ब्रिस्बेन। द गॅबा स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड संघात ऍशेस २०२१-२२ मालिकेतील पहिला सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ९ विकेट्सने दणदणीत विजय मिळवून ५ सामन्याच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. असे असले तरी, इंग्लंडचा कर्णधार जो रुट याने वैयक्तिकरित्या एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.
रुटची पाँटिंगशी बरोबरी
रुट या सामन्याच्या पहिल्या डावात शुन्यावर बाद झाला होता, तर दुसऱ्या डावात त्याने १६५ चेंडूत ८९ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने १० चौकार मारले. त्यामुळे आता रुटचे यावर्षी कसोटीत १३ सामन्यांत ६४.३३ च्या सरासरीने १५४४ धावा झाल्या आहेत.
यामुळे रुटने आता एका वर्षात कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असणारा ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याची बरोबरी केली आहे. पाँटिंगने २००५ मध्ये कर्णधार म्हणून कसोटीत १५ सामन्यांत १५४४ धावा केल्या होत्या.
एका वर्षात कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ आहे. त्याने २००८ मध्ये १६५६ धावा केल्या होत्या, तर दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधाक मायकल क्लार्क आहे. त्याने २०१२ साली १५९५ धावा केल्या होत्या.
आता रुटला या वर्षात ऍशेस मालिकेतील अजून २ सामने खेळायचे आहेत. त्यामुळे त्याच्याकडे या यादीत मायकल क्लार्कला मागे टाकण्याची संधी आहे.
एका वर्षांत सर्वाधिक कसोटी धावा करणारे कर्णधार –
१६५६ – ग्रॅमी स्मिथ, २००८
१५९५ – मायकल क्लार्क, २०१२
१५४४ – जो रुट, २०२१
१५४४ – रिकी पाँटिंग, २००५
१३८१ – बॉब सिम्पसन, १९६४
ऑस्ट्रेलियाचा पहिल्या कसोटीत विजय
या सामन्यात इंग्लंडचा पहिला डाव केवळ १४७ धावांवर संपुष्टात आला होता, तर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४२५ धावा केल्या होत्या. त्यामुळे त्यांच्याकडे २७८ धावांची आघाडी होती. दुसऱ्या डावात इंग्लंड संघाने रुट आणि डेविड मलान (८२) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर सर्वबाद २९७ धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियासमोर केवळ २० धावांचे आव्हान होते. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने ५.१ षटकांत सहज पूर्ण केले.
महत्त्वाच्या बातम्या –
गॅबा कसोटीचे अचानक बंद झाले जगभरातील लाईव्ह टेलिकास्ट, डीआरएस ठप्प; वाचा सविस्तर
क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच होणार असं, ऍशेस मालिकेतील २ सामने खेळवले जाणार दिवस-रात्र स्वरुपात
तब्बल ३३ वर्षांत ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोणालाच जमला नाही, तो पराक्रम केवळ टीम इंडियाने करुन दाखवलाय