मुंबई । 2020 ते वर्ष क्रीडा जगतासाठी अत्यंत वाईट ठरत आहे. कोरोनामुळे अनेक खेळाडूंना आपला जीव गमवावा लागला. तसेच गेल्या तीन महिन्यांपासून क्रिकेटसह अन्य क्रीडा स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आल्या आहेत. दरम्यान, करोडो भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी आणखीन एक वाईट बातमी समोर आली आहे. गेल्या 42 वर्षांपासून क्रिकेटची बितम बात देणारे लोकप्रिय मासिक (मॅक्झिन) ‘क्रिकेट सम्राट’ बंद होणार आहे.
मिड डेने दिलेल्या माहितीनुसार, ‘क्रिकेट सम्राट’ चे प्रकाशक यांनी हे मॅग्झिन बंद करण्याची घोषणा केली आहे. प्रकाशकांच्या या घोषणेनंतर अनेक क्रिकेट प्रेमींना दुःख झाले आहे. काही जणांनी यास एका युगाचा अंत झाला असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. हे मॅगझिन बंद करण्या पाठीमागचे कारण मात्र अद्याप कळू शकले नाही.
1978 साली पहिल्यांदा क्रिकेट सम्राटचा अंक प्रकाशित झाला. या काळात सुनील गावस्कर, गुंडप्पा विश्वनाथ सारख्या दिग्गज फलंदाज जसा दबदबा होता. चॅम्पियन क्रिकेटपटू कपिल देव यांनी नुकतेच क्रिकेटमध्ये आगमन केले होते. क्रिकेट सम्राटने अत्यंत विश्वसनीय माहिती वाचकांपर्यंत देण्याचे काम केले. वाचक प्रेमी या अंकांची दर महिन्याला अतुरतेने वाट पाहायचे.
‘क्रिकेट सम्राट’ या मॅगझिनमध्ये क्रीडाविषयक घडामोडीची माहिती देण्याबरोबरच प्रमुख खेळाडूंच्या मुलाखती देखील यात छापले जात असे. वाचकांना आपल्या आवडीचे खेळाडू, त्यांचा संघर्षमय जीवन याची माहिती मिळत होती. या मॅगझिनमध्ये वाचकांच्या प्रश्नोत्तरांचा देखील कॉलम असायचा. ज्यात अनेक बारीक सारीक गोष्टींची माहिती दिली जात असे.
क्रिकेट सम्राटमध्ये येणारे पोस्टर देखील फारच लोकप्रिय होते. यामध्ये छापून येणारे पोस्टर क्रिकेटप्रेमी आपल्या घरामध्ये लावत. हे मॅग्झिन क्रिकेटप्रेमींमध्ये अतिशय लोकप्रिय होते. शाळा महाविद्यालयाच्या ग्रंथालयात, रेल्वे स्टेशन, बस स्थानकावरच्या स्टॉलवर हे मॅग्झिन हमखास दिसायचे. लोक हे मॅग्झिन वाचनासाठी आवर्जून खरेदी करायचे. कित्येकांनी त्याच्या प्रती आजही संग्रही देखील ठेवल्या आहेत.