क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असतं की त्याने राष्ट्रीय संघासाठी फक्त न खेळता संघाला त्याच्या उत्कृष्ट प्रदर्शनाने विजय देखील मिळवून द्यावा हे असते. प्रत्येक युवा खेळाडूला वाटेल असते की, त्याच्या पदार्पणातील सामना अविस्मरणीय असावा. त्याचप्रमाणे जो खेळाडू खेळ खेळतो, त्याच्या आयुष्यात कधी ना कधी निवृत्ती घेण्याचीही वेळ येतेच. त्यामुळे प्रत्येकाला असे वाटत असते, की आपल्या निवृत्तीचा सामनाही अविस्मरणीय ठरावा.
जेव्हा भारतीय खेळाडूंबद्दल याबाबतीत बोलले जाते तेव्हा बऱ्याचदा या गोष्टींवरुन वाद होतो की, दिग्गज खेळाडूंना मैदानावर अविस्मरणीय निरोप मिळत नाही. विशेष म्हणजे त्या खेळाडूंनी सामने जिंकवण्यात सर्वात मोठे योगदान दिलेले असते.
गेल्या काही दिवसात अशी चर्चा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीबाबतीत झाली. धोनीने मागीलवर्षी १५ ऑगस्ट रोजी अचानक तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले होते. धोनीला जरी निवृत्तीचा सामना खेळता आला नसला तरी तो कर्णधार असताना काही दिग्गज खेळाडूंनी आपला अखेरचा सामना अविस्मरणीय ठरवत निवृत्ती स्विकारली.
1) सचिन तेंडुलकर
भारतीय संघाचे माजी फलंदाज मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचे सर्वश्रेष्ठ फलंदाज म्हणून नाव घेतले जाते. 1989 ते 2013 पर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन यांनी दमदार कामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त शतक आणि धावा बनवण्याचा विक्रम सचिन तेंडुलकर यांच्या नावे आहे.
तुम्हाला माहिती असेल की, सचिन तेंडुलकर यांनी 2013 मध्ये आपला आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतला शेवटचा सामना खेळला. वेस्ट इंडिज विरुद्ध नोव्हेंबर 2013 मध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू होण्याअगोदरच सचिन तेंडुलकर यांनी या गोष्टीची घोषणा केली होती की, ही त्यांच्या कारकिर्दीतील शेवटची मालिका असेल. मालिकेतील दुसरा कसोटी सामना 14 ते 17 नोव्हेंबरदरम्यान मुंबईमध्ये खेळला गेला होता. सचिन तेंडुलकर यांनी या सामन्यामध्ये 118 चेंडूंमध्ये 12 चौकार लगावत 74 धावा बनवल्या होत्या. भारताने हा सामना एक डाव आणि 126 धावांनी जिंकला होता.
2) राहुल द्रविड
भारतीय संघाचे माजी फलंदाज राहुल द्रविड यांना ‘द वॉल’ आणि ‘मिस्टर डिपेंडबल’ या नावाने संबोधले जात होते. राहुल द्रविड यांनी एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजारांपेक्षाही जास्त धावा काढल्या आहेत. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांनी 48 शतक झळकावले आहेत. राहुल द्रविड यांनी कसोटी क्रिकेटचा निरोप मैदानातून घेतला नव्हता. मात्र, मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमधून त्यांना मैदानावर सामना खेळून निवृत्ती घेता आली.
राहुल द्रविड यांनी 2011 इंग्लंड दौऱ्यावर आपला शेवटचा एकदिवसीय आणि टी 20 सामना खेळला. या मालिकेच्या अगोदरच त्यांनी सांगितले होते की, ही त्यांची शेवटची मर्यादीत षटकांची मालिका असेल. दोन्ही स्तरावर त्यांना धोनीच्या नेतृत्वाखाली निरोप मिळाला.
द्रविड यांनी आपल्या एकमेव टी20 सामन्यामध्ये 31 धावा बनवल्या. तर शेवटच्या एकदिवसीय सामन्यात त्यांनी 79 चेंडूंमध्ये 4 चौकार लगावत 69 धावा केल्या. परंतु भारताला या दोन्ही सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला होता.
3) सौरव गांगुली
भारतीय संघाचा एक यशस्वी कर्णधार सौरव गांगुली यांनी आपल्या कारकीर्दीत खूप यश मिळवले आहे. भारतीय संघाला उच्च स्थानावर पोहचवण्यात सौरव गांगुली यांचा खूप महत्वाचा वाटा होता. सौरव गांगुली यांनी आपल्या कारकीर्दीत कसोटी सामन्यात 7 हजार तर एकदिवसीय सामन्यात 11 हजारांपेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
सौरव गांगुली यांनी आपल्या कारकीर्दीतील शेवटचा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध नोव्हेंबर 2008 मध्ये खेळला. सौरव गांगुली यांनी सामन्याच्या अगोदरच सांगितले होते की, हा त्यांचा शेवटचा सामना असेल. या मालिकेचे नेतृत्व अनिल कुंबळे करत होते. पण त्यांनीही मालिकेच्या मध्येच निवृत्ती घेतली होती. त्यामुळे या मालिकेत धोनीला कसोटी क्रिकेटचे कर्णधारपद देण्यात आले.
सौरव गांगुली यांनी अखेरच्या सामन्याच्या पहिल्या डावात 85 धावा केल्या आणि दुसऱ्या डावात ते शून्यावर बाद झाले. शेवटी भारतीय संघाने 172 धावांनी हा सामना जिंकला. या सामन्यात धोनीने सौरव गांगुली यांना काही षटके नेतृत्व करण्यास सांगितले होते. त्यामुळे त्यांच्या आठवणीत राहण्यासारखा निरोप त्यांना मिळाला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
‘हा’ खेळाडू भारताला जिंकून देईल पहिलेवहिले कसोटी चॅम्पियनशीपचे विजेतेपद, दीपक चाहरचा विश्वास
सरावादरम्यान मोठा अपघात, तोंडावर चेंडूचा फटका अन् यष्टीरक्षक रक्तबंबाळ; पडले ७ टाके
क्रिकेट क्षेत्रातील ‘बच्चन’! ‘हे’ आहेत सर्वात उंच क्रिकेटपटू, अव्वलस्थानचा खेळाडू ७ फूट ४ इंच