भारतीय संघ विश्वचषक 2023 स्पर्धेतील अखेरचा सामना नेदरलँड्सविरुद्ध खेळला. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर पार पडलेल्या सामन्यात भारताने 160 धावांनी विजय मिळवला. हा भारताचा सलग 9वा विजय होता. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी जबरदस्त खेळी केली. त्यात केएल राहुल याच्या झंझावाताने सर्वांचे लक्ष वेधले. राहुलने 62 चेंडूत भारतासाठी विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक झळकावले. अशात पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकची केएल राहुलविषयी प्रतिक्रिया सर्वांचे लक्ष वेधत आहे.
काय म्हणाला मलिक?
शोएब मलिक (Shoaib Malik) याने केएल राहुल (KL Rahul) याला पाचव्या क्रमांकावरील जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हटले आहे. मलिकने हे विधान नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यातील राहुलची शानदार शतकी खेळी पाहिल्यानंतर केले आहे.
मलिकने सामन्यानंतर ए स्पोर्ट्सशी बोलताना म्हटले की, “जागतिक क्रिकेटमध्ये केएल राहुल सध्या पाचव्या क्रमांकावर खेळणारा सर्वोत्तम फलंदाज आहे. हेन्रीच क्लासेनला धुव्वादार फलंदाजीसाठी बेसची गरज असते. मात्र, जर तुम्ही तुलना केली, तर भारताकडे जगातील सर्वात चांगला पाचव्या क्रमांकाचा फलंदाज आहे, जो कोणत्याही परिस्थितीत खेळू शकतो. जर भारतीय संघ दोन किंवा तीन विकेट्स लवकर गमावल्या, तर तो एक असा खेळाडू आहे, जो परिस्थितीनुसार खेळू शकतो. तो सामना संपवू शकतो आणि चांगल्या स्ट्राईक रेटने खेळू शकतो. तो वेगवान आणि फिरकी दोन्ही गोलंदाजांविरुद्ध चांगला खेळतो.”
राहुलचा झंझावात
राहुलने नेदरलँड्सविरुद्ध प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाकडून पाचव्या क्रमांकावर खेळताना 64 चेंडूत 102 धावांची शतकी खेळी केली. त्याच्या या खेळीत 4 षटकार आणि 11 चौकारांचा समावेश होता. राहुलने पाचव्या क्रमांकावर खेळताना शतक ठोकण्याचा कारनामा करत संघाला 410 एवढ्या मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले.
खरं तर, विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेत भारतीय संघ शानदार फॉर्ममध्ये आहे. भारताने 9 पैकी 9 सामने जिंकले आहेत. तसेच, भारत सर्व सामने जिंकत 18 गुणांसह पॉईंट्स टेबलमध्येही अव्वलस्थानी आहे. अशात भारतापुढे आता उपांत्य सामन्यात न्यूझीलंड संघाचे आव्हान आहे. हा सामना 15 नोव्हेंबर रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. (icc world cup 2023 pakistan cricketer shoaib malik praises kl rahul after netherlands win)
हेही वाचा-
‘गृहमंत्री असलेल्या वडिलांमुळे जय शाह शक्तिशाली, श्रीलंका क्रिकेट बर्बाद केलं…’, माजी कर्णधाराचा गंभीर आरोप
सेमीफायनलमध्ये भारताला टक्कर देण्यासाठी न्यूझीलंड संघ मुंबईत दाखल, स्वागताचा व्हिडीओ आला समोर