आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठीचा लिलाव गुरुवारी (१८ फेब्रुवारी) चेन्नई येथे पार पडला. या लिलावात भारताचा सार्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर देखील सहभागी झाला होता. पहिल्यांदाच लिलावात उतरलेल्या अर्जुनला बोली देखील लागली. त्याला मुंबई इंडियन्सच्या संघाने २० लाख रुपयांच्या मूळ किमतीला आपल्या संघात सामील करून घेतले.
सचिन तेंडुलकर देखील आपल्या संपूर्ण आयपीएल कारकिर्दीत मुंबई इंडियन्सच्या संघाचाच भाग होता. त्यांनतर आता ज्युनिअर तेंडुलकरला अर्थात अर्जुनलाही पाच वेळच्या विजेत्या मुंबईच्या संघाने आपल्या ताफ्यात स्थान दिले आहे. मुंबईच्या संघात सामील होताच अर्जुनने या फ्रँचायझीचे आभारही मानले आहेत.
व्हिडिओ पोस्ट करत मानले आभार
मुंबई इंडियन्सने आपल्या संघात सामील करून घेताच अर्जुनने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करत आभार मानले आहेत. यात तो म्हणाला, “मी लहानपणापासूनच मुंबई इंडियन्सच्या संघाचा मोठा चाहता आहे. मला संघात सामील करून घेतल्याबद्दल आणि माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल संघ मालक, संघाचे प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ यांचा मी आभारी आहे. मुंबईच्या संघात सामील होण्यासाठी मी अतिशय उत्सुक आहे. आणि सोनेरी किनार असलेली निळी जर्सी परिधान करण्यासाठी मी अधीर झालो आहे.”
"I would like to thank the coaches, owners and the support staff for showing faith in me." 🙌💙
Arjun Tendulkar shares his thoughts on joining MI 👇#OneFamily #MumbaiIndians #IPLAuction pic.twitter.com/fEbF6Q1yUF
— Mumbai Indians (@mipaltan) February 18, 2021
मागील वर्षी होता नेट बॉलर
आयपीएलच्या मागील हंगामात २१ वर्षीय अर्जुन तेंडुलकर नेट बॉलर म्हणून मुंबई इंडियन्सच्या संघाचा भाग होता. त्याने आजपर्यंत कोणताही प्रथम श्रेणी अथवा अ दर्जाचा सामना खेळलेला नाही. परंतु, मुंबईच्या वरिष्ठ संघाकडून याच वर्षी तो सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत तो दोन सामने खेळला आहे. १५ जानेवारी रोजी हरियाणा व १७ जानेवारी रोजी पॉंडेचरी संघाविरुद्ध तो हे सामने खेळला असून त्याचे व्यावसायिक क्रिकेट केवळ दोन सामन्यांचे आहे.
महत्वाच्या बातम्या:
विजय हजारे ट्रॉफी : मुंबई इंडियन्सच्या फलंदाजाचे तुफानी शतक, झारखंडचा मध्य प्रदेशवर दणदणीत विजय
ऑस्ट्रेलियन ओपन: नाओमी ओसाकाने मिळवले चौथे ग्रँडस्लॅम विजेतेपद; फायनलमध्ये ब्रेडीचा पराभव