भारतीय संघ या वर्षाच्या शेवटी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात वनडे मालिका, टी२० मालिका आणि कसोटी मालिका खेळल्या जाणार आहेत. यासाठी भारतीय संघाची लवकरच घोषणा होणार आहे. बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने नुकतेच म्हटले होते की, ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाच्या निवडीसाठी लवकरच निवड समितीची बैठक होईल. अशामध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वनडे आणि टी२० मालिकेसाठी फिरकीपटू आर अश्विनचे पुनरागमन होऊ शकते.
३ वर्षांनंतर होऊ शकते वनडे आणि टी२० संघात पुनरागमन
आर अश्विन सध्या युएईत आयपीएल २०२०मध्ये आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित करत आहे. तो मागील ३ वर्षांपासून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून बाहेर आहे आणि तो भारतीय संघात केवळ कसोटी क्रिकेट खेळताना दिसत आहे. अश्विनची आयपीएलमधील कामगिरी पाहिली, तर तो आपल्या शानदार प्रदर्शनामुळे पुढील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तीनही क्रिकेट प्रकारात भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी दावेदारी ठोकू शकतो.
आयपीएलमध्ये आर अश्विनची धमाल
अश्विनने आयपीएलच्या १३ व्या हंगामात आतापर्यंत ८ सामने खेळले आहेत. यात त्याने ७.११ च्या इकोनॉमी रेटने ८ फलंदाजांना तंबूत धाडले आहे. दुसरीकडे किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध खेळण्यात आलेल्या मागील सामन्यादरम्यान त्याने उत्तम प्रदर्शन केले. यासोबत त्याने दाखवून दिले की, जर त्याला येत्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय क्रिकेट संघात वनडे आणि टी२० सामने खेळण्याची संधी मिळाली, तर तो उत्कृष्ट कामगिरी करू शकतो.
आर अश्विनने मागील ३ वर्षांपूर्वी खेळला होता शेवटचा सामना
अश्विनने २०१७ साली वेस्ट इंडिजविरुद्ध ३० जूनला शेवटचा वनडे सामना खेळला होता. दुसरीकडे ९ जुलै २०१७ रोजी त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच शेवटचा आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळला होता. यानंतर भारतीय संघात कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहलच्या एन्ट्रीनंतर अश्विनला संधी मिळाली नव्हती.
तरीही सध्या कुलदीप यादव चांगल्या फॉर्ममध्ये नाही. कदाचित यामुळे भारतीय संघाची निवड समिती फिरकीपटू म्हणून आर अश्विनला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची संधी देऊ शकतात.
आंतरराष्ट्रीय आकडेवारी आहे चांगली
अश्विनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीवर नजर टाकली, तर त्याने आतापर्यंत ७१ कसोटी सामने, १११ वनडे सामने आणि ४६ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. यात त्याने कसोटीत २५.४३ च्या सरासरीने ३६५ विकेट्स घेतल्या आहेत. वनडेत त्याने ३२.९१ च्या सरासरीने १५० विकेट्स घेतल्या आहेत, तर टी२०त त्याने २२.९४ च्या सरासरीने ५२ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-‘शूजची लेस नाही तर ख्रिस गेलचे पाय…’ दिल्ली वि. पंजाब सामन्यानंतर अश्विनचे ट्विट
-सगळे परवडले पण ‘हा’ नको! अश्विनच्या फिरकीपुढे ‘युनिव्हर्सल बाॅस’चा थरथराट!
-प्रीती झिंटाच्या पंजाब संघाचा ‘युनिव्हर्सल बॉस’ आता लढवणार सलमान खानच्या संघाची खिंड?
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळलेले ३ भारतीय खेळाडू
-धवनच्या शतकी खेळीनंतरही का झाला दिल्लीचा पंजाबविरुद्ध पराभव, जाणून घ्या ५ कारणे
-बाजीगर! आयपीएलमध्ये संघ पराभूत होऊनही सामनावीर पुरस्कार मिळवणारे १४ खेळाडू