आयपीएल ही आजच्या घडीला संपूर्ण जगभरातील सर्वात लोकप्रिय टी२० लीग आहे. आजवर या लीगचे एकूण तेरा हंगाम खेळवले गेले आहेत. मात्र तरीही या लीगच्या लोकप्रियतेत तसूभरही फरक पडलेला नाही. उलट त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेच आहे.
या लोकप्रियतेत यातील काही खेळाडूंचा सहभाग देखील महत्त्वाचा आहे. या खेळाडूंनी आपल्या दमदार गोलंदाजीने आणि स्फोटक फलंदाजीने चाहत्यांना या लीगकडे आकर्षित केले आहे. या लेखात आपण अशाच काही खेळाडूंबाबत जाणून घेऊया.
१) एबी डिव्हिलियर्स –
एबी डिव्हिलियर्स हा आयपीएल मधीलच नव्हे तर जगभरातील लोकप्रिय खेळाडू आहे. मात्र आयपीएलमुळे त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. आजही त्याला बघण्यासाठी मैदानात चाहते तोबा गर्दी करतात. आजवर त्याने आयपीएलमध्ये १६९ सामन्यांत ४०.४०च्या सरासरीने एकूण ४८४९ धावा केल्या आहेत. यात त्याने जवळपास २३५ षटकार मारले असून आयपीएल इतिहासात सर्वाधिक षटकार मारणारा तो ख्रिस गेल नंतर दुसरा फलंदाज आहे.
२) कायरन पोलार्ड –
वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज कायरन पोलार्ड हा आयपीएल मधला एक प्रसिद्ध फलंदाज आहे. आयपीएल २००९ पासून मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. गोलंदाजांची धुलाई करत चौकार-षटकारांचा बरसात करण्यात तो माहिर आहे. त्यामुळे त्याची फलंदाजी नेहमीच चाहत्यांच्या पसंतीस उतरत असते.
३) ख्रिस गेल –
स्फोटक फलंदाज ख्रिस गेलला आयपीएलचा सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटू म्हंटले, तरी हरकत नाही. आयपीएल मधील भारतीय क्रिकेटपटूंपेक्षाही अधिक लोकप्रियता त्याला लाभली आहे. त्याच्या आक्रमक फलंदाजीने चाहते त्याच्या खेळावर फिदा असतात. २३ एप्रिल २०१३ रोजी त्याने खेळलेली ६६ चेंडूतील १७५ धावांची खेळी, आजही आयपीएल मधील सर्वोत्कृष्ट खेळी मानली जाते.
४) लसिथ मलिंगा –
‘यॉर्कर किंग’ म्हणून ओळखला जाणारा श्रीलंकेचा लसिथ मलिंगा गोलंदाज असूनही आयपीएल मध्ये अतिशय लोकप्रिय आहे. स्फोटक फलंदाजांना आपल्या यॉर्करच्या जाळ्यात अडकवण्यात मलिंगा पटाईत आहे. मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधत्त्व केलेला मलिंगा चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे.
५) एमएस धोनी –
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. त्याची भारतातील लोकप्रियता अफाट आहे. मूळचा झारखंडचा असून देखील चेन्नई सुपर किंग्जमुळे तो दक्षिणेत तुफान लोकप्रिय आहे. आयपीएल इतिहासातील एक सर्वाधिक यशस्वी कर्णधार म्हणून देखील तो ओळखला जातो.
महत्त्वाच्या बातम्या-
…आणि क्रिकेटविश्वाला पहिली ‘डबल सुपर ओव्हर’ आयपीएलने दिली
लईच वाईट! आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून ‘फ्लॉप’ ठरलेले ३ भारतीय खेळाडू
आयपीएलचे १३ हंगाम लोटले, पण ‘या’ दोन संघांची प्रतिक्षा काही संपेना