भारताच्या ऑस्ट्रेलिया दौर्यावरील अखेरच्या असलेल्या कसोटी मालिकेला १७ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. भारताचा नियमित कर्णधार कर्णधार विराट कोहली मालिकेच्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर मायदेशी परतेल. त्यानंतर उपकर्णधार अजिंक्य रहाणे याच्याकडे भारतीय संघाचे नेतृत्व दिले जाईल. भारताचे सर्वकालीन महान फलंदाज सुनील गावसकर यांना रहाणेच्या नेतृत्वात भारतीय संघाकडून चांगल्या कामगिरीची आशा आहे. विराटच्या अनुपस्थित रहाणे कोणत्याही दबावाखाली येणार नाही आणि तो पुढे होऊन संघाचे नेतृत्व करेल, असे गावसकर म्हणाले.
विराट पहिल्या सामन्यानंतर परतेल मायदेशी
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना १७ डिसेंबरपासून ऍडलेड येथे सुरू होईल. हा सामना गुलाबी चेंडूने दिवस रात्र स्वरूपात खेळवला जाईल. हा सामना खेळल्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहली पितृत्व रजेवर मायदेशी रवाना होईल. मालिकेतील उर्वरित ३ कसोटी सामन्यांमध्ये अजिंक्य रहाणे भारतीय संघाचा कार्यभार स्वीकारेल.
रहाणेवर कोणताही दबाव असणार नाही
भारताचे दिग्गज क्रिकेटपटू असलेल्या सुनील गावसकर यांनी एका क्रीडा वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “रहाणेवर कर्णधारपदाचा कोणताही दबाव असणार नाही. त्याने दोनवेळा संघाचे नेतृत्व केले आहे. त्याने धर्मशाळेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्यांदा राष्ट्रीय संघाचे कर्णधारपद भुषवले आणि तो सामना जिंकून दिला. अफगाणिस्तानविरूद्धही त्याच्याच नेतृत्वात भारताने दोन दिवसात सामना जिंकला होता. त्याच्यावर कर्णधारपदाचा कुठलाही दबाव असणार नाही. कारण तो जाणतो की, तो फक्त ३ सामन्यांसाठी कार्यवाहक कर्णधार आहे.”
पुजारासोबत करेल फलंदाजीचे नेतृत्व
गावस्कर यांनी पुढे म्हटले, “रहाणेवर कर्णधारपदाचा दबाव असणार नाही. मात्र, त्याच्याकडून अपेक्षा नक्कीच आहेत. कर्णधारपदासह तो चेतेश्वर पुजारासोबत मिळून भारताच्या फलंदाजीचे नेतृत्व करेल. या दोन्ही अनुभवी खेळाडूंवर अधिक जबाबदारी राहील.”
भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार असलेल्या अजिंक्य रहाणेने यापूर्वी भारताचे दोन वेळा आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यांमध्ये नेतृत्व केले आहे. २०१७-२०१८ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध चौथ्या कसोटीत प्रथमतः संघाचे नेतृत्व करत असताना त्याने भारताला विजय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. अफगाणिस्तानच्या पहिल्या कसोटी वेळीही तो भारताचा कर्णधार होता. या सामन्यात अफगाणिस्तान संघाला विजेतेपदाच्या चषकासोबत छायाचित्र काढण्यासाठी बोलवत त्याने मनाचा मोठेपणा दाखवलेला.
संबधित बातम्या:
– रहाणेच्या नेतृत्त्वाची कमाल! उत्कृष्ट प्लॅनिंगच्या जाळ्यात अडकला ऑस्ट्रेलियन फलंदाज, पाहा व्हिडिओ
– पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा, या अष्टपैलूला तब्बल ४ वर्षांनंतर स्थान
–रहाणे आक्रमक कर्णधार, ऑस्ट्रेलियन दिग्गजाची स्तुतिसुमने