटकात तब्बल ९ नो बॉल फेकले होते. ते षटक १५ चेंडूंचे राहिले होते. त्यामुळे त्या षटकाची कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक लांब षटक म्हणून नोेंद आहे. तसेच तो लाजिरवाणा विक्रमही आहे. असे असले तरीही विंडीजने तो सामना १० विकेट्सने जिंकला होता. तसेच अँब्रॉसने ५ विकेट्स घेत सामनावीराचा पुरस्कारही पटकाविला होता.
१. कसोटी इतिहासातील सर्वाधिक सावकाश शतक
कसोटी क्रिकेटला तसं पाहिलं तर सावकाश क्रिकेट प्रकार म्हटले जाते. यामध्ये फलंदाज मोठ- मोठे फटके मारत प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याऐवजी तो खेळपट्टीवर भक्कमपणे टिकून आपल्या संघाची धावसंख्या वाढवत असतो. परंतु यामध्येही जर फलंदाज शतक पूर्ण करण्यासाठी तब्बल ५५७ मिनिटे वेळ घेत असेल तर काय म्हणाल? होय, कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सावकाश खेळी करण्याचा लाजिरवाणा विक्रम पाकिस्तानचा अष्टपैलू मुदस्सर नझरने (Mudassar Nazar) १९७७- ७८ मध्ये लाहोर कसोटीत इंग्लंडविरुद्ध केला होता.
वाचनीय लेख-
-जेव्हा मुंबई इंडियन्सच्या ड्वेन ब्रावोसाठी अंबानींनी जमैकाला पाठवले थेट प्रायव्हेट जेट
-एका वर्षात सर्वाधिक कसोटी धावा करणारे ५ क्रिकेटर, दोन नावं आहेत भारतीय
-आज फारसे कुणाच्या लक्षात नसलेले टीम इंडियाचे एकेकाळचे ‘पाच’ टी२० ओपनर