बुधवारी (११ जुलै) फिफा विश्वचषकातील दुसऱ्या उपांत्य सामन्यात क्रोएशियाने इंग्लंडला पराभूत करत प्रथमच अंतिम फेरी गाठली.
या सामन्यात क्रोएशियाने जादा वेळेत इंग्लंडला २-१ असे पराभूत केले.
आता १५ जुलैला क्रोएशिया आपल्या पहिल्या विश्वविजेते पदासाठी बलाढ्य फ्रान्सशी लढेल.
काल झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्याचा पहिला हाफ इंग्लंडच्या नावे राहिला. सामन्याच्या पाचव्याच मिनिटाला केरॉन ट्रिपरने फ्री किकवर पहिला गोल करत इंग्लंडचे खाते उघडून दिले.
त्यानंतर इंग्लंडला पहिल्या हाफमध्ये गोल करण्याच्या अनेक संधी मिळाल्या मात्र गोल करण्यात इंग्लंड अपयशी ठरला.
इंग्लंडचा कर्णधार हॅरी केनला गोल करण्यास मिळालेल्या दोन संधी त्याने वाया घालवल्या त्याचा तोटा इंग्लंडला नंतर झाला.
तर दुसऱ्या हाफमध्ये क्रोएशियाने दमदार पुनरागमन करत दुसरा हाफ आपल्या नावे केला.
दुसऱ्या हाफची आक्रमक सुरवात करणाऱ्या क्रोएशियाने सामन्याच्या ६८ व्या मिनिटाला इवान पेरिसिकने केलेल्या गोलच्या जिवावर सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली.
त्यानंतर उर्वरीत सामन्यात दोन्ही संघाकडून गोल करण्याचे जोरदार प्रयत्न झाले मात्र ९० मिनिटाच्या निर्धारीत वेळेत त्यांना गोल करण्यात अपयश आले.
त्यानंतर ४ मिनिटाच्या इंजुरी वेळेतही सामना १-१ बरोबरीत सुटला.
अखेर सामन्याचा निकाल लावण्यासाठी पंचानी ३० मिनिटाच्या अतिरिक्त खेळाची घोषणा केली.
या अतिरिक्त वेळेच्या १९ व्या मिनिटाला क्रोएशियाच्या मारिओ मांझुकिचने इवान पेरिसिकने हेडद्वारे दिलेल्या पासवर गोल करत २-१ अशी आघाडी मिळवून दिली.
नंतरच्या दहा मिनिटाच्या खेळात क्रोएशियाने इंग्लंडला गोल करण्याची एकही संधी दिली नाही.
या विजयाबरोबर पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठणाऱ्या क्रोएशियाने इंग्लंडचे अंतिम फेरीचे स्वप्न धुळीस मिळवले.
रविवारी (१५ जुलै) बलाढ्य फ्रान्स आणि क्रोएशिया यांच्यामध्ये विश्वविजेते पदासाठी लढत होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-मागील 36 वर्षांपासून या क्लबचा किमान एकतरी खेळाडू फिफाचा अंतिम सामना खेळलाय
-फिफा विश्वचषक: फ्रान्सच्या पोग्बाने उपांत्य फेरीचा विजय गुहेतून सुटका झालेल्यांना समर्पित केला