क्रिकेटमध्ये वनडे व कसोटी अशा दोनही प्रकाराला तेवढेच महत्त्व दिले जाते. त्यामुळे क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूचे वनडे विश्वचषकात खेळण्याचे जसे स्वप्न असते तसेच कसोटीमध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याचेही स्वप्न असते. प्रत्येक खेळाडू किमान एक तरी कसोटी सामना आपल्या देशाकडून खेळायला मिळावा याची वाट पाहत असतो. कारण कितीही झाले तरी कसोटी हा क्रिकेटमधील सर्वात जूना आणि परिपूर्ण प्रकार मानला जातो.
आजही कसोटीमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या क्रिकेटपटूला एक वेगळेच स्थान जागतिक क्रिकेटमध्ये दिले जाते. पण असेही काही क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी वनडे क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली, ज्यांना वनडे विश्वचषकातही खेळण्याची संधी मिळाली पण त्यांना कसोटीमध्ये पदार्पणाची संधी मिळालेली नाही. अशाच ५ सक्रिय भारतीय क्रिकेटपटूंचा या लेखात आढावा घेण्यात आला आहे ज्यांनी विश्वचषकात तर भारताचे प्रतिनिधित्व केले परंतू त्यांना कसोटीमध्ये अजूनही पदार्पण करता आलेले नाही.
५. युजवेंद्र चहल – भारताचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये चांगले यश मिळवले आहे. त्याने आत्तापर्यंत वनडेत ५२ सामन्यात ९१ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच तो टी२०मध्येही ५० पेक्षा अधिक विकेट्स घेणाऱ्या तीन भारतीय गोलंदाजांपैकी एक आहे.
याबरोबरच चहलला २०१९ चा विश्वचषक खेळण्याचीही संधी मिळाली होती. या विश्वचषकात त्याने ८ सामने खेळले आणि १२ विकेट्सही घेतल्या. चहलने २०१६ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. मात्र असे असतानाही अजून त्याला एकही कसोटी सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही.
४. रॉबिन उथप्पा – ३४ वर्षीय रॉबिन उथप्पाने २००६ ला इंग्लंड विरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने २०१५ पर्यंत ४६ वनडे सामने खेळले. तर टी२०मध्ये तो १३ सामने खेळले. सुरुवातीला उथप्पाने त्याच्या कामगिरीने प्रभावित केले होते. मात्र नंतर त्याची कामगिरी ढासळत गेली. त्यामुळे मागील ५ वर्षात त्याला भारतीय संघात स्थान मिळालेले नाही.
पण या दरम्यान तो २००७ ला वनडे आणि टी२० विश्वचषकातही खेळला. मात्र उथप्पाला कसोटी पदार्पणाची मात्र कधी संधी मिळाली नाही.
३. युसुफ पठाण –
भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू युसुफ पठाणचे आंतरराष्ट्रीय पदार्पण झाले ते थेट २००७ टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातून. त्या सामन्यात त्याने सलामीला फलंदाजी केली होती. आक्रमक फलंदाजी आणि वेळ पडेल तेव्हा गोलंदाजी करणाऱ्या युसुफने पुढे २०११ च्या वनडे विश्वचषकासाठीही भारतीय संघात स्थान मिळवले. त्यामुळे दोन विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा भाग होण्याचे भाग्य युसुफला लाभले.
मात्र असे असले तरी त्याला भारताकडून कसोटीत पदार्पण करता आले नाही. त्याने ५७ वनडे आणि २२ टी२० सामने खेळले. वनडेत त्याने ८१० धावा केल्या आणि ३३ विकेट्स घेतल्या. तर टी२०मध्ये २३६ धावा केल्या आणि १३ विकेट्स घेतल्या. युसुफ सध्या २०१२ पासून भारतीय संघातून बाहेर आहे.
२. केदार जाधव –
भारताचा ३५ वर्षीय क्रिकेटपटू केदार जाधवने वयाच्या २९ व्या वर्षी २०१४ ला श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून त्याने केवळ एक फलंदाज म्हणूनच नाही तर एक कामचलाऊ गोलंदाज म्हणूनही त्याचे वनडे आणि टी२० संघात स्थान पक्के केले होते. त्यामुळे त्याला २०१९ चा विश्वचषक खेळण्याचीही संधी मिळाली. या विश्वचषकात त्याने ६ सामन्यात ८० धावा केल्या. मात्र मागील काही दिवसात त्याला सातत्याने दुखापतीचा त्रास होत आहे. त्यामुळे तो भारतीय संघातून बाहेर आहे.
त्याने आत्तापर्यंत ७३ वनडे सामने खेळले असून यात १३८९ धावा केल्या आणि २७ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच टी२०मध्ये त्याने ९ सामन्यात ५८ धावा केल्या आहेत. पण असे असताना त्याला एकही कसोटी सामना खेळण्याची मात्र संधी मिळालेली नाही. त्याचे आत्ताचे वय आणि फिटनेस पाहता त्याला ही संधी भविष्यात मिळण्याची शक्यता खूप कमी आहे.
१. मोहित शर्मा –
मध्यमगती गोलंदाज मोहित शर्माने २०१३ ला झिम्बाब्वे विरुद्ध वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने सुरुवातीला केलेल्या कामगिरीमुळे अनेकांना त्याच्याकडून मोठी अपेक्षा होती. मात्र २०१५ नंतर त्याला कधीही भारतीय संघात संधी मिळाली नाही.
या दरम्यान २०१५ च्या वनडे विश्वचषकाआधी इशांत शर्मा दुखापतग्रस्त झाल्याने मोहितला भारतीय संघात संधी मिळाली होती. या संधीचे सोने करत मोहितने त्या विश्वचषकात ८ सामन्यात १५ विकेट्ही घेतल्या होत्या. पण नंतर त्याला त्याच्या कामगिरीत सातत्य राखता आले नाही. परिणामी त्याने राष्ट्रीय संघातील स्थान गमावले. त्यामुळे त्याला कसोटी पदार्पण करण्याचीही संधी मिळाली नाही.
त्याने आत्तापर्यंत २६ वनडे आणि ८ टी२० सामने खेळले. त्याने वनडेत ३१ आणि टी२०मध्ये ६ विकेट्स घेतल्या.
ट्रेंडिंग लेख –
पदार्पणातच शतक करणाऱ्या २ भारतीय महिला क्रिकेटर, एक झाली रनमशीन तर दुसरीच्या नशिबी आल्या…
जेव्हा मुंबई इंडियन्सच्या ड्वेन ब्रावोसाठी अंबानींनी जमैकाला पाठवले थेट प्रायव्हेट जेट
एका वर्षात सर्वाधिक कसोटी धावा करणारे ५ क्रिकेटर, दोन नावं आहेत भारतीय