आगामी जुलै महिन्यात भारताचा एक संघ इंग्लंडचा दौरा करणार असून, त्याच वेळी भारताचा दुसरा संघ श्रीलंकेचा मर्यादित षटकांचा दौरा करणार आहे. भारताचे प्रमुख खेळाडू इंग्लंड दौऱ्यात व्यस्त असल्यामुळे श्रीलंका दौऱ्यात युवा खेळाडूंना संधी मिळण्याची पुरेपूर शक्यता आहे. नुकतेच भारतातील आघाडीचे क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी श्रीलंका दौऱ्यातील टी20 सामान्यांसाठी आपले अकरा खेळाडू निवडले असून,यात त्यांनी अनेक युवा खेळाडूंना संधी दिली आहे.
हर्षा भोगले यांनी आपल्या टी20 संघात सलामीवीर म्हणून शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांची निवड केली आहे. यानंतर क्रमांक तीनवर त्यांनी सूर्यकुमार यादवला संधी दिली आहे. या तिन्ही खेळाडूंनी आयपीएल 2021 मध्ये शानदार कामगिरी केलेली आहे.
आक्रमक फलंदाज संजू सॅमसन याचा भोगले यांनी मधल्या फळीत चौथ्या क्रमांकावर समावेश केला आहे. यासह त्यांनी तीन अष्टपैलू खेळाडू म्हणजेच हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या आणि राहुल तेवतिया यांचा अनुक्रमे पाचव्या, सहाव्या व सातव्या स्थानावर समावेश केला आहे.
भोगले यांनी वेगवान गोलंदाजांमध्ये भुवनेश्वर कुमार आणि दीपक चहरचा समावेश केला आहे. दोन्ही खेळाडू चेंडूला स्विंग करण्यात पटाईत आहेत, तसेच ते सुरुवातीच्या व शेवटच्या षटकांमध्येही गोलंदाजी करू शकतात. फिरकीपटूंमध्ये भोगले यांनी राहुल चहर आणि वरुण चक्रवर्ती यांना संधी दिली आहे. या दोन्ही फिरकीपटूंनी आयपीएल 2021 मध्ये शानदार कामगिरी केलेली आहे.
हे बघणे उत्सुकतेचे ठरेल की यापैकी किती खेळाडूंना भारतीय निवडसमिती आपल्या टी20 संघात संधी देते. जर वरीलपैकी काही खेळाडूंना अंतिम 11 मध्ये संधी मिळाली,तर त्यांच्याकडे स्वतःला सिद्ध करण्याची मोठी संधी असणार आहे. विशेषतः पृथ्वी शॉ व सूर्यकुमार यादव यांना स्वतःचे स्थान भारताच्या प्रमुख संघात निश्चित करण्यासाठी या दौऱ्यात शानदार कामगिरी करणे गरजेचे असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
वाढदिवशी पण शास्त्री गुरूजी ट्विटरवर ट्रोल, पाहा काही भन्नाट मिम्स
५ कमनशिबी कर्णधार, ज्यांना केवळ एकाच टी२० सामन्यात मिळाली नेतृत्वाची संधी
भारताच्या अजून एका खेळाडूने घेतली कोरोनाची लस, आरोग्य कर्मचाऱ्यांचे मानले आभार