पाकिस्तान सुपर लीग अर्थात पीएसएल २०२१ च्या हंगामाची तयारी पूर्ण झाली आहे. येत्या शनिवारपासून म्हणजेच २० फेब्रुवारीपासून या लोकप्रिय लीगच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. यातील पहिला सामना क्वैटा ग्लेडिएटर्स आणि कराची किंग्स या संघांमध्ये खेळवला जाईल. जगभारतील अनेक प्रसिद्ध खेळाडू या लीगमध्ये आपला सहभाग नोंदवतील.
मात्र आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डापुढे एक नवीन संकट उभे ठाकले आहे. या लीगसाठी एक वाईट बातमी समोर येत असून त्यामुळे आता लीगच्या आयोजनावर काळे ढग दाटले आहेत. या लीगच्या सामन्यांपूर्वी करण्यात आलेल्या कोरोना चाचण्यांमध्ये एका खेळाडूचा अहवाल सकारात्मक आला आहे. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि पीएसएलची आयोजन समिती चिंतेने ग्रासली आहे.
या लीगच्या उद्घाटन सोहळ्यापूर्वी कोरोना अहवाल सकारात्मक आलेल्या या खेळाडूला नाव जाहीर न करता आयसोलेशनमध्ये पाठवण्यात आले आहे. सध्या तरी दहा दिवसांचा आयसोलेशन कालावधी या खेळाडूसाठी निश्चित करण्यात आला आहे. तसेच या कालावधीदरम्यान लीगशी संबधित कोणत्याही व्यक्तीला भेटण्याची या खेळाडूला परवानगी नाकारण्यात आली आहे.
याबाबत अधिकृत विधान जाहीर करताना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने म्हंटले आहे की, “दोन खेळाडूंनी हलगर्जीपणा दाखवत बायो बबलचे उल्लंघन केले असून बायो बबलच्या बाहेरील व्यक्तीच्या ते संपर्कात आले आहेत. ज्या खेळाडूचा अहवाल सकारात्मक आला आहे, त्याला दहा दिवसांचा आयसोलेशन कालावधी पूर्ण करावा लागणार असून त्यानंतर दोन वेळा कोरोना चाचणीचा अहवाल नकारात्मक आल्यासच त्याला पुन्हा स्पर्धेत प्रवेश मिळेल.”
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तान क्रिकेट बोर्ड खेळाडूंच्या वर्तनावर नाराज असून नियम न तोडण्याची सक्त ताकीद त्यांना देण्यात आली आहे. तसेच पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि पीएसएल आयोजन समिती आपापसांत चर्चा करून लीगच्या पुढील आयोजनाची दिशा ठरवणार आहेत.
महत्वाच्या बातम्या:
ऑस्ट्रेलियन ओपन: नाओमी ओसाकाने मिळवले चौथे ग्रँडस्लॅम विजेतेपद; फायनलमध्ये ब्रेडीचा पराभव
विजय हजारे ट्रॉफी : मुंबई इंडियन्सच्या फलंदाजाचे तुफानी शतक, झारखंडचा मध्य प्रदेशवर दणदणीत विजय